गुजरातचा निकाल लागला. तब्बल 22 वर्षांपासून सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला. विशेष म्हणजे भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये त्या पक्षाला बहुमत मिळविण्यासाठी जोर लावावा लागला. भाजपाला निसटते बहुमत मिळाले व कॉग्रेसला सत्ता मिळण्यापासून थोडक्यानेच दूर रहावे लागले. जागा वाढल्या म्हणून व राहुल गांधीच्या नेतृत्वाला यानिमित्ताने संजीवनी मिळाल्यामुळे कॉग्रेसने नक्कीच आनंदी झाले पाहिजे. पण, शेवटी बहुमत एकने मिळालेले असो की, शंभरने.... बहुमत ते बहुमतच. त्यामुळे आगामी पाच वर्षे गुजरातची सत्ता भाजपच्या हातातच राहणार ही काळ्या दगडावरची रेष आहे व ती वास्तविकता काही कॉग्रेसच्या आनंदोत्सवामुळे बदलणार नाही. पण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने भाजपाचा विजय, कॉग्रेसचा पराभव व त्या राज्यात काही तरुण नेत्यांच्या उदय या साऱ्यांचा अन्वयार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. म्हणूनच पहिल्या भागात कॉग्रेसच्या कामगिरीची मीमांसा...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -कॉंग्रेस नाही... राहूल विजयी
या निवडणुकीत कॉग्रेसने भाजपाला अटीतटीची लढत दिली. काही काळ भाजपा नेत्यांच्या डोळ्यासमोर कॉग्रेसच्या या कामगिरीमुळे काजवेही चमकले असतील. त्यामुळे कॉग्रेसच्या कामगिरीचे व पराभवाचे मंथन झालेच पाहिजे. खरं पहायचे झाल्यास हे यश कॉग्रेस नावाच्या संघटनेचे आहे काय, हा प्रश्न कॉग्रेसजनांनी स्वतःला विचारला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्यायचे झाल्यास ते नक्कीच होकारार्थी येणार नाही. कारण कॉग्रेस नावाचे पक्षसंघटनच गुजरातमध्ये अस्तित्वात नव्हते. आणि आताही नाही. त्यामुळे कोणतीही संघटनात्मक शक्ती नसताना 61 जागांवरून 77 आमदार निवडून आणण्यासारखी कामगिरी ही जादूईच म्हणावी लागेल. ही जादू केवळ आणि केवळ राहुल गांधी यांनी घडवली. त्यामुळे हे यश केवळ राहुल गांधींचेच आहे. त्यात कुणीही वाटा घेऊ शकत नाही.या निकालांनी राहुल एक परिपक्व खेळाडू म्हणून समोर आला, ही कॉग्रेसच्या व देशातल्या लोकशाहीच्या दृष्टीने एक महत्वाची मिळकत म्हणावी लागेल. आता त्यांना ‘पप्पू’ या शेलक्या शब्दांनी हिणवण्याची ताकद कुणाचीही होणार नाही. खऱं तर राहुल गांधींसोबतच त्यांच्या अनाम सल्लागारांचेही यानिमित्ताने अभिनंदन केले पाहिजे. राहुलच्या सल्लागार टीमने राहुलच्या वागण्या-बोलण्याची जी चौकट बांधून दिली ती अतिशय योग्य होती व राहुल गांधींनीही त्या चौकटीच्या बाहेर न जाण्याचा संयम बाळगला. आपल्याच पक्षाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रत भर पत्रपरिषदेत फाडून फेकण्याचा अपरिपक्वता ज्यांच्या नावावर आहे, त्या राहुलकडून वागण्या-बोलण्याचे बंधन पाळले जावे, हे खरोखर स्तुत्य म्हणावे लागेल. त्यामुळे विरोधकांच्या प्रखर टीकास्त्रासमोरही राहुल गांधी संयमित राहिले. दुर्दैवाने आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना ते तो संयम ठेवण्यास बाध्य करू शकले नाही. त्यामुळे परिपक्व खेळाडू म्हणून ते समोर आले असले तरी त्यांच्या नेतृत्वात ती परिपक्वता येण्यास वेळ लागेल. ती येईल, अशी आशा सध्याच्या त्यांच्या कामगिरीवरून तरी बाळगायला हरकत नाही.
सापळ्यात अडकले...
राहुलच्या टीमने त्यांच्यावर जी काळजी घेतली, तितकीच काळजी
प्रचाराची रणनीती आखताना घेतली असती तर भाजपाला यावेळी तरी पराभूत करणे सहज शक्य
होते. याचा अर्थ रणनीती चूक होती असे नाही. प्रारंभीच्या टप्प्यात राहुलने अतिशय
चांगल्या व्यूहरचनेनुसार प्रचारमोहीम सुरू केली होती. मंदिरात जाऊन सॉफ्ट
हिंदुत्वाचा संदेश देणे हा त्या रणनीतीचा भाग होता. त्याचा फायदा दिसत होताच. मग
चुकले कुठे...? येथेच
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रणनीतीचे गमक आहे. ज्यावेळी शत्रू अतिशय अटीतटीची
लढत देत असतो व विजय हुलकावणी देण्याच्या स्थितीत असतो, तेव्हा शत्रूचे लक्ष
अन्यत्र वळवणे हाही रणनीतीचाच भाग असतो. दुसऱ्या टप्प्यात शहांनी तेच केले.
मणिशंकर अय्यर यांचा नीच शब्द, कपिल सिब्बलांची सर्वोच्च न्यायालयात
राममंदिराबाबतची भूमिका याचा पुरेपूर वापर त्यांनी केला. कॉग्रेसची प्रचारनीती या
मुद्द्यावर काहिशी थबकली असतानाच पाकिस्तानी अधिकाऱ्यांची अय्यर यांच्याकडील भोजन
व त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी असण्याचा मुद्दा पुढे आला... आला
म्हणण्यापेक्षा आणला.
मोदी व शहा यांनी सापळा टाकला व त्यात कॉग्रेस अलगद अडकली.
मोदींचे भाषण पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका. अय्यर यांच्याकडील भोजनबैठकीत गुजरातवर
चर्चा झाली व त्या चर्चेत मनमोहनसिंग यांनी भाग घेतला असे मोदींनी भाषणात कुठेही
म्हटले नाही. त्यांनी काय म्हटले... त्यांनी भाषणात सर्वप्रथम पाकिस्तानी माजी
गुप्तचर अधिकाऱ्याचा गुजरात निवडणुकीसंदर्भातील एका ट्विटचा उल्लेख केला. त्यात
अहमद पटेल यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा होती. त्या ट्विटच्या उल्लेखानंतर
त्यांनी भोजनबैठकीचा उल्लेख केला. या बैठकीत डॉ. मनमोहनसिंग व माजी उपराष्ट्रपती
हमीद अन्सारी उपस्थित होते, एव्हढेच ते म्हणाले. आणि सर्वात शेवटी ते म्हणाले, या
बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी अय्यर मला नीच म्हणाले... मनमोहनसिंग वा हमीद अन्सारी
यांच्याबाबत काहीही वावगे ते बोलले नाही. पण हाच नेमका सापळा होता. येथेच कॉग्रेसने
प्रचाराने मार्ग सोडला आणि सिंग यांच्यासह सारे नेते या बैठकीचे खुलासे करीत
राहिले. त्याचा जो परिणाम भाजपाला व्हायला हवा होता... तो झाला.
कार्यकर्त्यांची वानवा
पण कॉग्रेसचे काय? प्रारंभीच नमूद केल्यानुसार हे यश केवळ राहुल गांधी यांचेच आहे. त्यामुळे आमदारांची
संख्या वाढण्याचा आनंद साजरा करण्याचाही अधिकार त्यांनाच आहे. सोशल मीडियावर एक
पोस्ट कॉग्रेस जणांकडून सतत फिरत होती. "एक पंतप्रधान, अनेक मंत्री, मुख्यमंत्री,
मोठ्या संख्येत खासदार, आमदार यांच्या विरोधात अल्पेश + जिग्नेश + हार्दिक + राहुल... तरीही 19 जागा कमी झाल्यात...." पोस्ट छान आहे. पण
यातच कॉग्रेसची लाजीरवाणी स्थितीही दिसून येते. निवडणुकीत क्राऊड पुलिंग नेते हवे
असतात. त्यांची वानवाच गुजरात कॉग्रेसमध्ये आहे. नेतेही नाही आणि कार्यकर्तेही
नाही... मग राहुल तरी काय करणार? पक्षाबाहेरच्या
तीन तरुणांना घेऊन प्रचार करण्याची लाजीरवाणी वेळ राहुल गांधी यांच्यावर आली....
मग चार विरोधात सारे, हे सांगण्यात काय गौरवाचे?
कॉग्रेसमुक्त भारत
बरं... 19 जागा वाढल्याचा आनंद घेण्यासारखी तरी स्थिती आहे
काय? भाजप या
निवडणुकीत केवळ आपले राज्य राखण्यासाठी उतरली नव्हती. भाजपाने कॉग्रेसमुक्त
भारताचे जे लक्ष्य समोर ठेवले होते, त्या दिशेने भाजपा या निवडणुकीत उतरली होती.
त्यामुळेच भाजपा गुजरातमध्येही जोमाने लढला आणि हिमाचल प्रदेशातही. तो जोम राहुल
गांधी हिमाचलमध्ये दाखवू शकले नाही, हे अमान्य कसे करता येईल? काही विधानांचा शब्दशः अर्थ राजकारणात अपेक्षित नसतोच.
कॉग्रेसमुक्त भारत हे शब्दशः भारताच्या सशक्त लोकशाहीत शक्य नाहीच. ती बाब
मोदी-शहा जोडगोळीला माहीत नसेल, असा जर कुणाचा भ्रम असेल तर त्यांच्या
बुद्धिमत्तेला सलाम केला पाहिजे. 'कॉग्रेसमुक्त भारत' या शब्दसमूहाचा संकेतार्थच
लक्षात घेतला पाहिजे. देशातील सर्व प्रकारच्या सत्तेतून कॉग्रेसला बाहेर करणे, हा
त्याचा अर्थ आहे. भाजपच्या त्या लक्ष्याच्या दृष्टीतून पाहिल्यास कॉग्रेसला जागा
वाढल्याचा आनंद साजरा करण्याचा नैतिक अधिकार तरी राहतो काय? गुजरातमध्ये आमदार वाढले, पण सत्ता मिळाली काय? कॉग्रेसला तेथे भाजपाकडून सत्ता हिसकावता आली नाहीच, पण
हिमाचलमध्ये असलेली सत्ता मात्र गमावली. म्हणजे भाजप लक्ष्याच्या दिशेने गेली आणि
कॉग्रेसने एक राज्य गमावले. मग आमदार वाढल्याचा आनंद साजरा करणे म्हणजे दुधाची
तहान ताकावर भागविण्यासारखे आहे.
भाजपाने 150 जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले. पण 99 जागाच
जिंकल्या. याचाही आनंद काही कॉग्रेसचे अंधप्रेमी दाखवत आहे. भाजपाचे ते अपयश आहेच.
पण ध्येय हे जास्तच ठेवावे लागते. मला बहुमतासाठी आवश्यक फक्त 92 जागाच जिंकायच्या
आहेत, असे घोषित करून कुणी निवडणुकीत उतरतं काय? राहुल गांधी तरी उतरले काय? केवळ 61 जागा
असतानाही त्यांनी 120 जिंकू, असेच घोषित केले ना... शेवटी त्या राजकीय घोषणा आहेत
आणि त्याकडे त्याच दृष्टीतून पाहिले पाहिजे.
भविष्य काय?
राहुलच्या चांगल्या कामगिरीने पक्षाच्या या दयनीय स्थितीत
काही सुखद बदल भविष्यात होणार काय... यामुळे राज्यात व देशातही कॉग्रेसला चांगले
दिवस येतील, अशी आशा व्यक्त होत आहे. पण, एकंदर चित्र पाहता तसे वाटत नाही. गेल्या
गुजरात विधानसभेतही कॉग्रेसचे 61 आमदार होते. तरीही तेथे नेते कार्यकर्त्यांची
वानवा होतीच ना. आता 16 आमदार वाढल्याने काय बदल होणार... खरं तर पक्ष वाढतो,
तगतो, तो केवळ ग्राऊंड फिल्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे. ती
कार्यकर्त्यांची फळीच कॉग्रेसजवळ नाही. पक्षाची सत्ता आली असती तर मात्र काहीसा
फरक पडला असता. पण आता तेही शक्य नाही. 22 वर्षांपासून सत्तेत नसण्याचा व पुढेही
पाच वर्षे ती संधी नसण्याचा हा तोटा कॉग्रेसला होणार आहे व तसाच तो झाला...
हा भाग संपवताना या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट नमूद केलेच
पाहिजे. भाजपाच्या विजयाला इव्हीएम मशीन कारणीभूत असल्याचा जो बालीश आरोप
केजरीवालांनी केला व त्या आरोपाची री ओढण्याचा अतिबालीशपणा कॉग्रेसजणांनी केला,
त्याला आता परस्पर उत्तर मिळाले आहे. नाहीतर भाजपाने जिंकल्या त्या 99 ठिकाणीच
इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला व विरोधकांनी जिंकलेल्या अन्य 83 ठिकाणी त्या मशीन
लोकतांत्रिक पद्धतीने चालल्या, असा अतिबालिशपणाचा आरोप करायलाही काही विद्वान कमी
करणार नाही.
(अपूर्ण)
- अनंत कोळमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा