या देशाच्या राज्यघटनेने व प्रशासकीय यंत्रणेने आदिवासी समाजावर केवळ आणि केवळ अन्यायच केला व त्यांना न्याय देण्यासाठीच नक्षल चळवळीचा जन्म झाला, असे उर बडवून सांगणाऱ्या माओवादी नक्षली चळवळीचे खरे रूप, त्यांची चाल व त्यांचे चरित्र गेल्या काही दिवसांतील त्यांच्या हिंसक कारवायांनी उघड केले आहे. स्वतःला आदिवासींचे तारणहार असल्याचे नक्षलवादी ऊर बडवून सांगतात, त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करतात... पण हा केवळ दिखावा आहे व त्यांना आदिवासींबाबत कोणतीही दयामाया, सहानुभूती नाही, हेच या घटनांनी सिद्ध केले आहे.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिला आठवडा या पंधरा दिवसांच्या कालावधीत नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सात निरपराध आदिवासींची अमानवीय पद्धतीने हत्या केली. कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी व लालसु मासा कुळयेटी, एटापल्ली तालुक्यातील ताडगुळा येथील सोनसाय बेग, धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथील गिरमा कुडयामी आणि समरु ही त्यांची नावे. नक्षल्यांनी केवळ यांना मारलेच नाही... तर, क्रौर्याची परिसीमा गाठत त्यांची प्रेते बेवारस पद्धतीने फेकूनही दिलीत.
मृतदेह रस्त्यावर बेवारस फेकून देण्याला मानवता म्हणावी काय?
|
गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी कसनुर व तुमीरगुंडा गांवादरम्यानच्या बोरिया जंगलात नक्षल्यांच्या एका मोठ्या शिबिराला पोलिसांनी वेढा घातला व त्यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षलवादी साईनाथ, जिल्हा सचिव श्रीनिवास व अन्य प्रमुख दलम कमांडरसह 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्याचा वचपा नक्षली या पद्धतीने काढत आहे.
बोरिया जंगलातल्या चकमकीनंतर एक मानवतेचे व मानवाधिकाराचे ढोंग करणारी समिती या भागात गेली होती. ही चकमक खोटी आहे, निष्पाप आदिवासींना वेढून पोलिसांनी मारले, अशी उरबडवेगिरी या समितीने केली होती. पोलिस चकमकीत नक्षली मारले गेले की, त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवणाऱ्या व त्यासाठी ओरडणाऱ्या या विचारवंत (?) उरबडव्यांची मानवीयता, मानवाधिकार-प्रेम नेमकी नक्षली आदिवासींची हत्या करतात, तेव्हा कुठे जाते, हा प्रश्न आम्हाला पडतो आहे. या ढोंगी विचारवंताच्या लेखी मानवाधिकार केवळ नक्षल्यांनाच हे का? नक्षल्यांच्या हिंसेला बळी पडलेल्या त्या आदिवासी बांधवाच्या मानवाधिकाराचे काय? त्याबाबत हे उरबडवे काहीच का बोलत नाही?
या
मातेचा व तिच्या मांडीवरच्या या निष्पाप बालकाचा काय दोष?
|
कसनुर या गावाला तर नक्षल्यांनी मोठ्या संख्येत वेढा घातला व घराघरात शिरून धिंगाणा घातला. वृद्ध, बालके व महिलांनाही मारहाण केली. सामानांची फेकाफेक केली.... ती दहशत इतकी होती की सारे गावच या घटनेनंतर रिकामे झाले. सारे गावकरी ताडगाव येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात आसऱ्याला गेले. पोलिसांच्या समजावल्यानंतर काही गावकरी परतलेही, पण मृतांच्या कुटुंबियांच्या मनातील दहशत मात्र कायम होती... ते मात्र पोलिस स्टेशनचे आवार सोडून गावात परतले नाही... काय चूक होती त्यांची? मृतांच्या कुटुंबात छोटी मुले होती. एक तर दुधपित्या तान्ह्या बाळाचा पिता होता... या बालकांची निरागसता सोयीची मानवता बाळगणाऱ्या नक्षलसमर्थक कथित विचारवंतांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही का?
या मातेचा व तिच्या मांडीवरच्या या निष्पाप बालकाचा काय दोष? |