सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

आभाळाएव्हढा बाप




माझा बाप माझ्यासाठी आभाळाएव्हढा होता आणि पुढेही आभाळाएव्हढाच राहील. त्या आभाळाएव्हढ्या बापाला माझी विनम्र श्रद्धांजली.

आज २८ ऑगस्ट, २०१७. बरोबर एक वर्षापूर्वी तीर्थरूप बाबा हा इहलोक सोडून गेले. बाबांची ओळख परिचित मित्रमंडळीत कोळमकर गुरुजी... मास्तर होती. नातेवाईकांमध्ये ते शंकरराव कोळमकर होते. पण माझ्यासाठी ते काय होते? फक्त वडील? की आणखी काहीतरी? गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी घडल्यात. खूपशा मला न रुचणाऱ्या... काहीशा मला बदनाम करणाऱ्या. पण मी शांत होतो. स्व. बाबांना दिलेला शब्द पाळत... जवळच्या परीघातील अनेकजण विचारायचे माझ्या आणि स्व. बाबांच्या संबंधांबाबत. कारण साऱ्यांना ते संबंध तणावाचेच दिसायचे... त्यातून अनेक वाद-प्रवादही निर्माण झालेत. माझ्यावर टीकाही झाली. पण तरीही मी चूप राहिलो. हो... गेल्या सर्व २५ वर्षांमधले मी आणि बाबांमधले संबंध खूप मधूर होते असे नाही. पण या काळात बाबा मला दूर गेले असे वाटले नाही आणि आता ते इहलोक सोडून गेल्यानंतरच्या वर्षभरानंतरही मला ते जवळच असल्याचे वाटते. कुठेतरी आसपास वावरत असल्यासारखे...

विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असणारा शिक्षक किंवा संघाच्या शाखेवर शिस्तप्रिय असणारे कठोर मास्तर एव्हढीच ओळख नव्हती बाबांची. ते उत्तम वक्ते होते. ते चांगले संघटक होते. पण, बाबा त्याहून अधिक होते. खरं तर बाबांचे शिक्षण जुन्या काळातले दहावी. त्यानंतर त्यांनी त्यावेळी शिक्षकी पेशासाठी आवश्यक असलेली सिनिअर पीटीसी हा अभ्यासक्रमही केला. रूढार्थाने बाबा पदवीपर्यंत शिकले नव्हते. पण त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारलेली होती. त्याची प्रचिती त्यांच्या न्यायालयातील प्रकरणात आली.

खरं तर प्रकरण पदोन्नतीचे होते. कायद्याचा किस पाडणारे होते. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेने बाबांना डावलून अन्य शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर पदोन्नत केले. त्याविरोधात बाबा न्यायालयात गेले. शासकीय आदेशात पदोन्नतीसाठी असलेल्या Seniority cum Merit या नियमाचा जो अर्थ नोकरशाही लावत होते, त्यालाच बाबांनी न्यायालयात आव्हान दिले होते. नोकरशाही शैक्षणिक गुणवत्ते (Merit)पेक्षा सेवाज्येष्ठते (Service Seniority)ला प्राधान्य देत होते. Seniority cum Merit चा अर्थ पदोन्नतीत शैक्षणिक गुणवत्ते (Merit)ला सेवाज्येष्ठते (Service Seniority)पेक्षा अधिक प्राधान्य देणे असा होतो, अशी बाबांची भूमिका होती. बाबांची भूमिका खालच्या न्यायालयाने मान्य केली. नगरपरिषद व संबंधित शिक्षक त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले. बाबांचे मित्र व ज्येष्ठ वकील स्व. बढीये यांनी या प्रकरणात बाबांना ज्येष्ठ वकील निरुपमा हरदास यांच्याकडे पाठविले. कायद्यांचा कोणताही अभ्यास नसतानाही बाबांनी ज्यापद्धतीने ती केस समजावून सांगितली त्यामुळे हरदास मॅडम बाबांच्या बाबत सतत आदराची भूमिका ठेवून होत्या. त्यामुळेच उच्च न्यायालयातही बाबा जिंकले आणि मुख्याध्यापकही झाले.

बाबा सश्रद्ध होते. परमेश्वरावर त्याची श्रद्धा होती. भगवान विश्वकर्मावर तर त्यांची केवळ श्रद्धाच नव्हती, तर तो त्यांच्या अभ्यासाचाही विषय होता. वेद, पुराण, उपनिषद यात भगवान विश्वकर्मावर असलेली माहिती त्यांनी संकलित केली. त्यासाठी ते थेट काशी, गयेपर्यंत गेले. तेथून पुस्तके आणली. संस्कृत भाषा जाणून घेतली व त्यातून आकाराला आले, भगवान विश्वकर्मावरचे पुस्तक. हे पुस्तक केवळ भगवान विश्वकर्माचीच ओळख करून देत नाही, तर विश्वकर्मामय समाजाचीही ओळख करून देणारे आहे. या पुस्तकासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले त्याबाबत प्रसिद्ध विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांनीही कौतुक केले होते. त्यांनीच या पुस्तकाला प्रस्तावनाही दिली. बाबांचे ज्ञान किती बहुरंगी, बहुआयामी होते, याची प्रचिती हे पुस्तक देते.

आजही बाबांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ते कधी भेटले की बाबांबाबत अतिशय आदराने बोलतात, तेव्हा मन भरून येते. अभिमान वाटतो, ते माझे बाबा असल्याचा. भलेही संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे बाबांना कोणताही शासकीय गौरव मिळाला नाही व त्यासाठी बाबांनी प्रयत्नही केले नाहीत. पण धामणगावच्या आमच्या घरातील लोखंडी पेटीत जमा करून ठेवलेल्या अनेक शालींचे मोल त्या गौरवांपेक्षाही अधिक आहे. या शाली म्हणजे बाबांच्या विद्यार्थिप्रियतेचे मेडल्स आहे. आणिबाणीच्या काळात बाबांना पोलिस कधी नेतील, याची सतत भिती वाटायची. पण पोलिस दलात असलेल्या काही विद्यार्थ्यांमुळे बाबा त्या अटकेपासून दूर राहिले आणि त्यामुळे कारावासात असलेल्या अनेक स्वयंसेवक बंधूंच्या घरांकडे लक्ष देणे, त्यांच्या कुटुंबियांना मदत करणेही बाबांना शक्य झाले. आज ते सारं सारं काही आठवते.

पण तरीही मूळ मुद्दा येतोच, असे असूनही बाबांसोबतचे माझे संबंध तणावाचे का राहिले? गेल्या २५ वर्षांपासून तो प्रश्न अनेकांकडून मला सतत आणि सतत विचारल्या गेला आहे. त्याला आजवर मी उत्तर दिलेही नाही. त्यामुळे मी टीकेचा धनीही झालो. हितसंबंधितांनी त्याचा गैरवापर माझ्याविरोधातही केला. पण तरीही स्व. बाबांनी ज्या बाबी मी कधीही जाहीर करू नये, असा शब्द घेतला, त्या बाबी टाळून काही गोष्टी स्पष्ट करणे मला आज एक वर्षानंतर आवश्यक वाटते. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छतो. माझे बाबांसोबतचे गेले 25 वर्षातले सारे संबंध तणावाचेच होते, हे पूर्णसत्य नाही. ते अर्धसत्य आहे. आमच्यातले संबंध ताणले गेले ते २५ वर्षांपूर्वी. मी आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतल्यानंतरच. त्याला त्यांचा विरोध होता. बाबांच्या नसानसातून वाहणारे रक्त संघाचे असून, संघाचा विचार ते जगत असतानाही त्यांनी माझ्या आंतरजातीय विवाहाला विरोध करणे अनाकलनीय होते. परंतु त्यांनी तो केला. त्यामागे तीन छोट्या बहिणींचे विवाह, समाजातला विरोध ही कारणे असू शकतात. त्यामुळे ते निष्ठावंत संघस्वयंसेवक असूनही त्यांच्या विरोधाला मी गैर वा चूक मानत नाही. पण भगवान विश्वकर्मांवरील पुस्तकाच्या लिखाणाच्या निमित्ताने ते सर्वप्रथम माझ्या घरी आलेत व राहिलेही. त्या वास्तव्यानंतर ते निवळले होते. आमच्यातला तणावही संपला होता. पण नंतरच्या काळात काही अशा गोष्टी घडत गेल्या त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. इतकेच नाही तर नंतरच्या अनेक भेटीत त्यांची माझ्याकडे येण्याची इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. पण ते का येऊ शकत नाही, याची कारणे त्यांनी मला सांगितली होती. ज्या येथे सांगणे शक्य नाही, कारण ते न सांगण्याचा शब्द बाबांनी माझ्याकडून घेतला आहे. त्यामुळे ती कारणे मी कोठेही, कुणालाही सांगितली नाहीत. माझ्या मौनाचा गैरफायदा काही जवळच्यांनी व काही दूरच्यांनी घेतला. त्याचा फायदा त्यांना लखलाभ होवो. पण एक निश्चित, अखेरच्या काळात बाबांच्या मनात माझ्याबाबत दुजाभाव नव्हता. तणावही नव्हता. त्यांचे एक मोठे समाधान मला आहे. माझा बाप माझ्यासाठी आभाळाएव्हढा होता आणि पुढेही आभाळाएव्हढाच राहील. त्या आभाळाएव्हढ्या बापाला माझी विनम्र श्रद्धांजली.

-    अनंत

1 टिप्पणी: