बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

टेन्शन तर देऊन गेलाच...

गेल्या आठवड्यात माझ्या कुटुंबाला तीन मृत्यूचे हादरे बसलेत. काकू 95 वर्षांची होती, तर आत्याचे यजमानही वयाची 85 ओलांडते झाले होते. एक परिपूर्ण आयुष्य जगून ते दोघे गेलेत. त्यांचा मृत्यू दुःख देणारा आहेच. पण, माझ्या मामांचा मुलगा, माझा मामेभाऊ, बंट्या गेला... त्याचा हादरा मात्र आम्हा साऱ्यांनाच सुन्न करून गेला आहे. काहीही झाले की, ""दादा, टेन्शन काय कु लेनेका...'' असं म्हणणाऱ्या बंट्याने अशी अचानक केवळ 32 व्या वर्षी एक्‍झीट घेतली अन्‌ आम्हा साऱ्यांनाच नेहमीसाठीच टेन्शन देऊन गेला.
बंट्या... हे त्याचे टोपण नाव. खरं नाव अश्‍विनीकुमार. पण या नावाने त्याला किती जण ओळखतील, हा प्रश्‍नच आहे. नात्यातले सारे त्याला बंट्याच म्हणत आले. काही जण त्याला "गुप्ता' अशी हाक मारायचे. ते नाव त्याला कसे चिकटले माहीत नाही. बंट्या नाव मात्र सर्वमान्य. परवा पोळ्याच्या करीच्या दिवशी, रविवारी दुपारी त्याला "ब्रेनहॅमरेज'चा अटॅक येतो काय आणि अर्ध्या-पाऊण तासात काहीही उपचार न मिळता बंट्या हे जग सोडून जातो... सारंच अतर्क्‍य... त्याला बीपीचा त्रास अगोदरपासून असेल.. ते अचानक वाढले असेल... असं आता बोलल्या जाते... पण "अश्‍विनीकुमार" हे देवांच्या वैद्याचं... डॉक्‍टरचं नाव असलेल्या बंट्याला उपचार मिळाला नाही, ही वास्तविकता आहे. घरून मेडिकलमध्ये हलवताना रस्त्यातच बंट्याने जीव सोडला. मेडिकलमध्ये पोहोचला, तो त्याचा मृतदेहच. तेथल्या नियमानुसार मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. मी पोहोचलो तेव्हा पोस्टमार्टम गृहात त्याचा मृतदेह स्ट्रेचरवर होता. शांत झोपलेला वाटत होता. वाटलं... आता उठेल... नेहमीप्रमाणे गळ्यात हात टाकेल... अन्‌ म्हणेल... ""दादा, टेन्शन काय कु लेनेका...'' पण ते होणे नव्हते... साऱ्यांनाच चुकवून निघून गेला तो.
तू स्वभावाने आक्रमक. पण तरीही तेव्हढाच मृदू, मुलायम... मी आंतरजातीय विवाह केला. नात्यातल्या अनेकांनी माझ्याशी नाते तोडले. पण तू आणि राहूल दोघेही ठाम सोबत राहिले. नात्यातले काही शिव्याशाप द्यायचे मला आणि मंजूला... पण तू भांडायचा त्यांच्याशी आमच्यासाठी... आमचा वकील बनून... एकाने तर "अनंताचा वकील' या शब्दात तुझा उद्धारही केला. ते सारे तू सहन केले आमच्यासाठी. काहींशी नातेही तोडले आमच्यासाठी... कसे विसरणार हे सारं.
तूच नाही, तर राहूल, सोन्या व मामा-मामी साऱ्यांनीच स्वीकारले मला आणि मंजूला. एकदा म्हणाला... ""दादा, हम तो तुम्हारे पिछेही है...'' मग माझ्याच पावलावर पाउल टाकत तूही आंतरजातीय विवाह केला. जन्मभर प्रेम करण्याचे आणि साथ देण्याचे वचन देऊन प्रियाशी लग्न केले होते बंट्या तू... मग ते वचन कसा विसरला तू? तसा तू हट्टी होताच... आपलेच म्हणणे खरं करणारा होता... पण हे करताना प्रियाचा नाही, पण साईचा तर विचार करायचा होता बदमाशा... (मी अनेकदा तुला बदमाश, नालायक वगैरे म्हणायचो थट्टेने..) त्या निरागस साईच्या डोक्‍यावरचा बापाचा हात हिरावण्याचा हक्क तुला कोणी दिला? टेन्शन काय कु लेनेका... म्हणायचा ना तू... मग प्रिया आणि साईला हे टेन्शन कसे काय देऊन गेला तू...? आईबाबावर खूप प्रेम करायचा ना तू... पण त्यांना या वयात सोडून जाताना तूला काहीच वाटले नाही... इतका असंवेदनशील कसा काय झाला रे? मामांना, तुझ्या बाबांना "बंट्या गेला' हे सांगताना "मामा, स्वतःला सावरा... ' असं मी म्हणत होतो.. पण मला माहीत होते की, मी जे म्हणतो, ते मूर्खपणाचे आहे म्हणून. नंतरच्या साऱ्या प्रक्रियेला मामा धीराने समोर गेले... पण ते कोलमडले होते, हे मला जाणवत होते... पण त्यांच्यावर प्रेम करण्याचा दावा करणारा तू शांत होता... इतका पत्थरदिल कधीही नाही पाहिले तुला...
गेल्या वर्षीपासून मातीचे गणपती आणायचा तू विकायला. यंदाही आणले... ते गणपती तयार असायचे. पण तितक्‍यावर तू खूष नव्हता. सारे गणपती तू पुन्हा सजवायचा. मुकुट, माळा स्वतः तयार करायचा... पितांबर नेसवायचा... माझ्यासाठी यंदाही गणपती निश्‍चित केला होता तू. त्याचा फोटोही पाठवला फेसबूकवर... पण काकूच्या निधनामुळे आमच्याकडे यंदा गणपती नाही असं तुला कळवले, तर तू म्हणाला... ""जाऊ द्या ना दादा... लाडूकरांकडल्या गणपतरावांना भेटायला या तुम्ही...'' पण बंट्या, तुझ्या या जाण्याने गणपतीच्या तुझ्याकडील येण्यालाही अटकाव घातला ना तू...
नागपूरच्या मेडिकलमधील पोस्टमार्टमगृहात तुला शांत झोपल्यासारखं पाहण्यापासून माणिकवाड्याच्या त्या स्मशानभूमीत रात्री 9 वाजता भर पावसात आणि वीजांच्या कडकडाटात तुला अग्निनारायणाच्या स्वाधीन करेपर्यंतच्या या प्रवासात हे सारं सारं आठवत होतं मला... तरीही मी शांत होतो... स्वतःला सावरत होतो... माणिकवाड्याच्या लाडुकर वाड्यातील सारे तुझे चुलतभावंडं स्मशानात गोल करून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडत होते... तेव्हाही मी शांत होतो. पण आता नाही सहन होत रे... कोलमडलोय मी... मंजूही हादरली... सावरायचा प्रयत्न करतोय आम्ही... पण नाही जमत रे... नालायका, सारंच टेन्शन देऊन गेला रे तू...

- अनंत कोळमकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा