दै. सकाळच्या मंगळवार दि. 7 मे रोजी
प्रकाशित झालेला लेख
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या आठवड्यात स्फोट घडवून सरकारी व पोलिस यंत्रणेपुढे गंभीर आव्हान उभे केले आहे. नक्षलवाद्यांची कार्यपद्धती लक्षात घेता ते कुठेही काहीही अघटित घडवू शकतात, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले. त्यांच्या या ढिलाईचा फायदा नक्षलवाद्यांनी घेतला.
हिंसक कारवाया करणारे जंगलातील नक्षलवादी व त्यांचे शहरातील समर्थक यांच्यावर वचक निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचा दावा महाराष्ट्र सरकारने केला आहे. काही नक्षलवादी विचारवंतांना अटक करून तो दावा खरा असल्याचे चित्रही तयार झाले. मात्र त्यामुळे नक्षलवादी चळवळ थंडावली काय? गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भीषण स्फोटाने त्या प्रश्नांची उत्तरे परस्पर दिली आहेत. महाराष्ट्रदिनीच पोलिस जवानांना नेणारे वाहन उडवून देऊन नक्षलवाद्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. सोळा जणांचा बळी घेणाऱ्या या स्फोटाने सरकारच्या दाव्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवडणुकीमुळे कडक बंदोबस्त असतानाही हा स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी सरकारी यंत्रणेला व पोलिस प्रशासनाला जबर आव्हान दिले आहे, यात शंका नाही.
खरेतर या घटनाक्रमाची सुरवात आदल्या दिवशी रात्रीच झाली होती. तीस एप्रिलच्या मध्यरात्री दीडशेहून अधिक नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास जांभूरखेडा गावाजवळ सुरुंगस्फोट घडविला. हा सारा घटनाक्रम व स्फोटाची तीव्रता पाहता अतिशय पद्धतशीरपणे हा सर्व कट रचण्यात आला होता, हे लक्षात येते. या कारवाईत सामील झालेल्यांची संख्या शंभराच्या घरात, किंबहुना त्याहून अधिक असली पाहिजे. विशेष म्हणजे जेथे हा स्फोट व जाळपोळ झाली, तो भाग गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे व या भागात गेल्या पाच-सहा वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या फारशा हालचाली जाणवल्या नाहीत. त्यांचा प्रभाव दक्षिण भागात आहे व त्यामुळे दक्षिण भागातच पोलिसांची यंत्रणा सावध असते, ही बाबही नक्षलवाद्यांनी लक्षात घेतलेली दिसते.
कारवाईचा सूड
धानोरा तालुक्यातील मरकेगावजवळ महामार्गावर २०१४ मध्ये झालेल्या सुरुंगाच्या स्फोटात १४ जवान हुतात्मा झाले. त्यानंतर गेल्या चार वर्षांत सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक मोहीम उघडली आणि ७२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. हे करताना आठ पोलिसांनाही प्राण गमवावे लागले. वर्षभरापूर्वी भामरागड तालुक्यातील कसनासूर गावालगतच्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या छावणीवर केलेल्या कारवाईत ४० नक्षलवादी ठार झाले. त्यात चार दलम कमांडरसह अनेक कुख्यात नक्षलवाद्यांचा समावेश होता. या चकमकीमुळे नक्षलवादी संघटनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची नवीन भरती ठप्प झाली. त्यातच पोलिस कारवाईच्या दबावातून अनेक कडव्या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या साऱ्याचा सूड घेण्याचा प्रयत्न नक्षलवादी करणार हे उघड होतेच.
गेल्याच आठवड्यात आणखी एका घटनेने नक्षलवादी हादरले. कसनासूरच्या घटनेने थंडावलेल्या नक्षलभरती मोहिमेला वेग देण्याची जबाबदारी दक्षिण गोंदिया-गडचिरोली विभागाचा ‘सचिव’ भास्कर व त्याची पत्नी रामको यांच्याकडे होती. मात्र, गेल्या आठवड्यात पोलिसांबरोबरील चकमकीत रामको ठार झाली. या साऱ्याचा बदला घेण्याचा प्रयत्न नक्षलवादी करतील, असा अंदाज होताच आणि दुर्दैवाने तो खरा ठरला.
संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष
या साऱ्या घटनेची चौकशी होईलच. कुणाचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत होता, हे तपासले जाईलही. कारवाईही होईल. पण त्यामुळे १५ जवानांचे प्राण नाहक गेले, याकडे कसे दुर्लक्ष करता येईल? या साऱ्याला पोलिस यंत्रणेचा व अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, हे मात्र ठामपणे म्हणता येते. नक्षलग्रस्त संवेदनशील भागात प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेणे अपेक्षित आहे. याआधी २०१४ मधील मरकेगावच्या स्फोटात १४ जवान हुतात्मा झाले होते. त्या वेळीही अगोदर ट्रॅक्टरची जाळपोळ करून त्यांनी पोलिसांना सापळ्यात ओढले होते. ती साधी बाब पोलिसांनी ताज्या घटनेच्या वेळी लक्षात घेतली नाही. घटनास्थळी पथक जाण्यापूर्वी रस्त्याची सुरक्षा तपासणी केली होती की नाही, यावरही शंका व्यक्त होत आहे. इतकी मोठी कारवाई करताना चार-पाच दिवसांपासून या भागात नक्षलवाद्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्या असतीलच. त्या हालचाली पोलिसांच्या लक्षात कशा आल्या नाहीत, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कसनासूरच्या घटनेला २४ एप्रिलला एक वर्ष झाले. त्यादरम्यान नक्षलवादी जिल्ह्यात कुठेही काहीही अघटित घडवू शकतात, याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष झाले. कसनासूरच्या घटनेनंतर नक्षलवादी चळवळ काहीशी थंडावली होती, तशीच पोलिस यंत्रणाही सुस्तावली होती, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. गेल्या दहा महिन्यांत चकमकींमध्ये केवळ चार नक्षलवादी ठार झाले. हा आकडा पुरेसा बोलका आहे. पोलिस यंत्रणेच्या या सुस्तावलेपणाचाच फायदा नक्षलवाद्यांनी घेतला व संधी साधून जांभूरखेडाजवळ मोठा स्फोट घडवून पोलिस दलाला मोठा हादरा दिला, असेच म्हणावे लागेल.
संशयाची सुई बसवराजकडे
नक्षलवादी चळवळीत घडलेल्या गेल्या वर्षभरातील एका महत्त्वाच्या घटनेची दखल घ्यावी लागेल. संघटनेची सूत्रे वृद्धत्वाकडे झुकलेल्या गणपतीकडून त्या तुलनेत तरुण असलेल्या बसवराज नंबल्ला केशवराज ऊर्फ बसवराजकडे आली होती. बसवराज हा गणपतीच्याच तालमीत तयार झाला होता. बसवराजला स्फोटकांचा वापर करण्यात निष्णात व गनिमी कारवायातील ‘तज्ज्ञ’ मानले जाते. कसनासूरच्या घटनेनंतर हा खांदेपालट झाल्यामुळे कसनासूरचा सूड उगवणे हे बसवराजचे एक महत्त्वाचे लक्ष्य होतेच. त्यामुळे जांभूरखेड्याच्या स्फोटप्रकरणी संशयाची सुई बसवराजकडेही जाते.
- अनंत कोळमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा