शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रद्रोहाचे ओंगळ प्रदर्शन

जेएनयूतील घटना ही डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा तिसरा अंक आहे. हैद्राबाद विद्यापीठामध्ये अतिरेकी याकुबला श्रद्धांजली आणि जेएनयुमध्ये अतिरेकी अफजलला श्रद्धांजली. आयोजक एकच… डाव्या संघटना…. फक्त हैद्राबादमध्ये त्यांचा जो छुपा हेतू होता, तो जेएनयुमध्ये उघड झाला. त्यांनी येथे उघड राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या… डाव्या संघटनांचा हा खरा चेहरा आहे. त्यांचे देशप्रेम बेगडी आहे. 

            काल-परवा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनांनी अफजल गुरूला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम कसला… तो एक तमाशा होता. राष्ट्रद्रोहाचे ओंगळवाणे प्रदर्शन होते ते. डाव्या संघटनांचे पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता हे एक ढोंग आहे. तसेच त्यांचे राष्ट्रप्रेमही एक दिखावा आहे. केंद्रात प्रतिगामी, असहिष्णु (ही विशेषणे डाव्यांनी दिलेली) मोदी सरकार आल्यापासून या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व सहिष्णु असल्याचा ढोंगी दावा करणा-या डाव्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. त्यामुळेच त्यांनी शैक्षणिक परिसरात आपल्या तमाशा-नाट्याला प्रारंभ केला आहे. जेएनयूमघ्ये झालेला प्रकार हा त्या नाट्याचाच भाग आहे.

            हे नाट्य खरे तर पुण्याच्या नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमधून सुरू झाले. एखाद्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी कोण असावे, याचा निर्णय विद्यार्थी कसे काय घेऊ शकतात…? सरकारने ज्याला नेमले त्याची योग्यता त्याने काम करण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांना कसा लक्षात येऊ शकतो? पण डाव्या विचारांनी भारलेल्या विद्यार्थ्यांनी व त्याच विचाराच्या संघटनांनी प्रमुखाच्या नियुक्तीविरोधात आंदोलन सुरू केले. कारण काय… तर प्रमुख केवळ मोदी सरकारने नेमला… एव्हढेच. अगोदरच्या प्रमुखांनी काय दिवे लावले, याचा विचारही कोणी केला नाही. स्वतःला विचारवंत समजणारे अन्य पुरोगामीही डाव्यांच्या या खेळीत सापडले, हे दुर्दैवच.

            डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा दुसरा अंक रंगला हैद्राबाद विद्यापीठाच्या परिसरात. यावर ‘रोहितचे हत्यारे कोण’ या मथळ्याखाली मी स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहे. (http://anantkolamkar.blogspot.in/2016/01/blog-post_23.html) रोहित वेमुलाने केलेली आत्महत्या दुर्दैवी आहेच. पण दहशतवादी याकूबच्या फाशीविरोधात विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्याचा गैरप्रकार रोहितने केला होता, याकडे मात्र पुरोगामी विचारवंत दुर्लक्ष करीत आले. रोहित ज्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता, त्या संघटनेच्या नावात जरी डॉ. आंबेडकरांचे नाव असले तरी ती संघटना डाव्या विचाराची संघटना आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

            हैद्राबादमध्येही दहशतवादी याकुबला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती आणि रोहित त्यात समोर होता. हा चक्क देशद्रोहच होता. काहींनी हा प्रकार याकुबच्या समर्थनार्थ नव्हता, तर फाशीच्या शिक्षेला तो विरोध होता, अशी बाजू घेण्याचा फसवा प्रयत्न केला. पण त्यासाठी “प्रत्येक घरात याकुब जन्माला येईल” अशी घोषणा का दिल्या गेली, याचे उत्तर मात्र कुणीही देत नव्हते. हा केवळ फाशी या शिक्षेला विरोध, असा फसवा युक्तिवाद करणा-यांचा बुरखा जेएनयूतील घटनेने टराटरा फाडला आहे. जेएनयूतील घटना ही डाव्यांच्या तमाशा-नाट्याचा तिसरा अंक आहे. हैद्राबाद विद्यापीठामध्ये अतिरेकी याकुबला श्रद्धांजली आणि जेएनयुमध्ये अतिरेकी अफजलला श्रद्धांजली. आयोजक एकच… डाव्या संघटना…. फक्त हैद्राबादमध्ये त्यांचा जो छुपा हेतू होता, तो जेएनयुमध्ये उघड झाला. त्यांनी येथे उघड राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या… डाव्या संघटनांचा हा खरा चेहरा आहे. त्यांचे देशप्रेम बेगडी आहे.

            डाव्या संघटनांचे पाकिस्तानप्रेमही लपून नाही. अलगाववादी काश्‍मिरी संघटनांशी असलेली त्यांची मैत्रीही जगजाहीर आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर डाव्या संघटनांचा अड्डा बनला आहे. कालपरवाच्या घटनेत या डाव्या विद्यार्थी संटनेच्या कार्यकर्त्यांनी काश्‍मीरच्या स्वतंत्रतेच्याही घोषणा दिल्यात. पण जेएनयुतील त्यांची फुटीरतावादी मानसिकता नवीन नाही. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला जेएनयुतील कावेरी होस्टेलमधून शहाबुद्दीन गोरी या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आरोप होता जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट या फुटीरतावादी संघटनेशी संबंध असण्याचा. हा शहाबुद्दीन आईसा या डाव्या संघटनेचा कार्यकर्ता होता. कारगील युद्धानंतर जेएनयुतील डाव्या संघटनांनी ‘अमन की आशा’ नावाने कार्यक्रम केला व त्यात भारतविरोधी घोषणा दिल्या. तेथे भारतीय सेनेचे दोन अधिकारीही होते. त्यांनी या प्रकाराला विरोध केला, तर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याच डाव्या संघटनांनी महात्मा गांधींची इंग्रजांच्या हातची कठपुतळी, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जपानच्या कुशीतील पिल्लू, या शब्दात हेटाळणी केली होती. याच संघटनांनी १९६२च्या चीन युद्धात चीनच्य़ा समर्थनार्थ नारे दिले आणि आता याच संघटना काश्‍मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या, अशी मागणी करीत आहे.

            हा या संघटनांचा खरा विद्रूप चेहरा आहे. नक्षलवाद्यांची प्रेरणा याच संघटना आहे. आणि आता याच संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाने हा धोका ओळखण्याची गरज आहे. आणि विशेषतः डाव्यांच्या चलाखीला फसत असलेल्या पुरोगाम्यांनीही हा ओळखला पाहिजे. नाही तर डाव्यांची विश्‍वासार्हता जशी सर्वत्र संपली, तशीच गत या पुरोगाम्यांचीही होईल, यात संशय नाही.


    अनंत कोळमकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा