मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

डाव्यांचा प्रसिद्धी-तमाशा

गुरमेहरचे वडील कॅप्टन मनदीपसिंग कारगिल युद्धात शहीद झाल्याबद्दल. गुरमेहरनेच एका छायाचित्रात तसे म्हटले आहे. आता गुरमेहरसारखी हुशार, चाणाक्ष, चळवळीतील विद्यार्थिनाला आपले वडील कोणत्या युद्धात शहीद झाले, हे माहीत नसेल, असे समजायचे का? कॅप्टन मनदीपसिंग हे कारगील युद्धात शहीद झाले नाहीत. ते कुपवारा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. ते शहीदच झाले. पण ते कोठे झाले, हे त्यांच्या या हुशार मुलीला माहीत नाही... तिने त्यांना थेट कारगील युद्धातच शहीद केले... आश्चर्य आहे ना
 शहीद लष्करी जवान कॅप्टन मनदीपसिंग यांची मुलगी गुरमेहर कौर सध्या भलतीच चर्चेत आहे. दिल्ली विद्यापीठातील रामजस महाविद्यालयात एका कार्यक्रमात उमर खालिदला बोलावण्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला. या विरोधातून तेथे संघर्ष झाला. दगडफेक झाली. आता ही गुंडगिरी, दगडफेक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप आहे. हा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे, हे येथे मुख्यत्वाने नमूद करावे लागेल. ती गुंडगिरी, दगडफेक, हाणामारी अभाविप कार्यकर्त्यांनी केली की नाही, हा वेगळ्या संशोधनाचा मुद्दा आहे. ते संशोधन नंतर कधी तरी करू. पण इतके मात्र नमूद करायला हरकत नाही की या हाणामारीची दुसरीही बाजू पुढे येत आहे...

मुद्दा आहे गुरमेहरचा. रामजस महाविद्यालयात संघर्ष झाला तेव्हा गुरमेहर कौर तेथे नव्हती. या संघर्षाचे काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आले आणि ती प्रचंड कळवळली. तिने या हाणामारीचा, पर्यायाने अभाविपच्या कथित गुंडगिरीचा निषेध केला. अभाविपवर आरोप करण्याचा व अभाविपच्या कथित कृत्याचा निषेध करण्याचा गुरमेहरला पूर्णतः अधिकार आहे. ते तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिचा तो अधिकार कुणीही नाकारू शकत नाही. इथवर सारे काही ठिक होते. पण खरं रामायण पुढे सुरू झाले. गुरमेहरच्या सोशल अकाऊंटवर एकाने तिला शिविगाळ केली व तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. आता इतकी चांगली संधी डाव्या संघटना सोडतील कशा... या मुद्द्यावरून वातावरण तापवण्यास सुरुवात झाली.

गुरमेहरला झालेली शिविगाळ व दिलेली धमकी याचा निषेध झालाच पाहिजे. असे करणारा माणूस असूच शकत नाही. तो जनावरच असावा. पण तो जनावर कोण? तो उघड झाला पाहिजे ना. त्याला समाजासमोर आणले पाहिजे. त्या नराधमाचे नाव सर्वांनाच कळले पाहिजे. पण स्वतःला हिंमतवान म्हणवून घेणारी गुरमेहर त्याबाबत का मौन आहे? इतकेच नाही तर या प्रकरणाची एक-एक कडी उलगडू लागल्याबरोबर या मॅडमने कॅंपेनमधूनच बाहेर पडल्याचा ट्वीट केला आणि दिल्लीही सोडली. अभाविपच्या गुंडगिरीवर हिंमतीने बरसणारी ही वीरांगणा एकदम शांत का झाली? बरं इतकी वाईट व गंभीर धमकी दिली गेली... पण गुरमेहरने पोलिसात तक्रार नाही केली. एव्हढा मोठा गुन्हा तिने जाहीर केला एनडीटीव्हीच्या कॅमेरासमोर. आणि आता तक्रार केली महिला आयोगासमोर. पोलिसात ती का गेली नाही? आश्चर्य हे की गुरमेहरला दिलेल्या धमकीची पोलिसात तक्रार झाली आहे... पण, ती गुरमेहरने केलेली नाही. ती केली आहे विद्यार्थी परिषदेने. या धमकीची चौकशी करा व आरोपींना तातडीने पकडा, अशी मागणीही अभाविपने केली.

एव्हढा गंभीर गुन्हा... सारा देश पेटवला जातोय... स्वतः गुरमेहर मॅडम ते कॅमेरासमोर सांगतात. मग या साऱ्या गुन्ह्याचे मूळ असलेला तो मेसेज कोठे आहे? मी स्वतः मॅडमचे ट्विटर अकाऊंट पाहिले... फेसबुक अकाऊंटही पाहिले... मला तो मेसेज काही दिसला नाही... वाटले आपल्या नजरेत आला नसेल. पण खरी माहिती वेगळीच आहे. हिंमतवाल्या या वीरांगणेने हा मेसेजच डिलीट केला. का बुवा? कारण तो दाखवण्यासारखा नव्हताच... तो दिसला असता, तर सारा तमाशा कसा रचला गेला, हेच दिसून आले असते ना... हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे देबोजित भट्टाचार्य. आयसा या संघटनेचा कार्यकर्ता. म्हणजे गुरमेहरच्याच संघटनेचा. ही संघटना डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना... आता आला सारा कट लक्षात...

प्रथम गुरमेहरचे वडील कॅप्टन मनदीपसिंग कारगिल युद्धात शहीद झाल्याबद्दल. गुरमेहरनेच एका छायाचित्रात तसे म्हटले आहे. आता गुरमेहरसारखी हुशार, चाणाक्ष, चळवळीतील विद्यार्थिनाला आपले वडील कोणत्या युद्धात शहीद झाले, हे माहीत नसेल, असे समजायचे का? कॅप्टन मनदीपसिंग हे कारगील युद्धात शहीद झाले नाहीत. ते कुपवारा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. ते शहीदच झाले. पण ते कोठे झाले, हे त्यांच्या या हुशार मुलीला माहीत नाही... तिने त्यांना थेट कारगील युद्धातच शहीद केले... आश्चर्य आहे ना?

परवा फेसबुकवर एका ज्येष्ठश्रेष्ठ हिंदी पत्रकाराने गुरमेहरला दिलेल्या धमकीचा निषेध केला. तो केलाच पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देताना मीही त्या धमकीचा निषेध केला. सोबत गुरमेहरच्या एका फोटोत तिने हाती घेतलेल्या फलकावर लिहिलेल्या वक्तव्याचाही निषेध केला पाहिजे असे मत व्यक्त केले. झाले... इतक्याशा प्रतिक्रियेने मी प्रतिगामी ठरलो. या फलकावर लिहिले होते "Pakistan did not kill my father. War killed him.” या वक्तव्याचे समर्थन कसे करता येईल? त्याचा निषेध केला पाहिजे, असे म्हणणे चूक कसे ठरू शकते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ एकतर्फी कसे असू शकते... असो... आता तर कारगीलमधील शहीद सौरभ कालीया याच्या वडिलांनीच गुरमेहरला परस्पर उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे... "War did not kill my son. Pakistan killed him.” असो... पण गुरमेहरला पाकिस्तानला खुनी नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची गरज का भासली? यासाठी गुरमेहरच्या मनोवृत्तीकडे जावे लागेल.


आता या गुरमेहरचा एक फोटो सोबत दिला आहे... त्यात ती डाव्या पुरोगामी कथित विचारवंतांसोबत दिसते आहे. व्यासपीठ आहे Action against warmongering या मोहिमेचे. या मोहिमेची गुरमेहर मॅडम कार्यकर्त्या होत्या. काय आहे ही मोहीम... ही मोहीम सुरू झाली उरी येथील सेनेच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झालेत. सारा देश पाकिस्तानवर संतापला होता. पाकिस्तानवर भारताने हल्लाच केला पाहिजे, अशी सर्वसाधारण भावना देशभरात होती. अशा वेळी जेएनयुतील डाव्या पुरोगाम्यांनी सुरू केलेी मोहीम होती - Action against warmongering म्हणजे युद्धोन्मादाविरोधात कृती. या मोहिमेत काय दिली जात होती भाषणे... यात म्हटले जात होते... भारतीय सेना युद्धोन्माद पसरवत आहे. ती युद्धाला भुकेली आहे... भारतीय सेना ही अन्यायकारक आक्रमण करणारी आहे.... गुरमेहर यात समोर होती. भाषणे देत होती. अशी ही गुरमेहर. वडिलांचे हौतात्म्य तिला काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य देते का? आणि तिला जर ते स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या नावावर असेल, तर ते वीरेन्द्र सेहवागलाही आहे अन् रणदीप हुडालाही... वर मी एका आदरणीय पत्रकारांच्या फेसबुक पोस्टचा उल्लेख केला. त्यावरील माझ्या प्रतिक्रियेवर ज्यांनी आपली अक्कल पाजळली त्याला सदर ज्येष्ठश्रेष्ठ हिंदी पत्रकाराने लाईक केले... का केले? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते का? असो या निमित्ताने माध्यम जगतातील लोकही एखाद्या विचाराची किती अंधभक्ती करतात, हे दिसून आले. आणखी पाहु या... पुढचे काही दिवस हा डाव्या पुरोगाम्याचा प्रसिद्धीचा तमाशा कसा चालतो आणि किती दिवस चालतो...

- अनंत कोळमकर

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

हतबल नक्षलवाद्यांचा नवा डाव



(हा लेख `सकाळ'च्या बुधवार, दि. 1 फेब्रुवारी, 2017 रोजीच्या अंकात 'महाराष्ट्र माझा' सदरात 'विदर्भ वार्तापत्र' म्हणून प्रकाशित झाला.)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

  नक्षलवादी चळवळीला आदिवासींमधून मिळणारा पाठिंबा कमी होत चालल्याने पोलिसांना बदनाम करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यात नुकताच समोर आला. पण पोलिस यंत्रणा अधिक दक्ष राहिल्याने हा डाव फसला.
भामरागड तालुक्यातील ताडबौलीच्या जंगलात संशयास्पदरीत्या सापडलेल्या मुलींवर पोलिसांनी अत्याचार केल्याच्या आरोपाने गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली. पण नंतर हा आरोप खोटा असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना बदनाम करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याची मोहीम सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे नक्षलवादी चळवळीतीलस्लिपर सेल्सयानिमित्ताने पुन्हा कार्यरत झाल्याचे दिसून आले आहे.
 
खरे तर एका लहान घटनेतून या बदनामीच्या मोहिमेला सुरवात झाली. वीस जानेवारी रोजी हिद्दूर आणि मुरेवाडा गावाजवळ पोलिस-नक्षलवादी चकमक उडाली. त्यानंतर पोलिसांनी नजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. तेव्हा पोलिसांना दोन तरुणी संशयास्पदरीत्या आढळून आल्या. यानंतर जंगलात आणखीही एक व्यक्ती आढळली. हा जिल्हा नक्षलवादीग्रस्त असल्याने संशयास्पदरीत्या सापडलेल्या या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शोधमोहीम सुरू असताना त्यांना पथकासोबतच ठेवण्यात आले. गडचिरोली येथे त्यांची वैद्यकीय तपासणी व चौकशी करण्यात आली. इथपर्यंत सारे ठीक होते. पण चौकशी सुरू असताना दुसऱ्या दिवशी गट्टा पोलिस मदत केंद्रामध्ये मुरेवाडा येथून दोन व्यक्ती या मुलींचे कथित नातलग बनून आल्या व त्यानंतर या मुलींवर पोलिस जवानांनी अत्याचार केल्याचा आरोप आदिवासी नागरिकांमधून होऊ लागला. सोशल मीडियावरही तसा संदेश फिरू लागला.

पोलिसांनी चौकशीदरम्यान गडचिरोलीतील शासकीय रुग्णालयात दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी केली होती. त्या वेळी नियमानुसार महिला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, या दोघींच्या आई, अन्य तीन महिला तसेच महिला पोलिस अधिकारी उपस्थित होत्या. दरम्यान, या तरुणींनी त्यांच्या कथित नातलगांविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी या नातलगांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर सैनू व शीला गोटा या दाम्पत्याला गडचिरोली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी झिरो माईल्सजवळील एका वकिलाच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. हे सारे प्रकरण उच्च न्यायालयात पोचले. न्यायाधीशांनी या तरुणींची साक्ष त्यांच्या कक्षात नोंदवून घेतली. तेव्हा पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप या तरुणींनी नाकारला आणि पोलिसांना बदनाम करण्याच्या मोहिमेतली हवाच निघून गेली

एकंदरीत ज्या गतीने या प्रकरण तापविण्याचा प्रयत्न झाला, ते पाहता यामागे केवळ काही आदिवासी संघटना असण्याची शक्यता नव्हतीच. पद्धतशीर कटाचा हा भाग असल्याचे जाणवत होते. ते न्यायालयात कथित पीडित तरुणींच्या साक्षीमुळे स्पष्ट झाले. ज्या तरुणींना मराठी वा हिंदी भाषा समजत नाही, ज्या केवळ त्यांच्या आदिवासी भाषेतूनच संवाद साधू शकतात, त्या निष्पाप तरुणींना बळी चढवण्याचाच हा प्रकार होता. पण हा बनाव फसू शकतो, हे या षड्यंत्रामागे असलेल्या सूत्रधारांच्या लक्षात आले नसेल काय? मग तरीही असा खोटा आरोप करण्याचा प्रयत्न का करण्यात आला? ज्या तरुणींना इथली भाषाही समजत नाही, त्यांच्या मदतीला थेट दिल्लीतून वकील कसे काय पोचले? अणि विशेष म्हणजे हा सारा बनाव नेमका कशासाठी करण्यात आला होता? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

गेले काही दिवसांपासून पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अतिशय नियोजनपूर्वक मोहीम उघडली आहे. गुप्तचर यंत्रणा मजबूत केल्यामुळे नक्षलवाद्यांच्या नेमक्या ठिकाणांवर पोलिसांची कारवाई होऊ लागली. या कारवायांची दहशत व सोबतच पोलिसांनी सुरू केलेलीघरवापसीची मोहीम आणि त्याचवेळी आदिवासी जनतेशी सुरू केलेला सुसंवाद यामुळे नक्षलवादी चळवळीतील अनेक आघाडीचे म्होरके शस्त्रे खाली ठेवून पोलिसांना शरण येत होते. आदिवासी जनतेतील त्यांचा आधारही संपत आला होता. त्याचा नक्षलवादी चळवळीला हादरा बसला होताच. पण या चळवळीला खरा हादरा बसला त्यांचे आदिवासी जनतेतील समर्थन कमी होऊ लागल्याने. नक्षलवादी चळवळीत सहभागी करण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ नक्षलवाद्यांवर आली होती. यातून बाहेर पडण्यासाठी पोलिसांना बदनाम करण्याचा व त्या माध्यमातून साऱ्या शासकीय यंत्रणेला हतबल करण्याचा कट रचला गेला. या दोन तरुणींच्या प्रकरणाने ती संधी साधण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. सोशल मीडियावर ज्या माध्यमातून या संदर्भातील संदेश पाठविले गेले, त्या माध्यमांचे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचे सर्वज्ञात आहे. पोलिसांनीही या बदनामीमागे माओवाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. या साऱ्या मोहिमेत माओवाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनसोबतचस्लिपर सेलथिंक टॅंकचेही लोक सहभागी असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीच्या इतिहासात प्रथमच खोट्या आरोपांद्वारे पोलिसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहीम आखण्यात आली. पण पोलिस या प्रकरणात अधिक दक्ष राहिल्याने त्यांचा डाव फसला. नक्षलवादी चळवळीचे जनसमर्थन कमी होत चालल्याच्या हतबलतेतून त्यांच्या म्होरक्यांनी हा डाव खेळला, असेच म्हणावे लागेल.

- अनंत कोळमकर