शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रद्रोहाचे ओंगळ प्रदर्शन

जेएनयूतील घटना ही डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा तिसरा अंक आहे. हैद्राबाद विद्यापीठामध्ये अतिरेकी याकुबला श्रद्धांजली आणि जेएनयुमध्ये अतिरेकी अफजलला श्रद्धांजली. आयोजक एकच… डाव्या संघटना…. फक्त हैद्राबादमध्ये त्यांचा जो छुपा हेतू होता, तो जेएनयुमध्ये उघड झाला. त्यांनी येथे उघड राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या… डाव्या संघटनांचा हा खरा चेहरा आहे. त्यांचे देशप्रेम बेगडी आहे. 

            काल-परवा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनांनी अफजल गुरूला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम कसला… तो एक तमाशा होता. राष्ट्रद्रोहाचे ओंगळवाणे प्रदर्शन होते ते. डाव्या संघटनांचे पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता हे एक ढोंग आहे. तसेच त्यांचे राष्ट्रप्रेमही एक दिखावा आहे. केंद्रात प्रतिगामी, असहिष्णु (ही विशेषणे डाव्यांनी दिलेली) मोदी सरकार आल्यापासून या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व सहिष्णु असल्याचा ढोंगी दावा करणा-या डाव्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. त्यामुळेच त्यांनी शैक्षणिक परिसरात आपल्या तमाशा-नाट्याला प्रारंभ केला आहे. जेएनयूमघ्ये झालेला प्रकार हा त्या नाट्याचाच भाग आहे.

            हे नाट्य खरे तर पुण्याच्या नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमधून सुरू झाले. एखाद्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी कोण असावे, याचा निर्णय विद्यार्थी कसे काय घेऊ शकतात…? सरकारने ज्याला नेमले त्याची योग्यता त्याने काम करण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांना कसा लक्षात येऊ शकतो? पण डाव्या विचारांनी भारलेल्या विद्यार्थ्यांनी व त्याच विचाराच्या संघटनांनी प्रमुखाच्या नियुक्तीविरोधात आंदोलन सुरू केले. कारण काय… तर प्रमुख केवळ मोदी सरकारने नेमला… एव्हढेच. अगोदरच्या प्रमुखांनी काय दिवे लावले, याचा विचारही कोणी केला नाही. स्वतःला विचारवंत समजणारे अन्य पुरोगामीही डाव्यांच्या या खेळीत सापडले, हे दुर्दैवच.

            डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा दुसरा अंक रंगला हैद्राबाद विद्यापीठाच्या परिसरात. यावर ‘रोहितचे हत्यारे कोण’ या मथळ्याखाली मी स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहे. (http://anantkolamkar.blogspot.in/2016/01/blog-post_23.html) रोहित वेमुलाने केलेली आत्महत्या दुर्दैवी आहेच. पण दहशतवादी याकूबच्या फाशीविरोधात विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्याचा गैरप्रकार रोहितने केला होता, याकडे मात्र पुरोगामी विचारवंत दुर्लक्ष करीत आले. रोहित ज्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता, त्या संघटनेच्या नावात जरी डॉ. आंबेडकरांचे नाव असले तरी ती संघटना डाव्या विचाराची संघटना आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

            हैद्राबादमध्येही दहशतवादी याकुबला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती आणि रोहित त्यात समोर होता. हा चक्क देशद्रोहच होता. काहींनी हा प्रकार याकुबच्या समर्थनार्थ नव्हता, तर फाशीच्या शिक्षेला तो विरोध होता, अशी बाजू घेण्याचा फसवा प्रयत्न केला. पण त्यासाठी “प्रत्येक घरात याकुब जन्माला येईल” अशी घोषणा का दिल्या गेली, याचे उत्तर मात्र कुणीही देत नव्हते. हा केवळ फाशी या शिक्षेला विरोध, असा फसवा युक्तिवाद करणा-यांचा बुरखा जेएनयूतील घटनेने टराटरा फाडला आहे. जेएनयूतील घटना ही डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा तिसरा अंक आहे. हैद्राबाद विद्यापीठामध्ये अतिरेकी याकुबला श्रद्धांजली आणि जेएनयुमध्ये अतिरेकी अफजलला श्रद्धांजली. आयोजक एकच… डाव्या संघटना…. फक्त हैद्राबादमध्ये त्यांचा जो छुपा हेतू होता, तो जेएनयुमध्ये उघड झाला. त्यांनी येथे उघड राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या… डाव्या संघटनांचा हा खरा चेहरा आहे. त्यांचे देशप्रेम बेगडी आहे.

            डाव्या संघटनांचे पाकिस्तानप्रेमही लपून नाही. अलगाववादी काश्‍मिरी संघटनांशी असलेली त्यांची मैत्रीही जगजाहीर आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर डाव्या संघटनांचा अड्डा बनला आहे. कालपरवाच्या घटनेत या डाव्या विद्यार्थी संटनेच्या कार्यकर्त्यांनी काश्‍मीरच्या स्वतंत्रतेच्याही घोषणा दिल्यात. पण जेएनयुतील त्यांची फुटीरतावादी मानसिकता नवीन नाही. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला जेएनयुतील कावेरी होस्टेलमधून शहाबुद्दीन गोरी या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आरोप होता जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट या फुटीरतावादी संघटनेशी संबंध असण्याचा. हा शहाबुद्दीन आईसा या डाव्या संघटनेचा कार्यकर्ता होता. कारगील युद्धानंतर जेएनयुतील डाव्या संघटनांनी ‘अमन की आशा’ नावाने कार्यक्रम केला व त्यात भारतविरोधी घोषणा दिल्या. तेथे भारतीय सेनेचे दोन अधिकारीही होते. त्यांनी या प्रकाराला विरोध केला, तर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याच डाव्या संघटनांनी महात्मा गांधींची इंग्रजांच्या हातची कठपुतळी, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जपानच्या कुशीतील पिल्लू, या शब्दात हेटाळणी केली होती. याच संघटनांनी १९६२च्या चीन युद्धात चीनच्य़ा समर्थनार्थ नारे दिले आणि आता याच संघटना काश्‍मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या, अशी मागणी करीत आहे.

            हा या संघटनांचा खरा विद्रूप चेहरा आहे. नक्षलवाद्यांची प्रेरणा याच संघटना आहे. आणि आता याच संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाने हा धोका ओळखण्याची गरज आहे. आणि विशेषतः डाव्यांच्या चलाखीला फसत असलेल्या पुरोगाम्यांनीही हा ओळखला पाहिजे. नाही तर डाव्यांची विश्‍वासार्हता जशी सर्वत्र संपली, तशीच गत या पुरोगाम्यांचीही होईल, यात संशय नाही.


    अनंत कोळमकर

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

रोहितचे हत्यारे कोण?

भावनिक एकटेपण, रिकामेपण निराशेला जन्म देते व मग त्यातून आक्रमकता जन्म घेते. तेच तर आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनसारख्या डाव्या संघटनांना हवे असते. त्यादृष्टीने रोहित soft target होता. रोहितच्या फेसबूकवरच्या घडामोडी त्याच्या त्याच भावनिक प्रवासाचे दर्शन घडवते. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येला ‘हत्या’ म्हणायचेच झाले, तर ती हत्या करणारे मारेकरू म्हणून त्याच्या भावनिक कोंडमा-याचा फायदा घेणा-या त्याच्या संघटनेचेच नाव घ्यावे लागेल.

रोहित वेमुला... हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात शिकणारा, समाजशास्त्रात संशोधन करीत असलेला एक उमदा तरुण. विद्यार्थी संघटनेच्या वादातून रोहित व त्याच्या मित्रांनी विरोधी संघटनेच्या, अभाविपच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. पोलिस तक्रार झाली. रोहित व त्याच्या चार मित्रांना वसतिगृहातून निलंबित करण्यात आले. १७ जानेवारीला त्याने विद्यापीठ वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना मोदी सरकारला व त्याअनुषंगाने संघपरिवाराला ठोकायला एक कोलित मिळाले. रोहितची आत्महत्या सा-या देशभर गाजत आहे. रोहितसारख्या तरुणाची आत्महत्या सा-या समाजमनाला चिंतीत करणारी बाब आहे. पण, त्यावरून सुरू झालेले घाणेरडे राजकारण पाहता या एकूणच प्रकरणाची माहिती करून घेणे आवश्‍यक झाले आहे.

हे लिखाण लांबलचक आहे. पण, या संपूर्ण घटनाक्रमातील वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडून घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. ते पाहता हे सारे तुकडे एकत्र करण्याची गरज होतीच. त्यामुळेच लेख लांब होण्याचा धोका पत्करावा लागला. हे सारे तुकडे सलगपणे पाहल्यानंतर स्पष्टपणे जाणवते की, रोहितची आत्महत्या दुःखद आहे. पण, त्याहून वाईट आहे, त्याच्या आत्महत्येचे होत असलेले राजकारण. आत्महत्येपूर्वीच्या पत्रात रोहित लिहितो, “Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.” असे तो म्हणत असतानाही त्याच्या मृत्यूवर राजकारण करण्याचा व त्याच्या भावनांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? म्हणूनच रोहितची ओळख, या प्रकरणाच्या मुळाशी असलेली घटना व त्यानंतर सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप याचा क्रमशः विचार करण्याची गरज आहे.

रोहित वेमुला
एक हुशार विद्यार्थी. संशोधनासाठी त्याने हैद्राबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. आज रोहित आपल्यात नाही. पण त्याचे फेसबूक अकाऊंट बोलके आहे. हे अकाऊंट त्याचा अलिकडला जीवनप्रवास सांगते.
  1. रोहितचे फेसबूक अकाऊंट सुरू झाले, २०१० मध्ये. प्रारंभीच्या पोस्टमध्ये हैद्राबाद विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचा आनंद या अकाऊंटवर दिसतो. नवीन मित्र मिळाल्याचा आनंदही तो येथे प्रकट करतो.
  2. होस्टेलमधल्या त्याच्या खोलीचे फोटो या अकाऊंटवर आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या फोटोंनी त्याने खोली सजवल्याचे दिसते.
  3. त्याच्या फेसबूक वॉलवर बाळकृष्णाचे फोटोही दिसतात. १५ ऑगस्टला देशभक्तीपर गाणी शेअर केलेली दिसतात. मोदींच्या सौरउर्जा प्रकल्पाची स्तुतीही त्याने केली आहे आणि आसाममधल्या दंगलीबाबत भारतीय मीडिया शांत का होता, असा सवालही तो विचारतो.
  4. विज्ञान, संशोधन यावरही तो फेसबूकवर लिहितो.
  5. २०१२मध्ये रोहित बदलू लागतो. आता त्याला अण्णा हजारेंचे आंदोलन भुरळ घालते आणि तो काँग्रेसवर टीका करायला सुरुवात करतो. राहुल गांधींवर जोक करतो. इतकेच नाही तर सुब्रम्हण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर केलेली टीकाही शेअर करतो.
  6. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी तो फेसबूकवर करतो.
  7. २०१३ पासून रोहित केजरीवालचा भक्त बनू लागतो. त्याला आप आवडू लागते. आता मात्र त्याच्या विचारांमध्ये बदल होताना दिसतो. विज्ञान, संशोधन यावरचे लिखाण कमी होते. तो आता हळूहळू कट्टरवादाकडे वळू लागल्याचे दिसून येते.
  8. २०१५ मध्ये रोहित ओवेसी-विचारसरणीला पाठिंबा देऊ लागतो. याचवेळी तो आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशन या संघटनेकडे आकर्षित होतो.
  9. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख अतिरेकी आरोपी याकुब मेमनच्या फाशीला तो विरोध करतो. त्याच्या मृत्यूनंतरच्या नमाजाचे विद्यापीठ परीसरात आयोजन करतो.
  10. विवेकानंदांना मानणारा, बलात्का-यांना फाशीची मागणी करणारा रोहित ते विवेकानंदांवर टीका करणारा आणि याकुबसारख्या देशद्रोही अतिरेक्याच्या फाशीला विरोध करणारा रोहित असा प्रवास हे फेसबूक अकाऊंट दाखवतो. रोहितने विवेकानंदांना fake intellectual, half-witted person अशा शेलक्या उपाध्या देऊन त्यांचा जन्मदिवस विद्यापीठात साजरा करण्यास विरोधही केला आहे.


मूळ संघर्ष व घटनाक्रम
रोहितच्या आत्महत्येच्या मुळाशी आहे, संघ परिवारातील संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) व रोहित ज्या संघटनेचे काम करायचा, ती आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशन (एएसए) या दोन संघटनांमधील संघर्ष. या दोन संघटनांमध्ये तात्विक वाद होताच, पण एएसएने याकुब मेमनच्या फाशीला विरोध करून त्याच्यासाठी विद्यापीठ परीसरात नमाजाचे आयोजन करण्यानं या दोन्ही संघटनांमधील संघर्ष टोकाला पोहोचला.
  • याकूबला ३० जुलै, २०१५ रोजी नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली. त्याच्या फाशीला एएसएने विरोध केला. त्या निदर्शनात रोहित समोर होता. निदर्शकांच्या हातात आक्षेपार्ह घोषणा लिहिलेले फलक होते. ‘’तुम कितने याकुब मारोगे, हर घर से याकुब निकलेगा...’’ अशा आक्षेपार्ह घोषणा या फलकांवर होत्या.
  • या निदर्शनांना व विद्यापीठ परिसरात आयोजित नमाजाला अभाविपने विरोध केला. त्यामुळे संतापून रोहित व त्याच्या सहका-यांनी दि. ३ व ४ ऑगस्ट, २०१५ दरम्यानच्या रात्री अभाविपचा कार्यकर्ता सुशील कुमार याला मारहाण केली. सुशीलला दवाखान्यात भरती करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • या मारहाणीची पोलिसात व विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. विद्यापीठाने प्रारंभिक चौकशी केली. या प्रारंभिक चौकशीत रोहित व त्याच्या सहका-यांना निर्दोष सोडले. पण नंतर चौकशीत सुशीलकुमारच्या वैद्यकीय अहवालाचा विचार करण्यात आला व सुशीलकुमारचेही बयाण घेण्यात आले. चौकशीच्या अंतिम अहवालात रोहित व त्याच्या सहका-यांना दोषी ठरवले. या अहवालावरून विद्यापीठ कार्यकारिणीने रोहित व त्याच्या अन्य चार सहका-यांना विद्यापीठातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
  • यानंतरही विद्यापीठाला एएसएच्या दबावामुळे दोषी विद्यार्थ्यांवरील निलंबनाची कारवाई करता आली नाही. त्यामुळे सुशीलकुमारच्या आईने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने दोषींवर काय कारवाई केली, याची विचारणा विद्यापीठाला केली. नोव्हेंबर २०१५च्या मध्ये न्यायालयाने विद्यापीठाला एक निश्‍चित अवधी देऊन कृती अहवालच मागितला.
  • त्यामुळे विद्यापीठावरचा दबाव वाढला. विद्यापीठाने डिन, परीक्षा नियंत्रक, होस्टेल वार्डन, विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन यांची बैठक बोलावली. त्यात कोणती कारवाई करायची हे ठरविण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीत अगोदर दलित समाजाचा एकही सदस्य नव्हता. त्यामुळे त्यात विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन यांचा समावेश करण्यात आला.
  • या समितीने विद्यापीठ कार्यकारिणीने सूचवलेली निलंबनाची कारवाई कायम ठेवली. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती लक्षात घेऊन ही शिक्षा कमी करण्याची विनंती कुलगुरूंनी कार्यकारिणीला केली. कार्यकारिणीने ती मान्य केली व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केवळ होस्टेल, प्रशासकीय इमारत व विद्यापीठ परिसरातील अन्य सार्वजनिक जागा येथे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली.
  • हा निर्णय होस्टेलच्या मुख्य वार्डनने संबंधित दोषी विद्यार्थ्यांना (रोहित व त्याचे अन्य चार सहकारी) २० डिसेंबर, २०१५ रोजी सांगितला व त्यांच्या खोल्या रिकाम्या करून या निर्णयाची अंमलबजावणी केली.
  • या निर्णयाच्या विरोधात एएसए व काही विद्यार्थी गट कुलगुरूंना भेटले. होस्टेलमधून निलंबन हा सामाजिक बहिष्काराचा प्रकार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच हे निलंबन त्यांनी सिकंदराबादचे खासदार व केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांना पाठवलेल्या पत्रामुळे झाल्याचे म्हटले. विद्यापीठ कार्यकारिणीने घेतलेला निलंबनाचा निर्णय हा दत्तात्रय यांच्या पत्राअगोदरचा आहे, ही बाब विद्यापीठाने त्याचवेळी स्पष्ट केली.
  • होस्टेलमधून निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी निलंबित विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली व सुशालकुमारच्या आईच्या याचिकेसोबतच त्याची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. पण, निलंबनाला स्थगिती दिली नाही.
  • निलंबित विद्यार्थी व एएसए यांनी आंदोलन सुरू केले. ३ जानेवारी, २०१६पासून उघड्यावर राहणे, झोपणे सुरू केले. बंद पुकारला.
  • १७ जानेवारी रोजी रोहितने आत्महत्या केली.


आरोप-प्रत्यारोपांचे वादळ
या सा-या घटनाक्रमानंतर मोदी सरकारच्या विरोधात वादळ उठवले गेले. मोदी सरकारनेच रोहितला आत्महत्या करायला भाग पाडले, अशा थाटात हे आरोप होत आहे. ते किती वास्तविक आहेत, हे वरच्या घटनाक्रमावरून स्पष्ट होतेच. पण काही मुख्य आरोपांचा परामर्श घेणे गरजेचे आहे.

आरोप १ – हा प्रकार दलितांवरचा हल्ला आहे.
----- खरं तर या प्रकाराला दलित-दलितेतर वाद असे स्वरूप देणे दुर्दैवी आहे. राजकारणाचा वास तेथेच येतो. कोण्याही तरुणाची अशी आत्महत्या मनाला वेदना देणारीच असली पाहिजे… मग तो दलित असो वा नसो. रोहितच्या ऐवजी एखादा उच्चभ्रु तरुण असता, तर रोहितच्या मृत्यूवर छाती पिटणा-यांना त्याचे दुःख झाले नसते का? याचे उत्तर या छाती पिटणा-यांनी दिले पाहिजे. केवळ राजकारणासाठी असा वाद तयार केला गेला, एव्हढेच यातून दिसते. राहिला प्रश्‍न रोहितच्या जातीचा. त्याचे दोन जाती प्रमाणपत्र समोर येत आहेत. एकात तो ओबीसी आहे, तर दुस-यात एससी. रोहितची आई व काका ते दलित समाजाचे नसल्याचे सांगत आहे. नेमके काय हे चौकशीतूनच समोर येईल.

आरोप २ – निलंबनाची कारवाई हा सामाजिक बहिष्कार होता.
----- होस्टेल वा प्रशासकीय इमारतीत प्रवेशबंदी हा सामाजिक बहिष्कार कसा असू शकतो? दोषी विद्यार्थ्यांना वर्गात, लायब्ररीत जाण्याला बंदी नव्हती. त्यांच्यावरची कारवाई ही शिस्तभंगाची होती व ती कारवाई करण्याचा अधिकार विद्यापीठाला होता आणि राहीलही. विशेष म्हणजे निलंबित विद्यार्थ्यांपैकी एकाने कारवाईनंतर आपला शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला.

आरोप ३ – केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रोहितने आत्महत्या केली.
---- वर नमूद घटनाक्रमावरून केंद्रीय मंत्र्यांचे पत्र विद्यापीठाने कारवाईची शिफारस केल्यानंतर मिळाले आहे. पण, मुद्दा तो नाही. एखाद्या खासदार वा मंत्र्याकडे एखादी तक्रार आली तर त्यावर चौकशी करून कारवाई करा, अशी विनंती करण्याचा अधिकार त्याला आहे की नाही? बंडारू दत्तात्रय यांनी तेच केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी ती तक्रार विद्यापीठाकडे पाठवली. प्रशासनाच्या मान्य पद्धतीनुसार असेच होते. आणि ते आजच नाही, तर काँग्रेसच्या सत्ताकाळापासून तसेच होत आहे व ते योग्यही आहे. विशेष म्हणजे रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात कोठेही तसा उल्लेख केला नाही. कोणावरही दोषारोपण केले नाही आणि कारवाईमुळे आत्महत्या करीत असल्याचेही म्हटले नाही.

आरोप ४ – तक्रारकर्ता सुशीलकुमारला मारहाण झाली नाही. तो दवाखान्यात अपेंडिक्समुळे भरती होता व त्यासंदर्भातच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली.
सुशीलकुमारचा Discharge Report
----- हा आक्षेप अर्धसत्य आहे. सुशीलला मारहाण झाली ३-४ ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास. त्याला अर्चना हॉस्पिटलमध्ये भरती केले त्याच रात्री ४.३० वाजता. त्याच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली ७ ऑगस्टला. हे सत्य आहे. पण यात दवाखान्याचा Discharge Report पाहिला पाहिजे. हा रिपोर्ट पुरेसा बोलका आहे. यात रुग्णाच्या, म्हणजेच सुशीलकुमारच्या हिस्ट्रीबाबत नमूद केले आहे. त्यात लिहिले आहे – रुग्णावर काही लोकांनी हल्ला केला. त्याला रक्ताची उलटी झाली. त्याचे पोट दुखत होते. डाव्या खांद्यावर मुका मार होता.
म्हणजेच त्याला बेदम मारहाण झाली. त्याला अपेंडिक्स होता. तो माहीत नसावा. त्या अपेंडिक्सला मारहाणीत मार बसला व नंतरची गुंतागुत वाढली. परिणामी शस्त्रक्रिया करावी लागली. हा सारा प्रकार मारहाणीने झाला, हे अमान्य कसे करता येईल.

आरोप ५ – रोहित निर्दोष, निष्पाप होता…
याकुबच्या फाशीविरोधात आक्षेपार्ह फलक घेऊन निदर्शने
करणा-या निर्शकांमध्ये रोहित
---- खरा कळीचा मुद्दा हाच आहे. कोणाच्याही मृत्यूनंतर त्याच्याबाबत वाईट बोलू नये, लिहू नये, असे मानले जाते. पण ज्या पद्धतीने घाणेरडे राजकारण त्याच्या मृत्यूवर सुरू झाले, ते पाहता काही प्रश्‍नांची उत्तरेही शोधावी लागतील. रोहित हुशार होता… उमदा होता… हे सारे मान्य असले तरी तो चुकीच्या मार्गाने लागला होता, हे येथे नमूद करावेच लागेल. देशद्रोही अतिरेकी याकुब मेननविषयी प्रेम असणे, त्याचे प्रदर्शन करणे याला तुम्ही नैतिकता, देशप्रेम म्हणणार आहात काय? देशाच्या न्यायव्यवस्थेने दिलेली ती शिक्षा होती. तरीही त्याला जाहीर विरोध करणे, हा त्या न्यायव्यवस्थेचाही अपमानच आहे. देशद्रोह्याच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून नमाज आयोजित करणे, हाही देशद्रोहच आहे. आणि तोही विद्यापीठ परिसरात…? हा शिस्तभंगच. त्यासाठी कारवाई व्हावी की नाही? विशेष म्हणजे या सा-या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनचा आंबेडकरवादाशी दूरदूरवर संबंध नाही. सध्या डाव्या विचारसरणीने, कम्युनिस्टांनी आंबेडकर, फुले यांची नावे आपल्या सोयीने घेण्याचा प्रघात सुरू केला आहे. या संघटनेलाही त्याच डाव्या विचारसरणीचा वारसा आहे, हे दृष्टीआड करता येत नाही. सुशीलकुमारला केलेल्या मारहाणीत रोहित मुख्य आरोपी आहे. प्रकरण न्यायालयात आहे. रोहितवरचा आरोप खोटा की खरा, हे न्यायालयात ठरले असते. पण तोवर वाट पाहण्याची तयारीही एएसएची नव्हती.

रोहितने आत्महत्या केली. आता त्याच्या मृत्यूचे भांडवल करण्यासाठी व यानिमित्ताने मोदी, भाजप, संघ, अभाविप यांना ठोकण्यासाठी सारे समोर सरसावले आहेत. रोहितचा कळवळा यातल्या कोणालाही नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका करताना रोहितची आत्महत्या ही हत्या असल्याचा आरोप केला. केजरीवाल हे तसेही खूप गंभीरतेने घेण्यासारखे व्यक्तिमत्व नाही. पण त्यांनी केलेले हे विधान मला पटले. रोहितची आत्महत्या ही हत्या आहेच. पण ती केली कुणी?

रोहितची जी सुसाईड नोट प्रसिद्ध झाली आहे, ती पाहता (तिचे खरेखोटेपण चौकशीत सिद्ध होईल.) रोहितची हत्या कुणी केली, याचा अंदाज बांधता येतो. रोहित हळवा आहे… मनस्वी आहे… तो या नोटमध्ये लिहितो – “My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.” बालपणापासून असलेल्या एकटेपणाचा तो बळी आहे. एकटेपणाचा भावनिक कोंडमारा तो सहन करीत होता. पुढे तो लिहितो – “I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.” 

त्याने त्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट लिहिले आहे. त्याच्या डोक्यात जहर भरणा-या संघटनांना त्याचा हा ‘एम्प्टीनेस’ कसा व का लक्षात आला नाही? ते त्यांचे अपयश नाही का… की रोहितच्या याच एकटेपणाचा, रिकामेपणाचा पुरेपूर फायदा या संघटनांनी घेतला. भावनिक एकटेपण, रिकामेपण निराशेला जन्म देते व मग त्यातून आक्रमकता जन्म घेते. तेच तर आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनसारख्या डाव्या संघटनांना हवे असते. त्यादृष्टीने रोहित soft target होता. रोहितच्या फेसबूकवरच्या घडामोडी त्याच्या त्याच भावनिक प्रवासाचे दर्शन घडवते. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येला ‘हत्या’ म्हणायचेच झाले, तर ती हत्या करणारे मारेकरू म्हणून त्याच्या भावनिक कोंडमा-याचा फायदा घेणा-या त्याच्या संघटनेचेच नाव घ्यावे लागेल.




-      अनंत कोळमकर