मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

चला केव्हा निघायचे?



सध्या असहिष्णुता पराकोटीला पोहोचली आहे. एव्हरेस्टच्या उंचीवर पोहोचली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्यांच्या तनामनात सहिष्णुता ठासून भरली आहे, अशांचा जीव तर आता कासावीस होऊ लागला आहे. ते मग आपला त्रागा काढणार कसा? त्यातही प्रतिगामी विचाराचे, धर्मांध, जात्यंध, असहिष्णु, हुकुमशाही मनोवृत्तीची सत्ता दिल्लीत, तसेच महाराष्ट्रातर अनेक राज्यांमध्ये असताना तर अंगाची काहिली व्हायला होते. अशा स्थितीत पूरस्कार परत करण्याशिवाय आपल्यासारख्या अतिसहिष्णुंच्या हातात राहतेच काय? आतापर्यंत काही पर्यायच नव्हता... पण बरे झाले... आमच्या मदतीला किरण राव-खान या धावून आल्या. त्यांचाही जीव असहिष्णुतेमुळे कासावीस होत होत्या... शेवटी सहनशीलतेलाही सीमा आहेच... एका निवांत एकांत क्षणी त्या आपल्या पतीजवळ, म्हणजे आपला सर्वांचा आवडता स्टार अभिनेता आमीरखान याच्याजवळ बोलत्या झाल्या... ''बस्स झाले... मला माझ्या मुलांच्या जीवाची काळजी आहे. हा देशच आता सोडून जावेसे वाटतेय...'' बिच्चारा आमीरखान कळवळला... गहिवरला... आणि एका मुलाखतीत हे जाहीरपणे सांगून गेला... (आता एकांतात किरण राव रडल्याही असतील. पण आमीरने ते काही सांगितले नाही.)

पण सहिष्णु आमीरचे हे गहिवरून सांगणेही अनेकांना पटले नाही. त्याला, बिचाऱ्याला अक्षरशः झोडपणेच सुरू केले. आमचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार आहेत. त्यांना या तीव्र टीकेत असहिष्णुता दिसली. आता एकाने म्हटले, टीकेचा अधिकार आमीरला आहे, तर तो मग '... पाकिस्तानात हाकला', असे म्हणणाऱ्या साक्षी महाराजांनाही आहे. अरेरे... किती हा मुर्खपणा? साक्षी महाराजासारख्या असहिष्णु माणसाला असा सहिष्णुतेचा अधिकार असतो काय? सहिष्णुतेचा अधिकार फक्त पुरोगाम्यांचा... धर्मनिरपेक्षतावाद्यांचा... समाजवाद्यांचा... डावावाद्यांचा... आणि हो... तो अधिकार फक्त आणि फक्त हिंदुत्वासारख्या बुरसटलेल्या विचारांचा विरोध करणाऱ्यांचाच... तो साक्षी महाराजांना कसा असणार? तो असेल तर फक्त आमीर - किरणसारख्या सहिष्णु व्यक्तींनाच!

असेच एक आमचे वकीलमित्र आहे. तेही सहिष्णु कुळातले. त्यांनी आमीर मुलाखतीत नेमके काय बोलला, हे सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये नमूद केले. बरोबर आहे. आमीर बोलला इंग्रजीत. आणि आम्हाला कोठे समजते इंग्रजी? आपण आपले तुटकंफुटकं इंग्रजी शिकलो धामणगावसारख्या खेडवळ शहरात... त्यामुळे आपण मुळातच 'मतिमंद'च्या धर्तीवर 'आंग्लमंद'. जाऊ द्या... मुद्दा आहे, आमीर काय बोलला याचा... तो म्हणाला...

"As an individual, as a citizen, certainly I have also been alarmed, I can't deny it, by a number of incidents, For us, as Indians, to feel a sense of security, two-three things are important. The sense of justice gives a lot of security to the common man. The second thing, that is important, are the people who are the elected representatives, at the state level or the level of the Centre… when people take law in their own hands, we look upon these representatives to take a strong stance, make strong statements and speed up the legal process to prosecute such cases. It doesn't matter who the ruling party is.

(Wife)Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That's a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet..."

आमच्या वकीलमित्राने हे छान केले. इंग्रजी आणि त्याचा अर्थही देऊन टाकला. नाही तर आम्ही आंग्लमंद समजलो असतो की , 'आपण भारत सोडू' असेच किरणने म्हटले. आता 'आपण देश सोडायचा का' असा विचार डोक्‍यात येण्यासाठी कोठेतरी ती भावना मनात असायला हवी ना... पण जाऊ द्या. आमच्या वकीलमित्राचेच खरे मानू आपण... नाही तर असहिष्णुतेचा शिक्का बसायचा आमच्यावर.
पण आमीरला आताच असहिष्णुता कशी काय जाणवायला लागली, हे काही आम्हाला कळतच नव्हते. ती कमतरता वरच्या इंग्रजी मजकुराने दूर केली. आमीर महत्त्वाचे बोलला... तो म्हणाला, केंद्रातले वा राज्यातले लोकप्रतिनिधी कायदा हातात घ्यायला लागलेत... भडक भाषा वापरायला लागलेत... हे खरे दुखणे आहे... ही स्थिती अलीकडच्या वर्षभरातील आहे. हे आमीर स्पष्ट म्हणाला नाही... पण त्याला म्हणायचे तेच आहे... वर्षभरापूर्वी कोठे होती, अशी असहिष्णुता? गुजरातमध्ये आणि दिल्लीतही कॉंग्रसचे सरकार असताना अनेक भीषण दंगली झाल्यात. पण तेव्हाची सत्ताधारी कॉंग्रेस सहिष्णु कुळातील होती ना... मुंबईत जेहादी धर्मांधांनी नंगा नाच घातला, हुतात्मा स्मारकाला लात मारली... पण सरकार सहिष्णु होते. मुस्लीम घटस्फोटित महिलांना न्याय देणारा न्यायालयाचा निर्णय बदलणारा कायदा झाला. पण सरकार सहिष्णु होते. काश्‍मिरातून हिंदू पंडितांना पळून यावे लागले. पण सरकार सहिष्णु होते. दाभोळकरांची हत्या झाली. पण सरकार सहिष्णु होते. अशी यादी खूप मोठी होईल... पण, सरकार सहिष्णु असले की सारी पापं गंगेला...नाही... नाही... उगाच गंगा म्हटले तर पुन्हा आम्ही प्रतिगामी होऊ... तर सरकार सहिष्णु असले की पापं ही पापं नसतातच... वरची यादी ही पापं नव्हतीच... पापं कोणती...? तर मोदींच्या काळातली दंगल... भाजपा सत्तेत असताना झालेला अखलासचा मृत्यू... कॉंग्रेसच्या काळात झालेल्या हत्येचे आरोपी भाजपा सरकारकडून न सापडणे... ही पापे आहेत...

आता ईतकी पापे होत असताना कसं रहावंसं वाटेल अशा असहिष्णु देशात? आता नक्की... देश सोडायचाच... बॅग भरायला हवी...

- अनंत