रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

काल-कपाल कोरे झाले...

काल-कपा कोरे झाले... 



अटलजींच्याच कवितेतील ओळी आहेत... हार नही मानुंगारार नही ठानुंगाकाल की कपाल परलिखता मिटाता हुँ... गीत नया गाता हुँपण काळाच्या कपाळावरील लिखाण आता अखेरचे पुसल्या गेले आहे... ते कपाळ कोरे झाले आहे...त्यावर पुन्हा लिहणारे हात निष्प्रभ झाले... स्तब्ध झाले... निर्जीव झालेत... त्यांचे ते नवीन गीत मौन झाले...पण शब्द जिवंत आहेतते मनात गुंजत आहे... ते पुन्हा गाईल्या जाईलचया विश्‍वासासह अटलजींना विनम्र श्रद्धांजली

"
ठन गई, मौत से ठन गई" या शीर्षकाच्या प्रसिद्ध कवितेत "तू दबे पांव, चोरी छिपे से न आना; सामने वार कर, फिर मुझे आजमां..." या शब्दात मृत्यूला आव्हान देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यूसोबतचा दीर्घ संघर्ष गुरुवार, 16 ऑगस्टला संपला. अटलबिहारी वाजपेयी... 1957 ची सार्वत्रिक निवडणूक स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेसाठीची निवडणूक होती. त्यावेळी जनसंघ छोटा पक्ष होता. वाजपेयींना पक्षाने तीन ठिकाणांहून अर्ज भरण्याचे आदेश दिले. लखनौ व मथुरेतून अटलजी पराभूत झाले; मात्र बलरामपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी पंतप्रधान होते. जनसंघाचे केवळ दोन खासदार लोकसभेत होते. त्यामुळे त्यांना सभागृहात बोलण्यासाठी मिळणारा वेळ तरी कितीसा असणार... विदेश नीतीवर चर्चा सुरू होती. अटलजींना पाच मिनिटांसाठी बोलण्याची संधी मिळाली. अटलजींनी बोलणे सुरू केले आणि त्यांच्या ओघवत्या वाणीने सारे सभागृह अचंबित झाले.... अटलजींचे भाषण ऐकून पंतप्रधान पंडितजींचे उत्स्फूर्त उद्‌गार होते... हा तरुण भविष्यात पंतप्रधान होईल... पंडितजींची भविष्यवाणी खरी ठरली.

ज्या वक्‍तृत्वकलेने पंडित नेहरूंना मोहित केले, त्या वक्‍तृत्वकलेचे गारूड साऱ्या देशावर नंतरच्या अनेक दशके होते. अखेरच्या काळातले मौन झालेले अटलजी पाहून त्यांचे ओघवते भाषण ऐकलेल्या आमच्यासारख्या अनेक अटल-चाहत्यांच्या काळजाला घरे पडतात. अटलजी पाचव्या वर्गात असताना त्यांनी एका भाषणस्पर्धेत भाग घेतला. शिक्षणाधिकारी असलेले त्यांचे वडीलही कार्यक्रमात होते. अटलजी व्यासपीठावर गेले. एक-दोन वाक्‍य बोललेत... आणि पाठ केलेले सारं भाषण विसरून गेले. सारीच फजिती... लहानगा अटल घरी आला तोच मुळी रडत... आईने विचारले काय झाले? त्यांनी सारा किस्सा सांगितला...आई म्हणाली, पाठांतर करून गेले की असेच होते. भाषण मनातून आले पाहिजे. आईचा हा सल्लाच अटलजींच्या अमोघ वक्‍तृत्वाचे बीजारोपण होते. त्यांच्या भाषणातील अस्खलित उर्दू-हिंदीतील ओघवता...मध्येच काही सेकंदांसाठी थबकणारा व नंतर परत धबधब्यासारखा कोसळणारा उत्स्फूर्त शब्दप्रवाह आजही कानात रुंजी घालतो... मला आठवते त्यांच्या सभेची एक आठवण... नेमके वर्ष आठवत नाही. किशोर वयात होतो तेव्हा आम्ही. वर्ध्यात त्यांची जाहीरसभा होती. आम्ही धामणगाववरून त्यांच्या सभेसाठी वर्ध्याला गेलो होतो. अटलजी रेल्वेने वर्ध्यात आले होते. आम्ही किशोरवयीन ग्रुप अटलजींच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर गेला होता. वर्धा स्थानकावर तोबा गर्दी होती. अटलजी आले आणि निघाले...सारी गर्दी त्यांच्या पाठोपाठ स्थानकाबाहेर पडली. नंतर सहज वर्धा स्थानकावरील ओव्हरब्रीजवर गेलो तर तेथे चपला-बुटांचा सडा पडला होता. त्या गर्दीत अनेकांच्या चपला निसटून त्या ब्रिजवर पडल्या होत्या..

आम्ही बाहेर पडलो.. रॅली सुरू होती. आम्ही शाळकरी पोरं... घोषणा देत समोर पळत होतो... अगले पंतप्रधान की बारी, अटलबिहारी अटलबिहारी... अंधेरे मे एक चिंगारी, अटलबिहारी अटलबिहारी... देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो... रॅली वर्धेतील शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. अटलजी उघड्या जीपमधून उतरले. आम्ही पोरं पुतळ्याच्या चौथऱ्याजवळच होतो. आमच्या जवळून अटलजी गेले...आमची कॉलर ताठ... अटलजींनी चौथऱ्यावर चढून पुतळ्याला हार घातला...आमचा आवाज टीपेला पोहोचला होता. देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो... अटलजी हार घालून पलटले. त्यांनी खाली उभे असलेल्या आमच्याकडे पाहिले. त्यांनी स्मित केले... पुन्हा आमच्या घोषणा... देश का नेता कैसा हो... तितक्‍यात अटलजींनी हातानेच आम्हाला थांबण्याचा निर्देश दिला... आम्ही थांबलो. मनात धाकधूक... अटलजी घोषणांमुळे रागावलेत की काय? अटलजी थोडा वेळ थांबले व लगेच म्हणाले, यह नारा ऐसा नही... बोलो... देश का नेता कैसा हो, भगतसिंग जैसा हो... लगेच आमची घोषणा बदलली आणि आमचा उत्साहही वाढला.

अटलजी असे होते. त्यांच्या भाषणाचे गारूड आमच्यासारख्या अनेकांवर होते. युनोत हिंदीत भाषण करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचे तेरा दिवसांचे पंतप्रधानपद सोडतानाचे भावपूर्ण भाषण भारतीय लोकशाहीचे विश्‍लेषण करणारे सर्वोत्कृष्ट भाषण होते. अटलजी मुळात कवीमनाचे. त्यामुळे भाषेची सौम्यता, मधुरता हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असायचे. पण, भिवंडीतील दंगलीनंतर लोकसभेत त्यावर बोलताना कवीमनाच्या अटलजींच्या जिभेवर अक्षरशः संतप्त दुर्गेचा आविष्कारच  दिसून आला. हिंदू आक्रमक का झाला, याचे पुरावे देत "आता हिंदू मार खाणार नाही' असे आक्रमकपणे ठणकावून सांगणारे त्यांचे ते भाषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांची सारी भाषणे अजूनही कानात गुंजतात... त्यांची ती वक्‍तृत्वशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास ओळख होती आणि त्यांच्या त्या ओळखीचे माझ्यासारखे अनेक जण चाहते होते... आहोत आणि पुढेही राहू! अटलजींच्याच कवितेतील ओळी आहेत... हार नही मानुंगा, रार नही ठानुंगा, काल की कपाल पर, लिखता मिटाता हुँ... गीत नया गाता हुँ. पण काळाच्या कपाळावरील लिखाण आता अखेरचे पुसल्या गेले आहे... ते कपाळ कोरे झाले आहे...त्यावर पुन्हा लिहणारे हात निष्प्रभ झाले... स्तब्ध झाले... निर्जीव झालेत... त्यांचे ते नवीन गीत मौन झाले...पण शब्द जिवंत आहेत. ते मनात गुंजत आहे... ते पुन्हा गाईल्या जाईलच, या विश्‍वासासह अटलजींना विनम्र श्रद्धांजली

 ('सकाळ'च्या नागपूर आवृत्तीत शुक्रवार, दि. 17 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा