रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

काल-कपाल कोरे झाले...

काल-कपाल कोरे झाले... 



अटलजींच्याच कवितेतील ओळी आहेत... हार नही मानुंगा, रार नही ठानुंगा, काल की कपाल पर, लिखता मिटाता हुँ... गीत नया गाता हुँ. पण काळाच्या कपाळावरील लिखाण आता अखेरचे पुसल्या गेले आहे... ते कपाळ कोरे झाले आहे...त्यावर पुन्हा लिहणारे हात निष्प्रभ झाले... स्तब्ध झाले... निर्जीव झालेत... त्यांचे ते नवीन गीत मौन झाले...पण शब्द जिवंत आहेत. ते मनात गुंजत आहे... ते पुन्हा गाईल्या जाईलच, या विश्‍वासासह अटलजींना विनम्र श्रद्धांजली. 

"
ठन गई, मौत से ठन गई" या शीर्षकाच्या प्रसिद्ध कवितेत "तू दबे पांव, चोरी छिपे से न आना; सामने वार कर, फिर मुझे आजमां..." या शब्दात मृत्यूला आव्हान देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यूसोबतचा दीर्घ संघर्ष गुरुवार, 16 ऑगस्टला संपला. अटलबिहारी वाजपेयी... 1957 ची सार्वत्रिक निवडणूक स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेसाठीची निवडणूक होती. त्यावेळी जनसंघ छोटा पक्ष होता. वाजपेयींना पक्षाने तीन ठिकाणांहून अर्ज भरण्याचे आदेश दिले. लखनौ व मथुरेतून अटलजी पराभूत झाले; मात्र बलरामपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी पंतप्रधान होते. जनसंघाचे केवळ दोन खासदार लोकसभेत होते. त्यामुळे त्यांना सभागृहात बोलण्यासाठी मिळणारा वेळ तरी कितीसा असणार... विदेश नीतीवर चर्चा सुरू होती. अटलजींना पाच मिनिटांसाठी बोलण्याची संधी मिळाली. अटलजींनी बोलणे सुरू केले आणि त्यांच्या ओघवत्या वाणीने सारे सभागृह अचंबित झाले.... अटलजींचे भाषण ऐकून पंतप्रधान पंडितजींचे उत्स्फूर्त उद्‌गार होते... हा तरुण भविष्यात पंतप्रधान होईल... पंडितजींची भविष्यवाणी खरी ठरली.

ज्या वक्‍तृत्वकलेने पंडित नेहरूंना मोहित केले, त्या वक्‍तृत्वकलेचे गारूड साऱ्या देशावर नंतरच्या अनेक दशके होते. अखेरच्या काळातले मौन झालेले अटलजी पाहून त्यांचे ओघवते भाषण ऐकलेल्या आमच्यासारख्या अनेक अटल-चाहत्यांच्या काळजाला घरे पडतात. अटलजी पाचव्या वर्गात असताना त्यांनी एका भाषणस्पर्धेत भाग घेतला. शिक्षणाधिकारी असलेले त्यांचे वडीलही कार्यक्रमात होते. अटलजी व्यासपीठावर गेले. एक-दोन वाक्‍य बोललेत... आणि पाठ केलेले सारं भाषण विसरून गेले. सारीच फजिती... लहानगा अटल घरी आला तोच मुळी रडत... आईने विचारले काय झाले? त्यांनी सारा किस्सा सांगितला...आई म्हणाली, पाठांतर करून गेले की असेच होते. भाषण मनातून आले पाहिजे. आईचा हा सल्लाच अटलजींच्या अमोघ वक्‍तृत्वाचे बीजारोपण होते. त्यांच्या भाषणातील अस्खलित उर्दू-हिंदीतील ओघवता...मध्येच काही सेकंदांसाठी थबकणारा व नंतर परत धबधब्यासारखा कोसळणारा उत्स्फूर्त शब्दप्रवाह आजही कानात रुंजी घालतो... मला आठवते त्यांच्या सभेची एक आठवण... नेमके वर्ष आठवत नाही. किशोर वयात होतो तेव्हा आम्ही. वर्ध्यात त्यांची जाहीरसभा होती. आम्ही धामणगाववरून त्यांच्या सभेसाठी वर्ध्याला गेलो होतो. अटलजी रेल्वेने वर्ध्यात आले होते. आम्ही किशोरवयीन ग्रुप अटलजींच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर गेला होता. वर्धा स्थानकावर तोबा गर्दी होती. अटलजी आले आणि निघाले...सारी गर्दी त्यांच्या पाठोपाठ स्थानकाबाहेर पडली. नंतर सहज वर्धा स्थानकावरील ओव्हरब्रीजवर गेलो तर तेथे चपला-बुटांचा सडा पडला होता. त्या गर्दीत अनेकांच्या चपला निसटून त्या ब्रिजवर पडल्या होत्या..

आम्ही बाहेर पडलो.. रॅली सुरू होती. आम्ही शाळकरी पोरं... घोषणा देत समोर पळत होतो... अगले पंतप्रधान की बारी, अटलबिहारी अटलबिहारी... अंधेरे मे एक चिंगारी, अटलबिहारी अटलबिहारी... देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो... रॅली वर्धेतील शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. अटलजी उघड्या जीपमधून उतरले. आम्ही पोरं पुतळ्याच्या चौथऱ्याजवळच होतो. आमच्या जवळून अटलजी गेले...आमची कॉलर ताठ... अटलजींनी चौथऱ्यावर चढून पुतळ्याला हार घातला...आमचा आवाज टीपेला पोहोचला होता. देश का नेता कैसा हो, अटलबिहारी जैसा हो... अटलजी हार घालून पलटले. त्यांनी खाली उभे असलेल्या आमच्याकडे पाहिले. त्यांनी स्मित केले... पुन्हा आमच्या घोषणा... देश का नेता कैसा हो... तितक्‍यात अटलजींनी हातानेच आम्हाला थांबण्याचा निर्देश दिला... आम्ही थांबलो. मनात धाकधूक... अटलजी घोषणांमुळे रागावलेत की काय? अटलजी थोडा वेळ थांबले व लगेच म्हणाले, यह नारा ऐसा नही... बोलो... देश का नेता कैसा हो, भगतसिंग जैसा हो... लगेच आमची घोषणा बदलली आणि आमचा उत्साहही वाढला.

अटलजी असे होते. त्यांच्या भाषणाचे गारूड आमच्यासारख्या अनेकांवर होते. युनोत हिंदीत भाषण करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचे तेरा दिवसांचे पंतप्रधानपद सोडतानाचे भावपूर्ण भाषण भारतीय लोकशाहीचे विश्‍लेषण करणारे सर्वोत्कृष्ट भाषण होते. अटलजी मुळात कवीमनाचे. त्यामुळे भाषेची सौम्यता, मधुरता हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असायचे. पण, भिवंडीतील दंगलीनंतर लोकसभेत त्यावर बोलताना कवीमनाच्या अटलजींच्या जिभेवर अक्षरशः संतप्त दुर्गेचा आविष्कारच  दिसून आला. हिंदू आक्रमक का झाला, याचे पुरावे देत "आता हिंदू मार खाणार नाही' असे आक्रमकपणे ठणकावून सांगणारे त्यांचे ते भाषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांची सारी भाषणे अजूनही कानात गुंजतात... त्यांची ती वक्‍तृत्वशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास ओळख होती आणि त्यांच्या त्या ओळखीचे माझ्यासारखे अनेक जण चाहते होते... आहोत आणि पुढेही राहू! अटलजींच्याच कवितेतील ओळी आहेत... हार नही मानुंगा, रार नही ठानुंगा, काल की कपाल पर, लिखता मिटाता हुँ... गीत नया गाता हुँ. पण काळाच्या कपाळावरील लिखाण आता अखेरचे पुसल्या गेले आहे... ते कपाळ कोरे झाले आहे...त्यावर पुन्हा लिहणारे हात निष्प्रभ झाले... स्तब्ध झाले... निर्जीव झालेत... त्यांचे ते नवीन गीत मौन झाले...पण शब्द जिवंत आहेत. ते मनात गुंजत आहे... ते पुन्हा गाईल्या जाईलच, या विश्‍वासासह अटलजींना विनम्र श्रद्धांजली. 

 ('सकाळ'च्या नागपूर आवृत्तीत शुक्रवार, दि. 17 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध लेख)

रविवार, २० मे, २०१८

जनादेश होता... पण 'नाकारण्याचा'


नाकारलेले काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या
राज्यात सत्ता काँग्रेसची होती. मावळत्या विधानसभेत त्यांचे 120 आमदार होते. म्हणजे स्पष्ट बहुमत होते. त्यांचे हे संख्याबळ या निवडणुकीत तब्बल 42ने कमी झाले. आणि भाजप व धजद हे दोन्ही प्रमुख पक्ष त्या पक्षाच्या विरोधात लढले होते. त्यांच्या निवडून आलेल्या एकूण 104+38=142 जागा व दोन अन्य अशा 144 जागी सत्ताधारी काँग्रेस पराभूत झाली. म्हणजेच जनादेश काय होता? या प्रश्नाचे उत्तर सूर्यप्रकाशाईतके स्पष्ट आहे की कर्नाटकच्या जनतेने जनादेश काँग्रेसला नाकारण्याचा दिला होता. 
---------------------------------------------
कर्नाटकातील सत्तासंघर्षाचे नाट्य अखेर संपले. विधानसभेतील संख्याबळात 38 जागा जिंकून तिसरे स्थान मिळविणाऱ्या धजद (धर्मनिरपेक्ष जनता दल) या प्रादेशिक पक्षाला लॉटरी लागली. या धजदला 78 जागा जिंकून दुसरे स्थान पटकावणाऱ्या काँग्रेस या सर्वात जुन्या देशव्यापी राष्ट्रीय पक्षाने पाठिंबा दिला. दोघांचे संख्याबळ बहुमताच्या 112 या जादूई आकड्याला पार करणारे होते. आणि 104 जागा जिंकणारा पहिल्या स्थानावरचा भाजप त्या आकड्जयावळ पोहचू शकला नाही. त्यामुळे सत्ताकारणाच्या खेळात भाजप पराभूत झाली. भाजपच्या येडीयुरप्पांनी सव्वा दिवसाच्या औटघटकेच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला व वरील संख्यागणितानुसार धजदच्या कुमारस्वामींचा सत्ता भोगण्याचा मार्ग मोकळा झाला.

त्रिशंकू विधानसभेची निर्मिती झाल्यानंतर भाजप व धजद+ काँग्रेस यांची सत्ता स्थापण्यासाठी जेव्हा उठापटक सुरू झाली व प्रकरण सुप्रिम कोर्टाच्या दालनात पोहोचले, तेव्हाच मी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये भाजपने सरकार बनवू नये, असे स्पष्ट म्हटले होते. ती पोस्ट येथे नमूद करणे आवश्यक वाटते. मी म्हटले होते - "माझे वैयक्तिक मत नोंदवायचे असेल तर स्पष्ट म्हणायला हरकत नाही... भाजपाने सरकार बनविण्यास नको होते. प्रथमदर्शनी 104 च्या संख्येत वाढ होण्यासारखे चित्र दिसत नसताना तर बिलकूलच सत्तेच्या मोहात पडायला नको. काँग्रेस व जद ही विळा-भोपळ्याची मैत्री आहे. विळा भोपळ्यावर पडो किंवा भोपळा विळ्यावर पडो... भोपळ्याचा अंत नक्की आहे. त्यामुळे या अनैसर्गिक युतीला फारसे आयुष्य नाहीच. कारण जदचे सर्वेसर्वा देवेगौडा व त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी हे दोघेही विश्वासार्ह नाहीतच. त्यामुळे आगामी एका वर्षातच ही युती तुटणे वा एखादा पक्ष फुटणे हे भवितव्य नक्की होते. अशा स्थितीत भाजपाला संधी होतीच. किंवा आगामी लोकसभा निवडणुकीसोबच कर्नाटक विधानसभेचीही निवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते. त्यातही भाजपचाच फायदा होता. त्यामुळे भाजपने सरकार बनविण्यास नकार द्यायला पाहिजे होते, असे माझे मत आहे."

हे मत व्यक्त केल्यानंतर माझ्या अनेक भाजपाप्रेमी मित्रांनी मला या मताबाबत फोन करून नाराजी व्यक्त केली. आज काय झाले? या साऱ्या प्रकरणात भाजपाचा सर्वात मोठा पक्ष या नात्याने केलेला सत्तेचा दावा योग्य आहे, हे जनतेला माहीत असतानाही जी नामुष्की पक्षावर आली, त्यामुळे झालेल्या बदनामीचे काय? काँग्रेस वा धजदमध्ये फूट पडेल, या अंदाजावर राजकारण खेळायचा दावा अंगलट आला. हे टाळता आले असते. पुढचे भविष्य वर मी नोंदवलेल्या मतानुसारच राहणार आहे... मग थोडा धीर धरला असता तर... चांगले झाले नसते का?

पण या साऱ्या घटनाक्रमात एका महत्वाच्या प्रश्नाचा विचार झाला पाहिजेच. या निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने काय जनादेश दिला होता? हा तो प्रश्न. सध्या कॉग्रेस भलतीच खुश आहे... राहुलबाबा तर स्वर्गानंदात वावरत आहे... भाजपाला बहुमत मिळाले नाही, हे त्यांचे म्हणणे एकदा मान्य करता येईल... म्हणजे भाजपाला सत्ता बनवण्याचा जनादेश नव्हता. मग राहुलबाबा वा त्याच्या चेलाचपाट्यांपैकी कुणीतरी छातीवर हात ठेवून जनादेश काँग्रेसला मिळाला होता, असे छातीठोकपणे सांगू शकतात काय? किंवा त्यांचा कालपर्यंत शत्रू असलेला, या निवडणुकीत ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती, ज्या पक्षाला भाजपची बी टीम म्हटले होते व आता अतिजवळचा मित्र बनलेल्या धजद पक्षाला जनादेश मिळाला होता, असे तरी कुणी म्हणू शकते का? कुणीच ते म्हणू शकत नाही. म्हणजेच बहुमताचा आकडा हा आधार धरल्यास जनादेश ना भाजपाला होता... ना काँग्रेसला होता व ना धजदला.... मग प्रश्न आहे, जनादेश नेमका काय होता?

या निकालाचे निष्पक्ष विश्लेषण केल्यास या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. पण ते विश्लेषण निष्पक्षपणे केले पाहिजे. एक लक्षात घ्या की, राज्यात सत्ता काँग्रेसची होती. मावळत्या विधानसभेत त्यांचे 120 आमदार होते. म्हणजे स्पष्ट बहुमत होते. त्यांचे हे संख्याबळ या निवडणुकीत तब्बल 42ने कमी झाले. आणि भाजप व धजद हे दोन्ही प्रमुख पक्ष त्या पक्षाच्या विरोधात लढले होते. त्यांच्या निवडून आलेल्या एकूण 104+38=142 जागा व दोन अन्य अशा 144 जागी सत्ताधारी काँग्रेस पराभूत झाली. म्हणजेच जनादेश काय होता? या प्रश्नाचे उत्तर सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे की, कर्नाटकच्या जनतेने जनादेश कुणाला सत्तेत बसविण्यासाठी दिला नव्हता, पण सत्मतेत असलेल्या काँग्रेसला नाकारण्याचा मात्र नक्की दिला होता. मग कोणत्या तोंडाने काँग्रेस नाकाने कांदे सोलत आहे? राज्यपालांच्या निर्णयावर कोर्टानेही प्रतिकूल मत व्यक्त केलेले नाही... पण काँग्रेस सतत त्यावर टीका करीत आहे. पण गेले सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसच्या राज्यापालांनी व केद्रातल्या सरकारंनी काय दिवे लावले हे जगजाहीर आहे ना... त्यामुळे खरं तर काँग्रेसला या निवडणुकीत तोंड दाखवण्यासारखीही परिस्थिती नाही. कारण कर्नाटकच्या जनतेने एकमताने काँग्रेसला नाकारण्याचा, तिला सत्तेच्या बाहेर करण्याचा जनादेश दिला आहे.

सध्या भाजपविरोधक संविधानाच्या, नैतिकतेच्या गप्पा मारत आहे. त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो. धजद+ काँग्रेस सत्तेत व धजदचा मुख्यमंत्री बनवण्यात तुम्हाला नैतिकता कशी दिसते? धजद विधानसभेत तिसऱ्या स्थानावर आहे. या पक्षाने निवडणुकीत 218 जागा लढल्या. त्यातील फक्त 38 जागी विजय मिळविला. म्हणजेच 180 जागी त्यांना जनतेने पराभूत केले. मुद्दा एव्हढ्यावरच संपत नाही. जिथे धजद पराभूत झाली, त्या 180 जागांपैकी 148 जागांवर धजदच्या उमेदवारांची अमानत रक्कमही जप्त झाली. म्हणजेच कर्नाटकी जनतेने तर धजदला केवळ नाकारलेच नाही तर सत्तेपासून दूरदूरपर्यंत फेकून दिले. अशा पक्षाला सत्तेत बसवण्यात काँग्रेसची कोणती नैतिकता दिसून येते? खरंतर या प्रकरणात नैतिकतेची पायमल्ली काँग्रेसनेच केली आहे. आणि संविधानाचे म्हणाल तर... जनतेने नाकारलेल्या एका पक्षाने जनतेनेच सत्तेपासून दूर फेकून दिलेल्या दुसऱ्या पक्षाला सत्तेत बसवले.... यातच सारे काही आलं...

- अनंत कोळमकर