शनिवार, २३ जानेवारी, २०१६

रोहितचे हत्यारे कोण?

भावनिक एकटेपण, रिकामेपण निराशेला जन्म देते व मग त्यातून आक्रमकता जन्म घेते. तेच तर आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनसारख्या डाव्या संघटनांना हवे असते. त्यादृष्टीने रोहित soft target होता. रोहितच्या फेसबूकवरच्या घडामोडी त्याच्या त्याच भावनिक प्रवासाचे दर्शन घडवते. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येला ‘हत्या’ म्हणायचेच झाले, तर ती हत्या करणारे मारेकरू म्हणून त्याच्या भावनिक कोंडमा-याचा फायदा घेणा-या त्याच्या संघटनेचेच नाव घ्यावे लागेल.

रोहित वेमुला... हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात शिकणारा, समाजशास्त्रात संशोधन करीत असलेला एक उमदा तरुण. विद्यार्थी संघटनेच्या वादातून रोहित व त्याच्या मित्रांनी विरोधी संघटनेच्या, अभाविपच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. पोलिस तक्रार झाली. रोहित व त्याच्या चार मित्रांना वसतिगृहातून निलंबित करण्यात आले. १७ जानेवारीला त्याने विद्यापीठ वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना मोदी सरकारला व त्याअनुषंगाने संघपरिवाराला ठोकायला एक कोलित मिळाले. रोहितची आत्महत्या सा-या देशभर गाजत आहे. रोहितसारख्या तरुणाची आत्महत्या सा-या समाजमनाला चिंतीत करणारी बाब आहे. पण, त्यावरून सुरू झालेले घाणेरडे राजकारण पाहता या एकूणच प्रकरणाची माहिती करून घेणे आवश्‍यक झाले आहे.

हे लिखाण लांबलचक आहे. पण, या संपूर्ण घटनाक्रमातील वेगवेगळे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडून घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. ते पाहता हे सारे तुकडे एकत्र करण्याची गरज होतीच. त्यामुळेच लेख लांब होण्याचा धोका पत्करावा लागला. हे सारे तुकडे सलगपणे पाहल्यानंतर स्पष्टपणे जाणवते की, रोहितची आत्महत्या दुःखद आहे. पण, त्याहून वाईट आहे, त्याच्या आत्महत्येचे होत असलेले राजकारण. आत्महत्येपूर्वीच्या पत्रात रोहित लिहितो, “Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive.” असे तो म्हणत असतानाही त्याच्या मृत्यूवर राजकारण करण्याचा व त्याच्या भावनांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? म्हणूनच रोहितची ओळख, या प्रकरणाच्या मुळाशी असलेली घटना व त्यानंतर सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप याचा क्रमशः विचार करण्याची गरज आहे.

रोहित वेमुला
एक हुशार विद्यार्थी. संशोधनासाठी त्याने हैद्राबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. आज रोहित आपल्यात नाही. पण त्याचे फेसबूक अकाऊंट बोलके आहे. हे अकाऊंट त्याचा अलिकडला जीवनप्रवास सांगते.
  1. रोहितचे फेसबूक अकाऊंट सुरू झाले, २०१० मध्ये. प्रारंभीच्या पोस्टमध्ये हैद्राबाद विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचा आनंद या अकाऊंटवर दिसतो. नवीन मित्र मिळाल्याचा आनंदही तो येथे प्रकट करतो.
  2. होस्टेलमधल्या त्याच्या खोलीचे फोटो या अकाऊंटवर आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या फोटोंनी त्याने खोली सजवल्याचे दिसते.
  3. त्याच्या फेसबूक वॉलवर बाळकृष्णाचे फोटोही दिसतात. १५ ऑगस्टला देशभक्तीपर गाणी शेअर केलेली दिसतात. मोदींच्या सौरउर्जा प्रकल्पाची स्तुतीही त्याने केली आहे आणि आसाममधल्या दंगलीबाबत भारतीय मीडिया शांत का होता, असा सवालही तो विचारतो.
  4. विज्ञान, संशोधन यावरही तो फेसबूकवर लिहितो.
  5. २०१२मध्ये रोहित बदलू लागतो. आता त्याला अण्णा हजारेंचे आंदोलन भुरळ घालते आणि तो काँग्रेसवर टीका करायला सुरुवात करतो. राहुल गांधींवर जोक करतो. इतकेच नाही तर सुब्रम्हण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर केलेली टीकाही शेअर करतो.
  6. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी तो फेसबूकवर करतो.
  7. २०१३ पासून रोहित केजरीवालचा भक्त बनू लागतो. त्याला आप आवडू लागते. आता मात्र त्याच्या विचारांमध्ये बदल होताना दिसतो. विज्ञान, संशोधन यावरचे लिखाण कमी होते. तो आता हळूहळू कट्टरवादाकडे वळू लागल्याचे दिसून येते.
  8. २०१५ मध्ये रोहित ओवेसी-विचारसरणीला पाठिंबा देऊ लागतो. याचवेळी तो आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशन या संघटनेकडे आकर्षित होतो.
  9. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख अतिरेकी आरोपी याकुब मेमनच्या फाशीला तो विरोध करतो. त्याच्या मृत्यूनंतरच्या नमाजाचे विद्यापीठ परीसरात आयोजन करतो.
  10. विवेकानंदांना मानणारा, बलात्का-यांना फाशीची मागणी करणारा रोहित ते विवेकानंदांवर टीका करणारा आणि याकुबसारख्या देशद्रोही अतिरेक्याच्या फाशीला विरोध करणारा रोहित असा प्रवास हे फेसबूक अकाऊंट दाखवतो. रोहितने विवेकानंदांना fake intellectual, half-witted person अशा शेलक्या उपाध्या देऊन त्यांचा जन्मदिवस विद्यापीठात साजरा करण्यास विरोधही केला आहे.


मूळ संघर्ष व घटनाक्रम
रोहितच्या आत्महत्येच्या मुळाशी आहे, संघ परिवारातील संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) व रोहित ज्या संघटनेचे काम करायचा, ती आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशन (एएसए) या दोन संघटनांमधील संघर्ष. या दोन संघटनांमध्ये तात्विक वाद होताच, पण एएसएने याकुब मेमनच्या फाशीला विरोध करून त्याच्यासाठी विद्यापीठ परीसरात नमाजाचे आयोजन करण्यानं या दोन्ही संघटनांमधील संघर्ष टोकाला पोहोचला.
  • याकूबला ३० जुलै, २०१५ रोजी नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली. त्याच्या फाशीला एएसएने विरोध केला. त्या निदर्शनात रोहित समोर होता. निदर्शकांच्या हातात आक्षेपार्ह घोषणा लिहिलेले फलक होते. ‘’तुम कितने याकुब मारोगे, हर घर से याकुब निकलेगा...’’ अशा आक्षेपार्ह घोषणा या फलकांवर होत्या.
  • या निदर्शनांना व विद्यापीठ परिसरात आयोजित नमाजाला अभाविपने विरोध केला. त्यामुळे संतापून रोहित व त्याच्या सहका-यांनी दि. ३ व ४ ऑगस्ट, २०१५ दरम्यानच्या रात्री अभाविपचा कार्यकर्ता सुशील कुमार याला मारहाण केली. सुशीलला दवाखान्यात भरती करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • या मारहाणीची पोलिसात व विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. विद्यापीठाने प्रारंभिक चौकशी केली. या प्रारंभिक चौकशीत रोहित व त्याच्या सहका-यांना निर्दोष सोडले. पण नंतर चौकशीत सुशीलकुमारच्या वैद्यकीय अहवालाचा विचार करण्यात आला व सुशीलकुमारचेही बयाण घेण्यात आले. चौकशीच्या अंतिम अहवालात रोहित व त्याच्या सहका-यांना दोषी ठरवले. या अहवालावरून विद्यापीठ कार्यकारिणीने रोहित व त्याच्या अन्य चार सहका-यांना विद्यापीठातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
  • यानंतरही विद्यापीठाला एएसएच्या दबावामुळे दोषी विद्यार्थ्यांवरील निलंबनाची कारवाई करता आली नाही. त्यामुळे सुशीलकुमारच्या आईने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने दोषींवर काय कारवाई केली, याची विचारणा विद्यापीठाला केली. नोव्हेंबर २०१५च्या मध्ये न्यायालयाने विद्यापीठाला एक निश्‍चित अवधी देऊन कृती अहवालच मागितला.
  • त्यामुळे विद्यापीठावरचा दबाव वाढला. विद्यापीठाने डिन, परीक्षा नियंत्रक, होस्टेल वार्डन, विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन यांची बैठक बोलावली. त्यात कोणती कारवाई करायची हे ठरविण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीत अगोदर दलित समाजाचा एकही सदस्य नव्हता. त्यामुळे त्यात विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन यांचा समावेश करण्यात आला.
  • या समितीने विद्यापीठ कार्यकारिणीने सूचवलेली निलंबनाची कारवाई कायम ठेवली. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती लक्षात घेऊन ही शिक्षा कमी करण्याची विनंती कुलगुरूंनी कार्यकारिणीला केली. कार्यकारिणीने ती मान्य केली व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केवळ होस्टेल, प्रशासकीय इमारत व विद्यापीठ परिसरातील अन्य सार्वजनिक जागा येथे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली.
  • हा निर्णय होस्टेलच्या मुख्य वार्डनने संबंधित दोषी विद्यार्थ्यांना (रोहित व त्याचे अन्य चार सहकारी) २० डिसेंबर, २०१५ रोजी सांगितला व त्यांच्या खोल्या रिकाम्या करून या निर्णयाची अंमलबजावणी केली.
  • या निर्णयाच्या विरोधात एएसए व काही विद्यार्थी गट कुलगुरूंना भेटले. होस्टेलमधून निलंबन हा सामाजिक बहिष्काराचा प्रकार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच हे निलंबन त्यांनी सिकंदराबादचे खासदार व केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांना पाठवलेल्या पत्रामुळे झाल्याचे म्हटले. विद्यापीठ कार्यकारिणीने घेतलेला निलंबनाचा निर्णय हा दत्तात्रय यांच्या पत्राअगोदरचा आहे, ही बाब विद्यापीठाने त्याचवेळी स्पष्ट केली.
  • होस्टेलमधून निलंबनाच्या आदेशाला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी निलंबित विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली व सुशालकुमारच्या आईच्या याचिकेसोबतच त्याची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. पण, निलंबनाला स्थगिती दिली नाही.
  • निलंबित विद्यार्थी व एएसए यांनी आंदोलन सुरू केले. ३ जानेवारी, २०१६पासून उघड्यावर राहणे, झोपणे सुरू केले. बंद पुकारला.
  • १७ जानेवारी रोजी रोहितने आत्महत्या केली.


आरोप-प्रत्यारोपांचे वादळ
या सा-या घटनाक्रमानंतर मोदी सरकारच्या विरोधात वादळ उठवले गेले. मोदी सरकारनेच रोहितला आत्महत्या करायला भाग पाडले, अशा थाटात हे आरोप होत आहे. ते किती वास्तविक आहेत, हे वरच्या घटनाक्रमावरून स्पष्ट होतेच. पण काही मुख्य आरोपांचा परामर्श घेणे गरजेचे आहे.

आरोप १ – हा प्रकार दलितांवरचा हल्ला आहे.
----- खरं तर या प्रकाराला दलित-दलितेतर वाद असे स्वरूप देणे दुर्दैवी आहे. राजकारणाचा वास तेथेच येतो. कोण्याही तरुणाची अशी आत्महत्या मनाला वेदना देणारीच असली पाहिजे… मग तो दलित असो वा नसो. रोहितच्या ऐवजी एखादा उच्चभ्रु तरुण असता, तर रोहितच्या मृत्यूवर छाती पिटणा-यांना त्याचे दुःख झाले नसते का? याचे उत्तर या छाती पिटणा-यांनी दिले पाहिजे. केवळ राजकारणासाठी असा वाद तयार केला गेला, एव्हढेच यातून दिसते. राहिला प्रश्‍न रोहितच्या जातीचा. त्याचे दोन जाती प्रमाणपत्र समोर येत आहेत. एकात तो ओबीसी आहे, तर दुस-यात एससी. रोहितची आई व काका ते दलित समाजाचे नसल्याचे सांगत आहे. नेमके काय हे चौकशीतूनच समोर येईल.

आरोप २ – निलंबनाची कारवाई हा सामाजिक बहिष्कार होता.
----- होस्टेल वा प्रशासकीय इमारतीत प्रवेशबंदी हा सामाजिक बहिष्कार कसा असू शकतो? दोषी विद्यार्थ्यांना वर्गात, लायब्ररीत जाण्याला बंदी नव्हती. त्यांच्यावरची कारवाई ही शिस्तभंगाची होती व ती कारवाई करण्याचा अधिकार विद्यापीठाला होता आणि राहीलही. विशेष म्हणजे निलंबित विद्यार्थ्यांपैकी एकाने कारवाईनंतर आपला शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला.

आरोप ३ – केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रोहितने आत्महत्या केली.
---- वर नमूद घटनाक्रमावरून केंद्रीय मंत्र्यांचे पत्र विद्यापीठाने कारवाईची शिफारस केल्यानंतर मिळाले आहे. पण, मुद्दा तो नाही. एखाद्या खासदार वा मंत्र्याकडे एखादी तक्रार आली तर त्यावर चौकशी करून कारवाई करा, अशी विनंती करण्याचा अधिकार त्याला आहे की नाही? बंडारू दत्तात्रय यांनी तेच केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी ती तक्रार विद्यापीठाकडे पाठवली. प्रशासनाच्या मान्य पद्धतीनुसार असेच होते. आणि ते आजच नाही, तर काँग्रेसच्या सत्ताकाळापासून तसेच होत आहे व ते योग्यही आहे. विशेष म्हणजे रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात कोठेही तसा उल्लेख केला नाही. कोणावरही दोषारोपण केले नाही आणि कारवाईमुळे आत्महत्या करीत असल्याचेही म्हटले नाही.

आरोप ४ – तक्रारकर्ता सुशीलकुमारला मारहाण झाली नाही. तो दवाखान्यात अपेंडिक्समुळे भरती होता व त्यासंदर्भातच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली.
सुशीलकुमारचा Discharge Report
----- हा आक्षेप अर्धसत्य आहे. सुशीलला मारहाण झाली ३-४ ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास. त्याला अर्चना हॉस्पिटलमध्ये भरती केले त्याच रात्री ४.३० वाजता. त्याच्यावर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली ७ ऑगस्टला. हे सत्य आहे. पण यात दवाखान्याचा Discharge Report पाहिला पाहिजे. हा रिपोर्ट पुरेसा बोलका आहे. यात रुग्णाच्या, म्हणजेच सुशीलकुमारच्या हिस्ट्रीबाबत नमूद केले आहे. त्यात लिहिले आहे – रुग्णावर काही लोकांनी हल्ला केला. त्याला रक्ताची उलटी झाली. त्याचे पोट दुखत होते. डाव्या खांद्यावर मुका मार होता.
म्हणजेच त्याला बेदम मारहाण झाली. त्याला अपेंडिक्स होता. तो माहीत नसावा. त्या अपेंडिक्सला मारहाणीत मार बसला व नंतरची गुंतागुत वाढली. परिणामी शस्त्रक्रिया करावी लागली. हा सारा प्रकार मारहाणीने झाला, हे अमान्य कसे करता येईल.

आरोप ५ – रोहित निर्दोष, निष्पाप होता…
याकुबच्या फाशीविरोधात आक्षेपार्ह फलक घेऊन निदर्शने
करणा-या निर्शकांमध्ये रोहित
---- खरा कळीचा मुद्दा हाच आहे. कोणाच्याही मृत्यूनंतर त्याच्याबाबत वाईट बोलू नये, लिहू नये, असे मानले जाते. पण ज्या पद्धतीने घाणेरडे राजकारण त्याच्या मृत्यूवर सुरू झाले, ते पाहता काही प्रश्‍नांची उत्तरेही शोधावी लागतील. रोहित हुशार होता… उमदा होता… हे सारे मान्य असले तरी तो चुकीच्या मार्गाने लागला होता, हे येथे नमूद करावेच लागेल. देशद्रोही अतिरेकी याकुब मेननविषयी प्रेम असणे, त्याचे प्रदर्शन करणे याला तुम्ही नैतिकता, देशप्रेम म्हणणार आहात काय? देशाच्या न्यायव्यवस्थेने दिलेली ती शिक्षा होती. तरीही त्याला जाहीर विरोध करणे, हा त्या न्यायव्यवस्थेचाही अपमानच आहे. देशद्रोह्याच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून नमाज आयोजित करणे, हाही देशद्रोहच आहे. आणि तोही विद्यापीठ परिसरात…? हा शिस्तभंगच. त्यासाठी कारवाई व्हावी की नाही? विशेष म्हणजे या सा-या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनचा आंबेडकरवादाशी दूरदूरवर संबंध नाही. सध्या डाव्या विचारसरणीने, कम्युनिस्टांनी आंबेडकर, फुले यांची नावे आपल्या सोयीने घेण्याचा प्रघात सुरू केला आहे. या संघटनेलाही त्याच डाव्या विचारसरणीचा वारसा आहे, हे दृष्टीआड करता येत नाही. सुशीलकुमारला केलेल्या मारहाणीत रोहित मुख्य आरोपी आहे. प्रकरण न्यायालयात आहे. रोहितवरचा आरोप खोटा की खरा, हे न्यायालयात ठरले असते. पण तोवर वाट पाहण्याची तयारीही एएसएची नव्हती.

रोहितने आत्महत्या केली. आता त्याच्या मृत्यूचे भांडवल करण्यासाठी व यानिमित्ताने मोदी, भाजप, संघ, अभाविप यांना ठोकण्यासाठी सारे समोर सरसावले आहेत. रोहितचा कळवळा यातल्या कोणालाही नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका करताना रोहितची आत्महत्या ही हत्या असल्याचा आरोप केला. केजरीवाल हे तसेही खूप गंभीरतेने घेण्यासारखे व्यक्तिमत्व नाही. पण त्यांनी केलेले हे विधान मला पटले. रोहितची आत्महत्या ही हत्या आहेच. पण ती केली कुणी?

रोहितची जी सुसाईड नोट प्रसिद्ध झाली आहे, ती पाहता (तिचे खरेखोटेपण चौकशीत सिद्ध होईल.) रोहितची हत्या कुणी केली, याचा अंदाज बांधता येतो. रोहित हळवा आहे… मनस्वी आहे… तो या नोटमध्ये लिहितो – “My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.” बालपणापासून असलेल्या एकटेपणाचा तो बळी आहे. एकटेपणाचा भावनिक कोंडमारा तो सहन करीत होता. पुढे तो लिहितो – “I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this.” 

त्याने त्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट लिहिले आहे. त्याच्या डोक्यात जहर भरणा-या संघटनांना त्याचा हा ‘एम्प्टीनेस’ कसा व का लक्षात आला नाही? ते त्यांचे अपयश नाही का… की रोहितच्या याच एकटेपणाचा, रिकामेपणाचा पुरेपूर फायदा या संघटनांनी घेतला. भावनिक एकटेपण, रिकामेपण निराशेला जन्म देते व मग त्यातून आक्रमकता जन्म घेते. तेच तर आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनसारख्या डाव्या संघटनांना हवे असते. त्यादृष्टीने रोहित soft target होता. रोहितच्या फेसबूकवरच्या घडामोडी त्याच्या त्याच भावनिक प्रवासाचे दर्शन घडवते. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येला ‘हत्या’ म्हणायचेच झाले, तर ती हत्या करणारे मारेकरू म्हणून त्याच्या भावनिक कोंडमा-याचा फायदा घेणा-या त्याच्या संघटनेचेच नाव घ्यावे लागेल.




-      अनंत कोळमकर

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

माल्दा दंगलीवरील नकवींचे चिंतन

कमर नकवी हे मुस्लीम समाजातील प्रगतीशील विचाराचे लेखक, पत्रकार मानले जातात. 'आजतक' वृत्तवाहिनीचे ते ८ वर्षे न्यूज डायरेक्टर होते. नवभारत टाईम्समध्येही ते कायर्रत होते. 35 वर्षांपासून ते पत्रकारितेत आहे व सध्या 'राग देश' नावाचा वेब ब्लॉक लिहितात. नकवी हे हिंदुत्ववादी विचारांच्या जवळचे नाहीत, हे अगोदरच स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. माल्दा येथील दंगलीनंतर त्यांनी 'राग देश'वर एक लेख लिहिला. त्याचा मथळा आहे - 'माल्दा, मुसलमान और कुछ सवाल'. नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे

     सध्या पश्‍चिम बंगालमधील माल्दा येथे झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा सोशल मीडियावर गाजतो आहे. डिसेंबरच्या प्रारंभी एका कट्टर हिंदुत्ववाद्याने लखनौ येथे काढलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावर महिनाभरानंतर थेट माल्दा येथे प्रतिक्रिया उमटली. संतप्त मुस्लीम आंदोलकांनी जाळपोळ केली, सरकारी संपत्तीचे नुकसान केले.... एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊनही कुण्याही सेक्युलर विचारवंताला त्याचा निषेध व्यक्त करावा वाटला नाही... पुरस्कार परत करावा वाटला नाही. या ढोंगीपणावर सोशल मीडियात बरंच लिहिल्या जात आहे. पण मला विशेषत्वाने दखल घ्यावी वाटते ती ज्येष्ठ पत्रकार कमर वहीद नकवी यांच्या लेखाची.

     कमर नकवी हे मुस्लीम समाजातील प्रगतीशील विचाराचे लेखक, पत्रकार मानले जातात. 'आजतक' वृत्तवाहिनीचे ते ८ वर्षे न्यूज डायरेक्टर होते. नवभारत टाईम्समध्येही ते कायर्रत होते. 35 वर्षांपासून ते पत्रकारितेत आहे व सध्या 'राग देश' नावाचा वेब ब्लॉक लिहितात. नकवी हे हिंदुत्ववादी विचारांच्या जवळचे नाहीत, हे अगोदरच स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. माल्दा येथील दंगलीनंतर त्यांनी 'राग देश'वर एक लेख लिहिला. त्याचा मथळा आहे - 'माल्दा, मुसलमान और कुछ सवाल'. नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे

     नकवी यांच्या लेखाच्या मुख्य विषयाकडे येण्यापूर्वी लेखातील दोन मुद्द्यांना स्पर्श करणे आवश्‍यक वाटते. मुस्लीम समाजाच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मुसलमानांचे नेते, उलेमा, मौलवी कधीही लढा देत नाही... पुढे येत नाही, अशी खंत नकवी यांनी या लेखात व्यक्त केली. ती खरीही आहे. पण ही खंत व्यक्त करताना नकवी यांनी तिस्ता सेटलवाडने मात्र असा लढा दिला, असे नमूद केले. तिस्ताने मुसलमानांचे काय भले केले व तिच्या 'सहानुभूती संकलना'तून नेमके कुणाचे भले झाले, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे नकवी यांनी तिस्ताला हे फक्त एका ओळीचे प्रमाणपत्र कशाच्या आधारावर दिले, हे कळत नाही.

     दुसरा मुद्दा आहे, मदरशात राष्ट्रगीत शिकवणार्या मौलानाला मारहाण झाल्याच्या घटनेचा. मीडियाने ही घटना नुकतीच समोर आणली. ही घटना आता घडली नाही, आठ महिन्यांपूर्वीची आहे, ही मारहाण राष्ट्रगीतासाठी झाली नाही, उलट राष्ट्रगीत या मदरशाच्या डायरीत छापले आहे, असे नकवी यांनी या मदरशांमधल्या हिंदू शिक्षकांची साक्ष देऊन नमूद केले आहे. तसे असेल तर बाजारू मीडियाने अशी तद्दन खोटी बातमी देऊन सामाजिक सौहार्द्रतेला नख लावले, असेच म्हणावे लागेल. पण नकवी यांनी हे सांगताना एक बाब मान्य केली आणि ती म्हणजे आठ महिन्यांपूर्वी या मौलानाला मारहाण झाली याचे कारण होते, त्याचे प्रगतीशील असणे व त्याची कट्टरवाद्यांविरोधात असलेली भूमिका. नकवी यांच्या लेखाचाही खरा विषय हाच आहे. मुस्लीम समाजाला प्रगतीशील विचार पटत का नाही

     माल्दा येथील हिंसाचार हिंदू महासभेचा एक नेता कमलेश तिवारी याने लखनौत पैगंबर साहेबांबाबत काढलेल्या अनुद्गारांमुळे घडला. तिवारीच्या बेताल बरळण्याचे कोणालाही समर्थन करता य़ेणार नाही. हिंदी महासभेनेही या बरळण्याचा निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने तिवारीला लगेच गजाआडही केले. मग महिनाभरानंतर त्यावर शेकडो किलोमीटर दूर माल्द्यात प्रतिक्रिया उमटण्यामागचे नेमके कारण काय...? नकवी यांनी हाच प्रश्‍न नेमका विचारला आहे. नकवींनी आणखी काही प्रश्‍न उपस्थित केले आहे. केरळमध्ये एका मुस्लीम व्हिडिओग्राफरने सल्ला दिला की मुस्लीम महिलांनी बुरख्याचा वापर करू नये. त्याचा स्टुडिओ जाळण्यात आला. त्याच राज्यात एका पत्रकार मुस्लीम महिलेने मदरशांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आणले. तिला घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या. त्या सल्ल्यात वा गैरप्रकार उघडकीस आणण्यात कोणती ईशनिंदा होती? त्यात काय ईस्लामविरोधी होते? पण तरीही आपण साधा सल्ला सहन करू शकत नाही... याचा अर्थ इस्लाम म्हणजे असहिष्णु, असा मानावा काय? मुस्लीम समाज काळानुरूप का बदलत नाही? असा सवालच नकवी यांनी उपस्थित केला आहे.

     नकवी यांनी Religious Fundamentalism and Indian Muslims या मथळ्याखाली लिहिलेला मजकूर त्यांच्याच शब्दात वाचणे जास्त श्रेयस्कर आहे. ते म्हणतात -
लेकिन इस हलके से बदलाव के बावजूद भारतीय मुसलिम समाज (Indian Muslim Society) का बहुत बड़ा हिस्सा अब भी कूढ़मग़ज़ है और सुधारवादी कोशिशों में उसका कोई विश्वास नहीं है. वरना ऐसा क्यों होता कि बलात्कार की शिकार इमराना (Imrana Rape Case) और दो पतियों के भँवर के बीच फँसी गुड़िया (The queer case of Gudia, Taufiq and Arif) के मामले में शरीअत के नाम पर इक्कीसवीं सदी में ऐसे शर्मनाक फ़ैसले होते और देश के मुसलमान चुप बैठे देखते रहते! ऐसे मामलों में मुसलमानों का नेतृत्व कौन करता है, उन्हें राह कौन दिखाता है? ले दे कर मुल्ला-मौलवी या उनका शीर्ष संगठन मुसलिम पर्सनल लॉ बोर्ड. राजनीतिक नेतृत्व कभी रहा नहीं. और शहाबुद्दीन, बनातवाला, सुलेमान सैत या ओवैसी सरीखों का जो नेतृत्व यहाँ-वहाँ उभरा भी, धार्मिक पहचान के आधार पर ही उभरा. इसलिए वह मुसलमानों की धार्मिक भावनाओं को ही भड़का कर उन्हें हाँकते रहे. रही-सही कसर तथाकथित सेकुलर राजनीति ने पूरी कर दी, जो वोटों की गणित में कट्टरपंथी और पुरातनपंथी कठमुल्ला तत्वों को पालते-पोसते, बढ़ाते रहे और जानते-बूझते हुए उनके अनुदार आग्रहों के आगे दंडवत होते रहे. इसने मुसलमानों के बीच शुरू हुई सारी सुधारवादी कोशिशों का गला घोंट दिया क्योंकि सत्ता हमेशा उनके हाथ मज़बूत करती रही, जो 'इसलाम ख़तरे में है' का नारा लगा-लगा कर मुसलमानों को भी और सत्ता को भी डराते रहे.”

     नकवी यांनी या लेखातून मुस्लीम समाजातील मुलभूत समस्येला हात घातला आहे. मुस्लीम समाजाची नवी पिढी बदलते आहे. १९८५मध्ये शहाबानोप्रकरणी नकवी यांनी कट्टरवाद आणि मुस्लीम पर्सनल लॉ याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी बोटावर एकट-दुकट मुसलमानांनीच नकवी यांना पाठिंबा दिला होता. पण आता आधुनिक विचारांचे मुसलमान सोशल मीडियावर खुल्या मनाने विचार मांडायला कचरत नाही. मुसलमान समाजाने काळानुरूप बदलण्याची, कट्टरवादाच्या जोखडातून बाहेर पडण्याची, भावनात्मक मुद्द्यांच्या बाहेर येऊन शिक्षण, विकास व विकासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्‍यकता या समाजातले नवविचाराची पिढी सोशल मीडियावर प्रतिपादित करीत आहे आणि हा बदल नकवी यांनाही मान्य आहे. पण त्याचा वेग मंद आहे, हे नाकारता येत नाही.

     लेखाच्या शेवटी नकवी यांनी मुस्लीम समाजाने कशाचा विचार करण्याची गरज आहे, हेही स्पष्ट केले आहे. तेही त्यांच्याच शब्दात वाचणे आवश्‍यक वाटते. ते म्हणतात -

जब तक मुसलमान इस सच्चाई को नहीं समझेंगे और अपनी धार्मिक पहचान से हट कर चीज़ों को देखना और समझना नहीं शुरू करेंगे, तब तक उनकी कूढ़मग़ज़ी का कोई इलाज नहीं है. तब तक उन्हें एहसास भी नहीं होगा कि वह आख़िर अपने पिछड़ेपन और ऐसी जकड़ी सोच से क्यों नहीं उबरते? मुसलमानों को सोचना चाहिए और शिद्दत से सोचना चाहिए कि सुधारवादी और प्रगतिशील क़दमों का हमेशा उनके यहाँ विरोध क्यों होता है? तीन तलाक़ जैसी बुराई को आज तक क्यों ख़त्म नहीं किया जा सका? वे शिक्षा में इतने पिछड़े क्यों हैं? धर्म के नाम पर ज़रा-ज़रा सी बातों पर उन्हें क्यों भड़का लिया जाता है? कहीं लड़कियों के फ़ुटबाल खेलने के ख़िलाफ़ फ़तवा क्यों जारी हो जाता है? कोई क्रिसमस पर ईसाइयों को बधाई देने को क्यों 'इसलाम-विरोधी घोषित कर देता है? मुसलमानों को इन सवालों पर सोचना चाहिए और यह भी सोचना चाहिए कि उनके आसपास उनके बारे में लगातार नकारात्मक छवि क्यों बनती जा रही है? और क्या ऐसा होना ठीक है? मुसलमानों को अपने भीतर सुधारों और बदलावों के बारे में गम्भीरता से सोचना चाहिए.

नकवी यांचे हे चिंतन खरोखर मुस्लीम समाजाला विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. जनमानसात या समाजाबाबत असलेली नकारात्मक प्रतीमा बदलवण्यास सहाय्य करणारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर मुस्लीम विचारवंतानी गंभीरतेने विचार केल्यास इस्लामचा एक सकारात्मक चेहरा समाजासमोर येईल आणि तो सर्वांसाठीच सुदिन ठरेल.


- अनंत कोळमकर