रविवार, १२ मार्च, २०१७

कुठे आहेत साईबाबाप्रेमी?


नक्षल्यांचा मास्टरमाईंड असलेला  दिल्ली विद्यापीठातील प्रोफेसर जी. एन. साईबाबा याच्यावरचा देशविरोधी कारवायांचा आरोप अखेर न्यायालयानेही मान्य केला. त्याच्यावरच्या आरोपाची गंभीरता व त्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ सादर केलेले पुरावे इतके सबळ होते की, न्यायालयाला साईबाबा व त्याच्या चार साथिदारांना जन्मठेपेची शिक्षाच योग्य वाटली. या शिक्षेने व पुराव्यांनी साईबाबाला निष्पाप समजणाऱ्या साऱ्या कथित पुरोगाम्यांचे ढोंग उघडकीस आले आहे व त्यांचे मुखवटे गळून पडले आहे. त्याचमुळे त्या साऱ्यांनी अजून तोंड उघडले नाही. एकंदरीत त्यांची दातखिळी बसल्याचे दिसून येत आहे.

व्हिलचेअरवर प्रो. जी. एन. साईबाबा
प्रो. साईबाबा... दिल्ली विद्यापीठातील एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक. हुशार, बुद्धिमान, पण अपंग... व्हिलचेअरवर जखडलेला. ही स्थिती पूर्ण सहानुभूती मिळवणारी. पण हा माणूस दिसतो तसा नव्हताच... देशभरातील नक्षली चळवळीला पडद्यामागून बौद्धिक पाठबळ देणारा हा माणूस होता. इतकेच नव्हे तर न्यायालयायमोर पोलिसांनी सादर केलेल्या व न्यायालयाने मान्य केलेल्या पुराव्यांच्याच आधारे बोलायचे झाल्यास, गडचिरोली व बस्तरमधील अनेक नक्षली हिंसाचारामागचा मेंदू साईबाबाचा होता. म्हणूनच या कारवायांमध्ये शहीद झालेल्या पोलिस जवानांच्या विधवांनी साईबाबाला जन्मठएप नव्हे, तर फाशीच द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणामुळे जो साईबाबा समोर आला तो एव्हढाच. पण केवळ नक्षली चळवळीचा मेंदू यापेक्षाही खूप काही भयानक आहे, हे सारं काही... गेल्या वर्षी दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणा आठवतात ना... त्याचीच पुनरावृत्ती यंदा दिल्लीच्याच रामजस महाविद्यालयात झाली. या ज्या देशविरोधी विषवल्ली या विद्यापीठात फोफावल्या आहेत ना... त्याला खतपाणी देऊनते वाढवणारा व तरीही पडद्याआड राहणारा तल्लख मेंदू कोणाचा असेल, असा प्रश्न अनेकांना पडत असेल... ? आता एक घटनाक्रम सांगतो. तुम्ही त्यावेळी तो ऐकला असेल... पण आता नेमका तो विसरला गेला असेल... साईबाबासोबत ज्या हेम मिश्रालाही जन्मठेप झाली ना, त्या मिश्राबाबतचा हा घटनाक्रम आहे. हा हेम मिश्रा जेएनयुचा विद्यार्थी आणि साईबाबाचा सहकारी. साईबाबाचा संदेश नक्षली कमांडर नर्मदाक्काला दिण्यासाठी तो गडचिरोलीत आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा मिश्रा नागपूरच्या तुरुंगात बंद होता. खूप प्रयत्नानंतर त्याला जामीन मिळाला. तो कारागृहाबाहेर येताच त्याची गळाभेट दोघांनी घेतली... त्यातला एक होता... उमर खालीद... हो तोच उमर खालीद ज्याच्यावर जेएनयुत देशविरोधी नारे दिल्याचा आरोप आहे... लक्षात घ्या... साईबाबाचा निकटचा सहकारी मिश्रा... त्याला भेटायला दिल्लीचा जेएनयुकांडातील आरोपी उमर थेट नागपुरात येतो.... अशी ही साखळी आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.
गळ्यात बॅग असलेला हेम मिश्रा, तर डावीकडे गडद निळ्या रंगाचा शर्ट घातलेला उमर खलिद नागपूर कारागृहाबाहेर

केवळ इतक्यातच हे संपत नाही... देशात जे पुरोगामित्वाचे नवे ढोंग सुरू झाले आहे, त्याचा चेहराही या साईबाबा प्रकरणाने फाडला आहे. या पुरोगामित्वाचे अनेक म्होरके पुरस्कार वापसीच्या निमित्ताने झळकले आहेत. थोडा शोध घेतला तर यातील बहुतांश चेहऱ्यांचा साईबाबासोबत जवळून वा दुरून तरी संबंध असल्याचे दिसून येते. अरुंधती राय या बाईसाहेबांना कोण नाही ओळखत? त्या तर या पुरोगामी टोळीच्या एक म्होरक्या. साईबाबाला न्यायालयाने जामीन नाकारला... तेव्हा या बाईसाहेबांचा काय जळफळाट झाला. त्यांनी थेट लेखच लिहिला न्यायालयाविरोधात. न्यायालयानेच त्यांना
अरुंधती रॉय
अवमानाच्या आरोपात कोर्टात खेचले होते. साईबाबाप्रेमीत फक्त अरुंधतीच नाही... असे अनेक छुपे नक्षलहितैषी आहेत. त्यांनी तर हजारोच्या संख्येत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील व चौकशी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून साईबाबा निर्दोष आहे, असे रडतभाकत सांगितले होते.

पण आज न्यायालयात ते आपले म्हणणे सिद्ध करू शकलेत काय? गडचिरोली जिल्हा न्यायालयाने आठशेहून अधिक पानांचे निकालपत्र दिले. त्यातील पुरावे साईबाबा किती दोषी आहे, हेच ओरडू ओरडू सांगत आहेत. साईबाबा ज्या नक्षली चळवळीचे नेतृत्व करीत होता त्या चळवळीच्या कार्याबाबत या निकालात सविस्तर विवेचन केले आहे. हिंसक कारवाया व सशस्त्र बंड करून सरकारी येत्रणेला नेस्तनाबूत करणे हे या चळवळीचे मुख्य ध्येय आहे व त्यासाठी त्यांचा मार्ग सांगणारे घोषवाक्य आहे – नक्षलबारी एकही रास्ता... तरीही हे पुरोगामी साईबाबाला निष्पाप, निरागस सांगत होते. साईबाबासारख्या बुद्धिजीवी व्यक्‍तींवर दहशत पसरविण्याचे आरोप ठेवून त्यांना कारागृहात डांबणे हे सरकारी धोरण आहे, असे ओरडू ओरडू सांगत माओवाद्यांनी व कथित पुरोगाम्यांनी साईबाबाच्या अटकेचा निषेध केला होता. आज ते माओवादी, ते पुरोगामी सारे कोठे आहेत? साईबाबाच्या निष्पापतेचे पुरावे न्यालयासमोर का नाही मांडता आले त्यांना? न्यायालयाने निकालात मांडलेले पुरावे सबळ मानले. पण, ते कसे फोल आहेत, हे पुराव्यानिशी सांगण्यासाठी अरुंधती वा तिचे चेलेचपाटे अजून समोर का आले नाहीत?

उत्तर स्पष्ट आहे.. न्यायालयासमोर आलेल्या ज्या पुराव्याच्या आधारे साईबाबा व त्याच्या चार सहकाऱ्यांना जन्मठेपेत पाठवले, ते पुरावेच इतके सबळ व मजबूत होते की ते पाहून साऱ्या ढोंगी पुरोगामी साईबाबाप्रेमींची दातखीळ बसली आहे. पोलिसांचे व त्यांच्या दमदार चौकशीचे कौतूक त्यामुळेच करावे लागते. यानिमित्ताने सज्जनतेच्या बुरख्याआड लपलेले हे नक्षली बुद्धिवंत यानिमित्ताने जगासमोर आले व त्यांचा नक्षली हिंसाचाराला पाठिंबा देणारा बिभत्स चेहरा उघडा पडला...

-    अनंत कोळमकर

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

डाव्यांचा प्रसिद्धी-तमाशा

गुरमेहरचे वडील कॅप्टन मनदीपसिंग कारगिल युद्धात शहीद झाल्याबद्दल. गुरमेहरनेच एका छायाचित्रात तसे म्हटले आहे. आता गुरमेहरसारखी हुशार, चाणाक्ष, चळवळीतील विद्यार्थिनाला आपले वडील कोणत्या युद्धात शहीद झाले, हे माहीत नसेल, असे समजायचे का? कॅप्टन मनदीपसिंग हे कारगील युद्धात शहीद झाले नाहीत. ते कुपवारा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. ते शहीदच झाले. पण ते कोठे झाले, हे त्यांच्या या हुशार मुलीला माहीत नाही... तिने त्यांना थेट कारगील युद्धातच शहीद केले... आश्चर्य आहे ना? 
 शहीद लष्करी जवान कॅप्टन मनदीपसिंग यांची मुलगी गुरमेहर कौर सध्या भलतीच चर्चेत आहे. दिल्ली विद्यापीठातील रामजस महाविद्यालयात एका कार्यक्रमात उमर खालिदला बोलावण्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला. या विरोधातून तेथे संघर्ष झाला. दगडफेक झाली. आता ही गुंडगिरी, दगडफेक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप आहे. हा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे, हे येथे मुख्यत्वाने नमूद करावे लागेल. ती गुंडगिरी, दगडफेक, हाणामारी अभाविप कार्यकर्त्यांनी केली की नाही, हा वेगळ्या संशोधनाचा मुद्दा आहे. ते संशोधन नंतर कधी तरी करू. पण इतके मात्र नमूद करायला हरकत नाही की या हाणामारीची दुसरीही बाजू पुढे येत आहे...

मुद्दा आहे गुरमेहरचा. रामजस महाविद्यालयात संघर्ष झाला तेव्हा गुरमेहर कौर तेथे नव्हती. या संघर्षाचे काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आले आणि ती प्रचंड कळवळली. तिने या हाणामारीचा, पर्यायाने अभाविपच्या कथित गुंडगिरीचा निषेध केला. अभाविपवर आरोप करण्याचा व अभाविपच्या कथित कृत्याचा निषेध करण्याचा गुरमेहरला पूर्णतः अधिकार आहे. ते तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिचा तो अधिकार कुणीही नाकारू शकत नाही. इथवर सारे काही ठिक होते. पण खरं रामायण पुढे सुरू झाले. गुरमेहरच्या सोशल अकाऊंटवर एकाने तिला शिविगाळ केली व तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. आता इतकी चांगली संधी डाव्या संघटना सोडतील कशा... या मुद्द्यावरून वातावरण तापवण्यास सुरुवात झाली.

गुरमेहरला झालेली शिविगाळ व दिलेली धमकी याचा निषेध झालाच पाहिजे. असे करणारा माणूस असूच शकत नाही. तो जनावरच असावा. पण तो जनावर कोण? तो उघड झाला पाहिजे ना. त्याला समाजासमोर आणले पाहिजे. त्या नराधमाचे नाव सर्वांनाच कळले पाहिजे. पण स्वतःला हिंमतवान म्हणवून घेणारी गुरमेहर त्याबाबत का मौन आहे? इतकेच नाही तर या प्रकरणाची एक-एक कडी उलगडू लागल्याबरोबर या मॅडमने कॅंपेनमधूनच बाहेर पडल्याचा ट्वीट केला आणि दिल्लीही सोडली. अभाविपच्या गुंडगिरीवर हिंमतीने बरसणारी ही वीरांगणा एकदम शांत का झाली? बरं इतकी वाईट व गंभीर धमकी दिली गेली... पण गुरमेहरने पोलिसात तक्रार नाही केली. एव्हढा मोठा गुन्हा तिने जाहीर केला एनडीटीव्हीच्या कॅमेरासमोर. आणि आता तक्रार केली महिला आयोगासमोर. पोलिसात ती का गेली नाही? आश्चर्य हे की गुरमेहरला दिलेल्या धमकीची पोलिसात तक्रार झाली आहे... पण, ती गुरमेहरने केलेली नाही. ती केली आहे विद्यार्थी परिषदेने. या धमकीची चौकशी करा व आरोपींना तातडीने पकडा, अशी मागणीही अभाविपने केली.

एव्हढा गंभीर गुन्हा... सारा देश पेटवला जातोय... स्वतः गुरमेहर मॅडम ते कॅमेरासमोर सांगतात. मग या साऱ्या गुन्ह्याचे मूळ असलेला तो मेसेज कोठे आहे? मी स्वतः मॅडमचे ट्विटर अकाऊंट पाहिले... फेसबुक अकाऊंटही पाहिले... मला तो मेसेज काही दिसला नाही... वाटले आपल्या नजरेत आला नसेल. पण खरी माहिती वेगळीच आहे. हिंमतवाल्या या वीरांगणेने हा मेसेजच डिलीट केला. का बुवा? कारण तो दाखवण्यासारखा नव्हताच... तो दिसला असता, तर सारा तमाशा कसा रचला गेला, हेच दिसून आले असते ना... हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे देबोजित भट्टाचार्य. आयसा या संघटनेचा कार्यकर्ता. म्हणजे गुरमेहरच्याच संघटनेचा. ही संघटना डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना... आता आला सारा कट लक्षात...

प्रथम गुरमेहरचे वडील कॅप्टन मनदीपसिंग कारगिल युद्धात शहीद झाल्याबद्दल. गुरमेहरनेच एका छायाचित्रात तसे म्हटले आहे. आता गुरमेहरसारखी हुशार, चाणाक्ष, चळवळीतील विद्यार्थिनाला आपले वडील कोणत्या युद्धात शहीद झाले, हे माहीत नसेल, असे समजायचे का? कॅप्टन मनदीपसिंग हे कारगील युद्धात शहीद झाले नाहीत. ते कुपवारा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. ते शहीदच झाले. पण ते कोठे झाले, हे त्यांच्या या हुशार मुलीला माहीत नाही... तिने त्यांना थेट कारगील युद्धातच शहीद केले... आश्चर्य आहे ना?

परवा फेसबुकवर एका ज्येष्ठश्रेष्ठ हिंदी पत्रकाराने गुरमेहरला दिलेल्या धमकीचा निषेध केला. तो केलाच पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देताना मीही त्या धमकीचा निषेध केला. सोबत गुरमेहरच्या एका फोटोत तिने हाती घेतलेल्या फलकावर लिहिलेल्या वक्तव्याचाही निषेध केला पाहिजे असे मत व्यक्त केले. झाले... इतक्याशा प्रतिक्रियेने मी प्रतिगामी ठरलो. या फलकावर लिहिले होते "Pakistan did not kill my father. War killed him.” या वक्तव्याचे समर्थन कसे करता येईल? त्याचा निषेध केला पाहिजे, असे म्हणणे चूक कसे ठरू शकते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ एकतर्फी कसे असू शकते... असो... आता तर कारगीलमधील शहीद सौरभ कालीया याच्या वडिलांनीच गुरमेहरला परस्पर उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे... "War did not kill my son. Pakistan killed him.” असो... पण गुरमेहरला पाकिस्तानला खुनी नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची गरज का भासली? यासाठी गुरमेहरच्या मनोवृत्तीकडे जावे लागेल.


आता या गुरमेहरचा एक फोटो सोबत दिला आहे... त्यात ती डाव्या पुरोगामी कथित विचारवंतांसोबत दिसते आहे. व्यासपीठ आहे Action against warmongering या मोहिमेचे. या मोहिमेची गुरमेहर मॅडम कार्यकर्त्या होत्या. काय आहे ही मोहीम... ही मोहीम सुरू झाली उरी येथील सेनेच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झालेत. सारा देश पाकिस्तानवर संतापला होता. पाकिस्तानवर भारताने हल्लाच केला पाहिजे, अशी सर्वसाधारण भावना देशभरात होती. अशा वेळी जेएनयुतील डाव्या पुरोगाम्यांनी सुरू केलेी मोहीम होती - Action against warmongering म्हणजे युद्धोन्मादाविरोधात कृती. या मोहिमेत काय दिली जात होती भाषणे... यात म्हटले जात होते... भारतीय सेना युद्धोन्माद पसरवत आहे. ती युद्धाला भुकेली आहे... भारतीय सेना ही अन्यायकारक आक्रमण करणारी आहे.... गुरमेहर यात समोर होती. भाषणे देत होती. अशी ही गुरमेहर. वडिलांचे हौतात्म्य तिला काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य देते का? आणि तिला जर ते स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या नावावर असेल, तर ते वीरेन्द्र सेहवागलाही आहे अन् रणदीप हुडालाही... वर मी एका आदरणीय पत्रकारांच्या फेसबुक पोस्टचा उल्लेख केला. त्यावरील माझ्या प्रतिक्रियेवर ज्यांनी आपली अक्कल पाजळली त्याला सदर ज्येष्ठश्रेष्ठ हिंदी पत्रकाराने लाईक केले... का केले? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते का? असो या निमित्ताने माध्यम जगतातील लोकही एखाद्या विचाराची किती अंधभक्ती करतात, हे दिसून आले. आणखी पाहु या... पुढचे काही दिवस हा डाव्या पुरोगाम्याचा प्रसिद्धीचा तमाशा कसा चालतो आणि किती दिवस चालतो...

- अनंत कोळमकर