बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

"हार्दिक पटेल'च्या निमित्ताने...



गुजरातमधल्या धनाढ्य समजल्या जाणाऱ्या पटेल-पाटीदार समाजाला अन्य मागासवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मोठे आंदोलन गुजरातमध्ये उभे केले. यानिमित्ताने पुन्हा "आरक्षण' या विषयावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. सोशल मिडियावर तर प्रतिक्रियांचा अक्षरशः धबधबा कोसळत आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया टोकाच्या आहेत. केवळ पटेल समाजातच नव्हे, तर सर्वच राज्यांमध्ये तेथतेथल्या उच्चभ्रू, धनवंत व आजवर सत्तेच्या सान्निध्यात राहणाऱ्या समाजसमुहांना आरक्षणाचे स्वप्न पडायला लागले आहे. मराठा, जाट आरक्षणाच्या मागण्यांमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडते. परवा फेसबूकवर छान पोस्ट होती... ""या देशाला विकसित कसे म्हणायचे... जेथे प्रत्येक समाज स्वतःला मागास ठरविण्याचा आटापिटा करतो आहे...!''

वास्तविकतः या समस्येचे मूळ नेमके काय, यावर कोणीही गंभीरतेने विचार करताना दिसत नाही. आरक्षणाला विरोध करणारे, 'ते जातीय आधारावर नकोच', अशी भूमिका घेतात... तर आरक्षणाचे समर्थक "आरक्षण आमचा अधिकार आहे', असा दावा करतात. या दोन्ही भूमिका, दोन्ही दावेच मुळात चूक आहेत.

पहिली भूमिका - जातीय आधारावर आरक्षण नकोच...! ही भूमिका घेताना सर्वप्रथम आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की, आपल्या मनातून "जात' गेली का? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाल्यास याचे उत्तर "नाही' असेच आहे. कुणी कितीही पुरोगामित्वाचा टेंभा मिरवित असले, तरी त्याच्याही मनात "जात' आहेच. उगाच नाही म्हणत ""मेल्याशिवाय जात नाही ती "जात'!'' हिंदूंच्या मूळ समाजरचनेत (वेद, मनुस्मृतीत सांगितलेल्या) असलेली "कर्माधारीत' जात आज काही समाजघटकांच्या स्वार्थापायी भ्रष्ट होऊन "जन्माधारीत' बनली आणि आपणही ती कवटाळून बसलो. आज समाज बदलत चालला आहे. स्पृश्‍यास्पृश्‍य भेद फारसा राहिला नाही. आंतरजातीय विवाह होत आहे. ते मान्यही होत आहे. पण याचा अर्थ "जात' संपली, असा नाही. परीणामी जातीभेदही आहे. दारावर आलेला याचक ब्राह्मण असेल तर त्याला दिलेले ते दान आणि तो मागास असेल ती भिक... ही मानसिकता अजूनही आहे, हे कसे नाकारता येईल?
मागास जातींमधल्या अनेकांपर्यंत अजूनही विकास, लोकशाही पोहोचलेली नाही, ही वास्तविकता आहे. एका गिताच्या ओळी आठवतात...
उगा सूर्य कैसा कहो मुक्ती का ये,
उजाला करोडो घरों मे ना पहुंचा...
खुला पिंजडा है मगर रक्त अब भी,
थके पंछियों के परों मे ना पहुंचा...''
या ओळी ऐकायला कटू असल्या, तरी सत्य आहेत. त्यामुळे जोवर मनामध्ये "जात' आहे, तोवर जातीय आधारावरील आरक्षणाला विरोध नसावा
पण...

त्याहून सर्वाधिक गंभीर धोका आहे, "आरक्षण आमचा अधिकार आहे' हे मानण्याचा... समाजरचनेतील शोषित, वंचित, दुर्लक्षित, मागास घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठीची आरक्षण ही सवलत आहे. तो घटनेने दिलेला मदतीचा हात आहे. सवलत आणि अधिकार, यात फरक आहे.
एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलेला एक अनुभव येथे नमूद करावासा वाटतो. ते प्राध्यापक असतानाची गोष्ट. त्यांच्या महाविद्यालयात मागास घटकातील पहिल्या तीन हुशार विद्यार्थ्यांना पुस्तक-वह्या घेण्यासाठी एक अल्पसा निधी मदत म्हणून दिल्या जायचा. एके वर्षी त्या तीन नावात जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्याच्या मुलाचा क्रमांक लागला. प्राध्यापकांनी विचार केला, बड्या पगारावरील अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या त्याला तशीही या अल्प निधीची काय गरज... त्याने जर या मदतीची गरज नसल्याचे लिहून दिले, तर मागास घटकातीलच चौथ्या क्रमांकावर असलेल्या हुशार विद्यार्थ्याला ती मदत मिळू शकते....! प्राध्यापकांनी तसे त्याला म्हटले. तो म्हणाला, वडिलांना विचारतो... दुसऱ्या दिवशी त्याने प्राध्यापकांना सांगितले... ""बाबा नाही म्हणाले... कारण ते म्हणाले, ती मदत आपला अधिकार आहे...''
आरक्षणाचा फायदा घेऊन मागास समाजघटकातले अनेकजण समाजाच्या वरच्या उच्चभ्रू वर्गात पोहोचले आहेत. जातीभेदाचा फटका या वर्गाला बसत नाही. त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षणात, नोकरीत अडथळे येत नाही. अशा वर्गातल्या लोकांनी स्वतःपुरते आरक्षण का नाकारू नये... वाद नेमका येथे आहे... मागास जातीतील आरक्षण घेऊन बड्या पगाराच्या, हुद्यांच्या नोकरीवर काम करणाऱ्यांनी, आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांनी आपल्या पाल्यांसाठी आरक्षणाची सवलत का नाकारू नये? त्यांनी तसे केले, तर त्यांच्याच समाजातील दुसऱ्या गरजूला त्याचा फायदा मिळू शकतो... पण हे होत नाही, हे गंभीर आहे. आणि त्याचमुळे जातीय आरक्षणाला विरोध होत आहे.
यावरचा सुवर्णमध्यच काढायचा झाल्यास तो एकच निघू शकतो... जातीय आधारावरचे आरक्षण अजून संपवणे योग्य नाहीच. पण त्या आरक्षणाला आर्थिक बंधन घातले पाहिजे. तर मग आरक्षणाचा गैरफायदा टाळता येईल. सोबतच अन्य समाजघटकांमधील आर्थिक मागास घटकांनाही आरक्षणाची तरतूद करण्याची गरज आहे. पण या साऱ्याला आर्धिक आधार असलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे, हे सारे करताना एक साऱ्यांनीच सतत लक्षात ठेवले पाहिजे, मनात ठामपणे मनात बिंबवले पाहिजे की, आरक्षण ही सवलत आहे... मदतीचा हात आहे... अधिकार नाही!

- अनंत कोळमकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा