दैनिक 'सकाळ'च्या नागपूर आवृत्तीच्या दीपावली (2018) विशेषांकात प्रसिद्ध लेख
------------------------------------------------------------------------------------------
2013 मध्ये केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे सरकार होते व या सरकारमध्ये गृहमंत्री होते, पी चिदंबरम. त्यांच्या गृह खात्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की - "सरकारच्या प्रयत्नांमुळे जंगलातील नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे. पण आता जो काही नक्षलवाद जिवंत आहे, तो शहरातल्या त्यांच्या फ्रंटल संघटनांमुळेच...'' नक्षलवाद जिवंत ठेवणाऱ्या शहरी फ्रंटल संघटना, असे ज्या संघटनांबाबत या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, त्या संघटनाचे सदस्य विचारवंत, कलाकार, अभिनेते, लेखक, साहित्यिक, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी समाजसेवक, मानवाधिकार - सिव्हील राईट्ससाठी लढणारे कार्यकर्ते अशी मुखवटे लावून समाजात वावरत असतात. त्यांचे काम माओवादी विचारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणे हेच आहे. आता त्यांना तुम्ही काय नाव देणार? शहरी नक्षली वा शहरी नक्षलवादी..., शहरी माओवादी वा अर्बन नक्सलिस्ट..., की नव-माओवादी...? त्यांना तुम्ही काहीही नाव द्या; मात्र, त्यामुळे वास्तविकता बदलणार आहे का?
-----------------------------------------
सध्या "शहरी नक्षलवादी' (अर्बन नक्सलिस्ट) या शब्दांवर बराच खल सुरू आहे. विशेषतः भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीतून समोर आलेला पंतप्रधानांच्या हत्येचा कट व त्याअनुषंगाने पाच माओवादी विचारवंतांना झालेल्या अटकेच्या घटनाक्रमानंतर ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पण मुळात ही चर्चा आजची नाही. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या "तुकडे-गॅंग'ने जे "भारत तेरे तुकडे होंगे'चे नारे विद्यापीठ परिसरात लावले होते, तेव्हाच "शहरी नक्षलवाद' या शब्दाची चर्चा सुरू झाली होती. पाच तथाकथित विचारवंतांच्या अटकेनंतर या चर्चेला अधिक वेग आला. शहरी नक्षलवाद अथवा शहरी नक्षली असा काही प्रकारच नाही, असा युक्तिवाद डाव्या विचाराचे चळवळे (अक्टिव्हिस्ट) सतत करीत असतात. पण खरंच त्यांच्या या युक्तिवादात किती दम आहे?
आजवर सारी प्रसिद्धीमाध्यमे डाव्या विचारांची बटिक बनून चालत असल्याने हे डावे "चळवळे' जे म्हणतील तीच पूर्व दिशा, असा एक रूढ संकेत होता. अशा स्थितीत या डाव्यांना व माओवाद्यांना आपला विचार, आपला युक्तिवाद पुढे रेटण्यासाठी स्वतः समोर येण्याची गरजच पडत नव्हती. बटिक बनलेली माध्यमेच त्यांची भूमिका ठसवून सांगायचे; अक्षरशः वकिली बाण्याने...! पण आता परिस्थिती बदलली आहे. केंद्रातले सरकार बदलले, हे जसे एक कारण आहे, तसेच सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव व त्यावर सर्वसामान्यांना सहजपणे मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामुळे माध्यमांना डाव्या चळवळीतील फोलपणा व त्यांची वास्तविकता जगजाहीर व्हायला लागली आहे, हे तितकेच महत्त्वाचे कारण आहे. परिणामी बहुतांश माध्यमांनी डाव्यांचे "बटिकपण' झिडकारले आहे. त्यामुळे कथित डाव्या विचारवंतांना चवताळून माध्यमांसमोर यावे लागत आहे व आपला युक्तिवाद टाहो फोडून मांडावा लागत आहे. त्यांचे हे केविलवाणे चवताळणे, चिडणे, ओरडणे, वाहिन्यांवरच्या चर्चेत विरोधी वक्त्यांसाठी "कुत्रा' यासारखे अपशब्द वापरणे, हा सारा प्रकार डाव्याची हतबलता दर्शवित आहे.
मुद्दा आहे, खरंच "शहरी नक्षली' असा काही प्रकार आहे का? माध्यमांमधून तो शब्द प्रचलनात आला व प्रसिद्धही झाला. पण हा शब्दच डावे माओवादी नाकारत आहे. मग नेमकी वास्तविकता काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधले पाहिजे. माझ्यासमोर "हिंदू' या वृत्तपत्रातील एक लेख आहे. "हिंदू' हे काही केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाचे हितचिंतक वृत्तपत्र नाही. उलट ते वृत्तपत्र कथित पुरोगामी विचारांचे व भाजपविरोधी मानले जाते. 8 डिसेंबर, 2010 रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख नक्षलवाद्यांच्या नवीन कार्यपद्धतीची माहिती देणारा आहे. नक्षली कमांडर प्रसाद याने दिलेल्या माहितीचा संदर्भ देऊन या लेखात म्हटले आहे की - ""नक्षलवादाचे शहरी उच्चभ्रू हितचिंतक अगोदरही होते. पण त्याला "केडर'चे रूप नव्हते. नक्षलवाद्यांची पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) ही संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असायची. जंगलातील "दलम' ते हेच. पण सरकारने यावर बंदी आणली व त्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या नवीन स्वरूपात ही संघटना पुढे आली. या नव्या रचनेत केवळ नाव बदलले नाही, तर तिचा आवाकाही बदलला. केवळ जंगल, दुर्गम ग्रामीण भाग, वनवासी, पीडित, वंचित यापुरतेच मर्यादित न राहता ती शहरी भागातही व सुशिक्षित-उच्चभ्रूंमध्ये पोहोचायचे, हे नवे लक्ष्य या संघटनेने समोर ठेवले. हा बदल नक्षली व्यूहनीतीतील सर्वात मोठा धोरणात्मक बदल आहे.''
"शहरी नक्षलवाद' या शब्दाचे मूळ नक्षलवादाच्या या नव्या बदललेल्या धोरणात आहे. तुमच्या-आमच्यासमोर "नक्षली' म्हणताच काहीसा लष्करी गणवेष घातलेला, हातात बंदूक घेतलेला, जंगलात वावरणारा आणि सुरक्षा जवानांच्या विरोधात हिंसक कारवाया करणारा, असे जे चित्र उभे राहते, त्याला या नव्या धोरणाने आमुलाग्र बदलवले. जुने चित्र कायम ठेवून नवीन एक समांतर रचना शहरी, नागरी, औद्योगिक भागात सुरू झाली. त्या रचनेत लष्करी गणवेष, बंदूक, जंगल, हिंसक कारवाया हे दिसत नाही. त्यात उच्चभ्रू पोषाख, राहणीमान असणारी व्यक्तिमत्वे दिसायला लागलीत. पद्धतशीरपणे त्या व्यक्तिमत्वांना मान्यताप्राप्त विचारवंतांचे, ख्यातनाम कलावंतांचे, पुरोगामी लेखकांचे, सर्जनशील साहित्यिकांचे लेबल चिकटवून त्यांचे नवे केडर तयार करण्यात आले. फक्त हे नवे केडर जंगलातल्या केडरपेक्षा दिसायला वेगळे आहे. विचारांच्या बाबत मात्र दोन्ही केडर एकमेकांना पूरक असेच राहिले आहे. नक्षली ज्या कॉम्रेड माओला आपला प्रेरणास्रोत मानतात, त्या माओनेही प्रारंभीच या शहरी केडरचा गांभीर्याने विचार केला होता. माओ या शहरी केडरबाबत स्पष्टच म्हणतो की, "The final objective of the revolution is the capture of the cities, the enemy's main bases, and this objective cannot be achieved without adequate work in the cities.'' (Mao, Selected Works, Vol. II, Pg. 317).
2013 मध्ये केंद्र सरकारच्या गृह खात्याने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात म्हटले आहे की - ""सरकारच्या प्रयत्नांमुळे जंगलातील नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे. पण आता जो काही नक्षलवाद जिवंत आहे, तो शहरातल्या त्यांच्या फ्रंटल संघटनांमुळेच...'' हे प्रतिज्ञापत्र दाखल करणारे केंद्रातले सरकार कॉंग्रेसचे होते व त्या सरकारच्या गृहखात्याचे प्रमुख म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे होते. नक्षलवाद जिवंत ठेवणाऱ्या शहरी फ्रंटल संघटना, असे ज्या संघटनांबाबत या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, त्या संघटनाच म्हणजे नक्षल्यांचे शहरी केडर. या केडरचे सदस्य समाजात विचारवंत, कलाकार, अभिनेते, लेखक, साहित्यिक, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी समाजसेवक अशी मुखवटे लावून वावरतात. आता त्यांना तुम्ही काय नाव देणार? शहरी नक्षली वा शहरी नक्षलवादी..., शहरी माओवादी वा अर्बन नक्सलिस्ट..., की नव-माओवादी...? त्यांना तुम्ही काहीही नाव द्या; मात्र, त्यामुळे वास्तविकता बदलणार आहे का?
नक्षल्यांच्या शहरातील संघटनात्मक रचनेची व कार्याची लिखित संहिता मानली जाणारा एक दस्तावेज आहे. त्याचे नाव आहे - Urban Perspective Plan (UPP). शहरातील नक्षली कार्य कसे करायचे, याचे विवरणच या दस्तावेजातील एका प्रकरणात सविस्तर दिले आहे. त्यातील काही ओळी पहा - "Those organisations, which propagate Party politics, should generally function secretly. Those organisations functioning openly and legally, generally cannot openly identify with the Party, and should work under some cover with a limited programme.'' या ओळींचा अर्थ स्पष्ट आहे की, नक्षलवादाला समर्थन करणाऱ्या शहरी संघटनांनी पडद्याआड राहून गोपनीयपणे काम करावे. या संस्था बाह्य जगतात कायदेशीररीत्या चालाव्यात; मात्र त्यांनी माओवादी पक्षाशी आपले संबंध उघड होऊ देऊ नयेत. लेखाच्या प्रारंभी "हिंदू' वृत्तपत्रातील ज्या लेखाचा उल्लेख केला आहे, त्यात कॉमरेड प्रसाद जी बदललेली रणनीती सांगतो, ती हीच आहे. या रणनीतीनुसार हे शहरी केडर समाजाच्या विविध स्तरात पसरलेले असेल, शहरी, सुशिक्षित, प्रभावशाली व्यक्ती, ज्यात लेखक, साहित्यिक, प्रभावी व आक्रमकतेने विचार मांडणारे वक्ते, कवी, कलावंत, पत्रकार, वकील, समाजात मिसळलेले समाजसेवक हे घटक याचा भाग असेल. त्यांचे मुख्य कार्य दोन असतील. छुपे कार्य व्यवस्थेविरोधीतील बंदुकीचा लढाई लढण्यासाठीचे मनुष्यबळ व पैसा उपलब्ध करून देणे. आणि उघड कार्य माओवादी विचारांना, कार्यकर्त्यांना बाहेर कायदेशीर मदत पुरविणे व माध्यमांद्वारे त्यांची बाजू लावून धरणे. या शहरी संघटना कधी कला मंचाच्या नावाने, कधी मानवाधिकाराच्या नावाने, तर कधी सिव्हील राईट्सच्या नावाने समाजात पसरलेल्या असतात. पण त्यांचा छुपा एजेंडा असतो, माओला अभिप्रेत क्रांती यशस्वी करण्यासाठी नक्षलवादाला, पर्यायाने माओवादी पक्षाला मदत करणे.
आता नक्षलवादाला अशा पद्धतीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना तुम्ही शहरी "केडर' म्हणा की शहरी "दलम, तुम्ही त्यांना "Socalled'' विचारवंत म्हणा किंवा मानवाधिकार - नागरी हक्काचे कार्यकर्ते, त्यांना थेट नक्षलवादी म्हणा की शहरी नक्षली... या साऱ्याचे ध्येय एकच आहे. माओला अभिप्रेत असलेल्या हिंसक क्रांतीद्वारे इथली लोकशाही व्यवस्था उद्वस्त करणे व स्वतःची सत्ता आणणे. संभलपूर (ओडिसा) विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. रजतकुमार कुजूर यांचा एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्याचा विषयच मुळी "भारतातील समकालीन नक्षल चळवळ' हा आहे. नक्षली चळवळीच्या ध्येयाबाबत डॉ. कुजूर यांनी नमूद केलेले विधान महत्त्वाचे आहे. ते लिहितात - "Maoists have always made it very clear that their ultimate political aim is to replace the parliamentary democracy in India and establish their own model of People's Government and for this they need Pan-Indian presence and they are systematically working towards that goal. And remember they are in no hurry." हेच ध्येय पूर्ण करण्यासाठीची नवी रचना आहे व शहरातील केडर हे त्या बदललेल्या रचनेचे एक महत्त्वाचे अंग आहे.
वरच्या सर्व विश्लेषणाच्या संदर्भातून विचार केल्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले कथित विचारवंत, पत्रकार, कार्यकर्ते, वकील या केडरच्या व्याख्येत बसतात की नाही, हे पाहिले पाहिजे. हे सारे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे त्याचा निर्णय वन्यायालय करेलच. पण या कथित विचारवंतांचा इतिहास पाहिला पाहिजे. वारावारा राव कवी आहेत... साहित्यिक आहेत... कॉंग्रेस, एन. टी. रामाराव, चंद्राबाबू नायडू या साऱ्यांच्या सरकारने त्यांना तुरुंगात धाडले आहे. भलेही अनेक प्रकरणात ते निर्दोष सुटले. पण त्यांच्यावर सतत संशय व्यक्त झाला आहे. याचे कारण त्यांची माओवादी विचारसरणी, नक्षलवाद्यांची व त्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करण्याची त्यांची भाषा. दुसरे गौतम नवलखा, बड्या वृत्तपत्रात लिहिणारे पत्रकार आहेत. काश्मिरी लोकांच्या न्यायासाठी, मानवाधिकारासाठी लढणारी संघटना ते चालवतात. पण काश्मिरी अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचा मानवाधिकार केवळ आणि केवळ अतिरेक्यांसाठीच आहे. त्यांना तर काश्मिरात प्रवेश करण्यासही बंदी आहे. मे 2011 मध्ये ते तेथे गेले असता त्यांना श्रीनगर विमानतळावरून परत पाठविले गेले. त्यावेळी काश्मिरी नेते फारुख अब्दुल्ला तर चिडून म्हणाले होते की, ""हा लेखक काश्मिरात येतो कशाला? त्याला काश्मीर पेटवायचे आहे का?'' आता फारुख अब्दुल्ला तर पुरोगाम्यांच्याच वर्तुळातले गणमान्य नाव आहे. सुधा भारद्वाज या वकील आहेत, पण त्या केवळ नक्षलसमर्थकांच्याच केसेस लढतात. वरणनला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावली, त्याचदिवशी त्याने शिक्षेचा कालावधी पूर्ण केला होता. त्यामुळे तो लगेच सुटला. आता त्यामुळे वरणन विचारवंत, निष्पाप, पवित्र तर होणार नाही ना... अरुण परेरा याचाही नक्षली इतिहास आहेच. त्यालाही याअगोदर अटक झाली आहेच आणि तीही कॉंग्रेस सरकारने केली होती. या विचारवंतांवर याअगोदरच्या कथित पुरोगामी सरकारांनीच कारवाई केली आहे. कारण नक्षल्याच्या शहरी व्यूहरचनेतील ही सारी मंडळी महत्त्वाची प्यादी आहेत, असाच आरोप त्यांच्यावर साऱ्याच सरकारांनी ठेवला आहे.
अशी अनेक प्यादी शहरी पुरोगाम्यांच्या कळपात वावरत आहेत. त्यांच्यापैकी काहीजण उघड, तर काहीजण लपूनछपून नक्षलवादाची बाजू घेत असतात. असे जे कथित विचारवंत आहेत तेच गेल्या काही दिवसांत शहरी नक्षलवाद या कल्पनेला नाकारत आहे, "शहरी नक्षली' हा कल्पनाविलास आहे, त्या नावावर सरकार, पोलिस व प्रशासन जे काही सांगत आहे, त्या दंतकथा (Myth) आहेत, असा युक्तिवाद डाव्यांची पुरोगामी पिलावळ ठासून करताहेत... ... या पिलावळीचे एकदा समजू शकतो. पण अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसी नेत्यांनी हे म्हणावे, हेच मुळी आश्चर्य आहे आणि दुर्दैवही. जी बाब चिदंबरम प्रतिज्ञापत्रातून सर्वोच्च न्यायालयात मांडतात, ती बाब कॉंग्रेसने नाकारावे, हे अनाकलनीय आहे. 13 एप्रिल 2006 रोजी नक्षलवादाच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची एक परिषद झाली होती. त्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मुख्य भाषण झाले होते. त्यात ते म्हणाले होते की, "It would not be an exaggeration to say that the problem of Naxalism is the single biggest internal security challenge ever faced by our country." देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका, असे वर्णन डॉ. मनमोहनसिंग ज्याचे करतात, त्या नक्षलवादाच्या शहरी स्वरूपाला, शहरी नक्षलवादाला दंतकथा म्हणणारे सारे पुरोगामी वैचारिक दिवाळखोरीचेच प्रदर्शन करीत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या शहरी नक्षली केडरमधील विचारवंत, मानवाधिकारी, नागरी हक्क कार्यकर्ते, समाजसेवी कायदे-सल्लागार, वैचारिक पत्रकार वगैरे वगैरे... असे जे मोहक मुखवटे होते, त्यांचा असली चेहरा बिभत्स आहे, क्रूर आहे, असामजिक आहे व फुटीरतावादीही आहे. हे मुखवटे मुळात नकली, फसवे आहेत व त्यामागे लपलेले असली चेहरे हे नक्षलवादाच्या हिंसाचाराचे केवळ समर्थकच नाही, तर त्यात सहभागी असणारे आहेत, हे पोलिसांनी आता उघड केले आहे. आपल्याला कोण काय करू शकतो, ही डाव्या माओवाद्यांची गुर्मी होती. पुणे पोलिसांच्या एका कारवाईने ती गुर्मी उतरली आहे. त्यामुळेच माओवादी व त्यांची समर्थक पिलावळ पिसाळली आहे, चवताळली आहे. त्यांची मळमळ आता बाहेर पडत आहे. जेव्हा खोटा, नकली, बेगडी, फसवा मुखवटा फाटतो, तेव्हा जो टराटरा आवाज होतो ना... तोच आवाज डाव्या पुरोगाम्यांच्या "शहरी नक्षलवाद' ही कल्पना नाकारण्यासाठी सुरू केलेल्या आक्रस्ताळी गदारोळातून ऐकू येत होता. पण, या आक्रस्ताळाने "शहरी नक्षलवाद' ही वास्तविकता काही झाकता येणार नाही, हे नक्की.
-अनंत कोळमकर
8605002775