शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

पवारांची खंत महत्त्वाची

भाजपनेही विरोधी पक्षात असताना संसदेत कामकाज ठप्प पाडले होते. पण त्यांनी तशी चूक केली म्हणून आज तसे करणेे मूर्खपणाचेच आहे. काँग्रेसचा हा मूर्खपणा कठोरपणे थांबवण्याची गरज आहे. विनाकारण गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसला संसदेत एकटं पाडण्याची गरज आहे. तसे करण्याची धमक विरोधकांमध्ये केवळ पवार यांच्यातच आहे. त्यासाठी पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर विरोधी पक्षांना एकत्र केले पाहिजे. तरच काँग्रेसच्या हुकुमशाही मनोवृत्तीला व संसद ठप्प पाडणा-या गोंधळाला थांबवता येईल. अन्यथा काँग्रेसच्या पापात विरोधकही तितकेच सहभागी राहील.
माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्रात “जाणता राजा” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अमृतमहोत्सव दिल्लीत थाटात साजरा झाला. राज्यात अन्यत्रही त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आगामी काळात होतील. अनेकांचे  पवारांशी राजकीय मतभेद असू शकतात, पण त्यांच्या कर्तृत्वाबाबत कोणालाही संशय असू शकत नाही. एक प्रगल्भ, सोज्वळ, अभ्यासू आणि नव्या युवा नेत्यांसाठी त्यांची समाजमान्यता, लोकमान्यता प्रेरक अशीच आहे. त्यांच्यासारखा नेता लाखात एखादा असतो. त्यांना अमृतमहोत्सवानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा…
दिल्लीतील सत्कार कार्यक्रमात पवार यांनी जे मनोगत व्यक्त केले त्यात एक महत्त्वाचे विधान होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे हायकमांड सोनिया व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केले, हे विशेष आहे. खरं तर ती खंत होती. ते म्हणाले, “काहीही झाले तरी संसदेचे कामकाज चालले पाहिजे. लोकांनी तुम्हा-आम्हाला तेथे काम करण्यासाठी निवडून पाठवले आहे.” पवारांना प्रगल्भ नेते का म्हणतात, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या या विधानातून मिळते. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व राष्ट्रहिताला प्राधान्य देणा-या नेत्यांच्या मनात सध्याची संसदेतील स्थिती पाहून कशी अस्वस्थता आहे, हे या विधानातून स्पष्ट होते.
आज नरेन्द्र मोदी सत्तेत आहे. मोदींच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष असतानाही, सर्व तथाकथित सेक्युलर, सोशलिस्ट मोदींच्या आगपाखड करीत असतानाही निवडून आले. आणि केवळ निवडून आले नाही, तर गेल्या दोन दशकातील खिचडी सरकारची संकल्पना मोडीत काढून बहुमताचे सरकार स्थापन केले. मोदींच्या या अभूतपूर्व व दणदणीत विजयाचे शिल्पकार मोदी तर आहेच, पण त्याहूनही महत्वाचे एक कारण आहे. गेल्या 60-70 वर्षात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचा या सत्ताकाळातील नाकर्तेपणाही मोदींच्या विजयाला तितकाच कारणीभूत आहे. ही कटू वास्तविकता समजून घेण्याची लायकी व कुवत सध्याच्या काँग्रेसश्रेष्ठींमध्ये नाही. कधीकाळी 400 च्या घरात खासदार निवडून आणणा-या काँग्रेसला गेल्या निवडणुकीत फक्त 40 खासदार निवडून आणता आले. इतका नीचांक गाठल्यानंतरही काँग्रेस झोपेतून उठण्यास तयार नाही, हे गेल्या काही दिवसात हा पक्ष ज्या पद्धतीने संसदेला वेठीस धरत आहे, त्यावरून दिसत आहे.
गेल्या आठवड्यात केवळ असहिष्णुता हा मुद्दा घेऊन काँग्रेसने संसद चालू दिली नाही. खरं तर या मुद्द्यात तसा दम नव्हता. पण केवळ मोदीला झोडपण्यासाठी अन्य विरोधकही काँग्रेसच्या खेळीत सहभागी झालेत. पण या आठवड्यात तर काँग्रेस स्व-स्वार्थासाठी संसदेत गोंधळ घालत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण न्यायालयात आहे. बरं ते प्रकरण भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर न्यायालयात दाखल झाले का? तसेही नाही. काँग्रेस सत्तेत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाने निर्णय दिला नाही. केवळ सोनिया व राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. न्यायालयाचे निर्देश हे सरकारचे सुडाचे राजकारण कसे होऊ शकते? न्यायालयात हजर राहणे गांधी कुटुंबाला अपमानास्पद वाटते काय? एवढ्याच मुद्द्यावर काँग्रेस खासदार संसदेत गोंधळ घालत आहे. तीन दिवस काम झाले नाही. पक्षश्रेष्ठींच्या मौन संमतीशिवाय असा गोंधळ घालण्याची हिंमत काँग्रेसचे खासदार जन्मात घालू शकत नाही.
हा गोंधळ घालून काँग्रेस केवळ संसदेला वेठीस धरत नाही, ती सा-या देशाला वेठीस धरत आहे. मात्र त्याहूनही अधिक महत्त्वाचे व गंभीर हे आहे की, काँग्रेस अन्य विरोधी पक्षांनाही गृहित धरत आहे. त्या गृहित धरण्याच्या काँग्रेसी मनोवृत्तीला शरद पवार यांच्या विधानाने शह दिला आहे. नाही म्हणायला भाजपनेही विरोधी पक्षात असताना संसदेत कामकाज ठप्प पाडले होते. पण त्यांनी तशी चूक केली म्हणून आज तसे करणेे मूर्खपणाचेच आहे. काँग्रेसचा हा मूर्खपणा कठोरपणे थांबवण्याची गरज आहे. विनाकारण गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसला संसदेत एकटं पाडण्याची गरज आहे. तसे करण्याची धमक विरोधकांमध्ये केवळ पवार यांच्यातच आहे. त्यासाठी पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसेतर विरोधी पक्षांना एकत्र केले पाहिजे. तरच काँग्रेसच्या हुकुमशाही मनोवृत्तीला व संसद ठप्प पाडणा-या गोंधळाला थांबवता येईल. अन्यथा काँग्रेसच्या पापात विरोधकही तितकेच सहभागी राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा