नक्षल्यांचा मास्टरमाईंड असलेला दिल्ली विद्यापीठातील प्रोफेसर जी. एन. साईबाबा याच्यावरचा देशविरोधी कारवायांचा आरोप अखेर न्यायालयानेही मान्य केला. त्याच्यावरच्या आरोपाची गंभीरता व त्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ सादर केलेले पुरावे इतके सबळ होते की, न्यायालयाला साईबाबा व त्याच्या चार साथिदारांना जन्मठेपेची शिक्षाच योग्य वाटली. या शिक्षेने व पुराव्यांनी साईबाबाला निष्पाप समजणाऱ्या साऱ्या कथित पुरोगाम्यांचे ढोंग उघडकीस आले आहे व त्यांचे मुखवटे गळून पडले आहे. त्याचमुळे त्या साऱ्यांनी अजून तोंड उघडले नाही. एकंदरीत त्यांची दातखिळी बसल्याचे दिसून येत आहे.
व्हिलचेअरवर प्रो. जी. एन. साईबाबा |
प्रो. साईबाबा... दिल्ली विद्यापीठातील एका महाविद्यालयात
इंग्रजीचा प्राध्यापक. हुशार, बुद्धिमान, पण अपंग... व्हिलचेअरवर जखडलेला. ही
स्थिती पूर्ण सहानुभूती मिळवणारी. पण हा माणूस दिसतो तसा नव्हताच... देशभरातील
नक्षली चळवळीला पडद्यामागून बौद्धिक पाठबळ देणारा हा माणूस होता. इतकेच नव्हे तर न्यायालयायमोर
पोलिसांनी सादर केलेल्या व न्यायालयाने मान्य केलेल्या पुराव्यांच्याच आधारे
बोलायचे झाल्यास, गडचिरोली व बस्तरमधील अनेक नक्षली हिंसाचारामागचा मेंदू
साईबाबाचा होता. म्हणूनच या कारवायांमध्ये शहीद झालेल्या पोलिस जवानांच्या
विधवांनी साईबाबाला जन्मठएप नव्हे, तर फाशीच द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली
आहे.
या प्रकरणामुळे जो साईबाबा समोर आला तो एव्हढाच. पण केवळ नक्षली
चळवळीचा मेंदू यापेक्षाही खूप काही भयानक आहे, हे सारं काही... गेल्या वर्षी
दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणा आठवतात ना... त्याचीच
पुनरावृत्ती यंदा दिल्लीच्याच रामजस महाविद्यालयात झाली. या ज्या देशविरोधी
विषवल्ली या विद्यापीठात फोफावल्या आहेत ना... त्याला खतपाणी देऊनते वाढवणारा व
तरीही पडद्याआड राहणारा तल्लख मेंदू कोणाचा असेल, असा प्रश्न अनेकांना पडत असेल... ? आता एक घटनाक्रम सांगतो. तुम्ही त्यावेळी तो ऐकला असेल...
पण आता नेमका तो विसरला गेला असेल... साईबाबासोबत ज्या हेम मिश्रालाही जन्मठेप
झाली ना, त्या मिश्राबाबतचा हा घटनाक्रम आहे. हा हेम मिश्रा जेएनयुचा विद्यार्थी
आणि साईबाबाचा सहकारी. साईबाबाचा संदेश नक्षली कमांडर नर्मदाक्काला दिण्यासाठी तो
गडचिरोलीत आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा मिश्रा नागपूरच्या तुरुंगात बंद
होता. खूप प्रयत्नानंतर त्याला जामीन मिळाला. तो कारागृहाबाहेर येताच त्याची गळाभेट
दोघांनी घेतली... त्यातला एक होता... उमर खालीद... हो तोच उमर खालीद ज्याच्यावर
जेएनयुत देशविरोधी नारे दिल्याचा आरोप आहे... लक्षात घ्या... साईबाबाचा निकटचा
सहकारी मिश्रा... त्याला भेटायला दिल्लीचा जेएनयुकांडातील आरोपी उमर थेट नागपुरात
येतो.... अशी ही साखळी आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.
गळ्यात बॅग असलेला हेम मिश्रा, तर डावीकडे गडद निळ्या रंगाचा शर्ट घातलेला उमर खलिद नागपूर कारागृहाबाहेर |
केवळ इतक्यातच हे संपत नाही... देशात जे पुरोगामित्वाचे नवे
ढोंग सुरू झाले आहे, त्याचा चेहराही या साईबाबा प्रकरणाने फाडला आहे. या
पुरोगामित्वाचे अनेक म्होरके पुरस्कार वापसीच्या निमित्ताने झळकले आहेत. थोडा शोध
घेतला तर यातील बहुतांश चेहऱ्यांचा साईबाबासोबत जवळून वा दुरून तरी संबंध असल्याचे
दिसून येते. अरुंधती राय या बाईसाहेबांना कोण नाही ओळखत? त्या तर या पुरोगामी टोळीच्या एक
म्होरक्या. साईबाबाला न्यायालयाने जामीन नाकारला... तेव्हा या बाईसाहेबांचा काय
जळफळाट झाला. त्यांनी थेट लेखच लिहिला न्यायालयाविरोधात. न्यायालयानेच त्यांना
अवमानाच्या आरोपात कोर्टात खेचले होते. साईबाबाप्रेमीत फक्त अरुंधतीच नाही... असे
अनेक छुपे नक्षलहितैषी आहेत. त्यांनी तर हजारोच्या संख्येत तत्कालीन गृहमंत्री आर.
आर. आबा पाटील व चौकशी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून साईबाबा निर्दोष आहे, असे रडतभाकत
सांगितले होते.
अरुंधती रॉय |
पण आज न्यायालयात ते आपले म्हणणे सिद्ध करू शकलेत काय? गडचिरोली जिल्हा न्यायालयाने आठशेहून
अधिक पानांचे निकालपत्र दिले. त्यातील पुरावे साईबाबा किती दोषी आहे, हेच ओरडू
ओरडू सांगत आहेत. साईबाबा ज्या नक्षली चळवळीचे नेतृत्व करीत होता त्या चळवळीच्या
कार्याबाबत या निकालात सविस्तर विवेचन केले आहे. हिंसक कारवाया व सशस्त्र बंड करून
सरकारी येत्रणेला नेस्तनाबूत करणे हे या चळवळीचे मुख्य ध्येय आहे व त्यासाठी
त्यांचा मार्ग सांगणारे घोषवाक्य आहे – नक्षलबारी एकही रास्ता... तरीही हे
पुरोगामी साईबाबाला निष्पाप, निरागस सांगत होते. साईबाबासारख्या बुद्धिजीवी व्यक्तींवर दहशत
पसरविण्याचे आरोप ठेवून त्यांना कारागृहात डांबणे हे सरकारी धोरण आहे, असे ओरडू ओरडू सांगत माओवाद्यांनी व कथित पुरोगाम्यांनी साईबाबाच्या अटकेचा निषेध केला होता. आज ते माओवादी, ते पुरोगामी
सारे कोठे आहेत? साईबाबाच्या
निष्पापतेचे पुरावे न्यालयासमोर का नाही मांडता आले त्यांना? न्यायालयाने निकालात मांडलेले पुरावे
सबळ मानले. पण, ते कसे फोल आहेत, हे पुराव्यानिशी सांगण्यासाठी अरुंधती वा तिचे
चेलेचपाटे अजून समोर का आले नाहीत?
उत्तर स्पष्ट आहे.. न्यायालयासमोर आलेल्या ज्या पुराव्याच्या
आधारे साईबाबा व त्याच्या चार सहकाऱ्यांना जन्मठेपेत पाठवले, ते पुरावेच इतके सबळ
व मजबूत होते की ते पाहून साऱ्या ढोंगी पुरोगामी साईबाबाप्रेमींची दातखीळ बसली
आहे. पोलिसांचे व त्यांच्या दमदार चौकशीचे कौतूक त्यामुळेच करावे लागते. यानिमित्ताने
सज्जनतेच्या बुरख्याआड लपलेले हे नक्षली बुद्धिवंत यानिमित्ताने जगासमोर आले व
त्यांचा नक्षली हिंसाचाराला पाठिंबा देणारा बिभत्स चेहरा उघडा पडला...
-
अनंत कोळमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा