शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

अर्थ गुजरात निकालाचा... (भाग 3)



गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडाला फेस आणण्यात व कॉंग्रेसला चमकदार खेळ करण्यास तेथील तीन तरुण नेत्यांचा हातभार लागला. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर व जिग्नेश मेवानी हे ते तीन नेते. गुजरातच्या निकालाचे विश्लेषण या तीन नेत्यांच्या कामगिरीच्या विश्लेषणाशिवाय होऊच शकत नाही. मुळात काँग्रेसचे नसलेले हे तीन नेते काँग्रेसला सहायक ठरले आणि भाजपासाठी धोक्याची घंटी. आता निवडणुका संपल्यात. अल्पेश आणि जिग्नेश हे दोघे आमदार झाले, तर वयाच्या मर्यादेमुळे हार्दिक त्यापासून दूर राहिला. पण, आता या तिघांचे भवितव्य काय? या प्रश्नाचे उत्तर भविष्याच्या पोटात दडले आहे. त्या उत्तराचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या तिसऱ्या व शेवटच्या भागात...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

भवितव्य तिघांचे


हार्दिक भरत पटेल


केवळ 24 वर्षांच्या या युवकाभोवती गेले दोन वर्षांपासून गुजरातचे राजकारण आणि समाजकारण दोन्हीही फिरत आहे. जर त्याचे वय 25 वर्षांचे झाले असते तर तो या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहिला असता आणि निवडूनही आला असता. ही झाली जर-तरची गोष्ट. पण या निवडणुकीत केंद्रीभूत राहिलेल्या तीन युवा नेत्यांमध्ये हार्दिकचा क्रमांक पहिला ठेवावाच लागतो. या तिघांच्या तुलनेत हार्दिक तसा बच्चाच. तरी दबावगट तयार करण्याच्या दृष्टीने हार्दिक अव्वल ठरला.

अहमदाबाद जिल्ह्यातील विरगाव या गावात जन्मलेल्या हार्दिक पाटीदार समाजाचा. त्याचे कुटुंब तसे गरीबच. घरात आईवडील व बहीण. शालेय शिक्षण विरगावातच झाले. सोबत तो वडिलांच्या व्यवसायाला हातभारही लावायचा. नंतर अहमदाबादमधून त्याने बी.कॉम.ची पदवी प्राप्त केली. याच काळात तो सरदार पटेल समूहाशी जुळला व पाटीदार समाजाच्या समाजकारणात रस घेऊ लागला. जुलै 2015 मध्ये हार्दिकच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. हार्दिकची बहीण मोनिका हिला शिष्यवृत्ती नाकारल्या गेली. तेथून हार्दिकच्या मनात जातआधारित आरक्षण व शिष्यवृत्तीच्या विरोधात बीज अंकुरले. त्याने या धोरणाच्या विरोधात पाटीदार अनामत आंदोलन समिती गठित केली. हार्दिकच्या नेतृत्वाचा हा प्रारंभ होता. पाटीदार समाज हा तसा गुजरातमधला सधन, शिक्षित समाज. पण त्यातही एक मोठा भाग गरीब आहे. जातआधारित आरक्षण प्रणालीमुळे या गरीब पाटीदार समाजावर अन्याय होतो, अशी भूमिका घेऊन या आरक्षणाच्या विरोधात हार्दिकचे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे पाटीदार समाजातूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा जबरदस्त प्रतिसाद पाहून हार्दिकने या आंदालनाची दिशा थोडी बदलली. त्याने जातआधारित आरक्षणाचा विरोध सोडला व पाटिदारांना आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे केली. हार्दिकच्या मागे असलेल्या पाटिदार समाजाला या बदललेल्या मागणीत वावगे वाटले नाही. त्यांचे समर्थन हार्दिकला तसेच राहिले. पण हार्दिकने पुन्हा आपल्या मागणीत बदल केला. आता त्याने पाटिदार समाजाला अन्य मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) सहभागी करण्याची व स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी पुढे रेटली. त्यासोबतच हार्दिकच्या समाजातील पिछेहाटीला प्रारंभ झाला.

गुजराती पाटीदार समाजात भाजपा व मोदींबाबत प्रेम आहे. हार्दिकने आंदोलनात थेट भाजपा व मोदींवर आक्रमण सुरू केले आणि त्याला बळ मिळावे म्हणून काँग्रेसचा हात हातात धरला. तो धरतानाही त्याची अस्थिरता दिसत होती. येथेच हार्दिकच्या नेतृत्वाचा ऱ्हास सुरू झाला. या निवडणुकीतील मतदानाचे आकडे पाहिल्यास हार्दिकच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते. पाटिदारबहुल भागात असलेल्या 35 जागांपैकी केवळ 9 जागा हार्दिकने पाठिंबा दिलेल्या काँग्रेसने जिंकल्या. तर, तब्बल 25 जागा भाजपाने जिंकल्यात. याचा संकेत स्पष्ट आहे – हार्दिकची जादू संपली आहे. हार्दिकची जादू संपण्यात आणखी एक मुद्दा कारणीभूत ठरला. मुळातच गुजराती समाज हा परंपराप्रिय आहे. आधुनिक जगासोबत राहण्याइतपत बोल्डनेस तो ठेवतो. पण आजचा पुरोगामी बोल्डनेस या समाजाला आवडत नाही. या निवडणुकीत हार्दिकच्या काही आक्षेपार्ह्य सीडी त्याच्या विरोधकांनी बाहेर आणल्यात. अशा सीडी जाहीर करणे चूकच... पण या सीडीतील वर्तनाची बाजू हार्दिकने बोल्डपणे घेतली. ती भूमिका परंपराप्रिय पाटीदार समाजाला पटणे शक्यच नव्हते.

हे सारे पाहता अगोदर मिळाला तसा पाठिंबा हार्दिकला आता समाजातून मिळणे शक्य नाही. वयाने आमदारकीही दूर राहिली. त्यामुळे हार्दिकला स्वतःचे नेतृत्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. जर समाजाचे समर्थन निघून गेले, तर काँग्रेसही हार्दिकला दारात उभी करणार नाही, हे नक्की. अशा स्थितीत हार्दिकच्या नेतृत्वासाठी आघामी काळ कठीण, अडचणींचा जाणार हे नक्की.

अल्पेश ठाकोर

हार्दिक व जिग्नेशच्या तुलनेत अल्पेश ठाकोर हा वयाने व अनुभवानेही परिपक्व मानावा लागेल. चाळीशीच्या घरात असलेल्या अल्पेशचा जन्म अहमदाबादचा. पदवीधर अल्पेशचा खरा पिंड समाजसेवकाचा. ठाकोर या ओबीसी समाजातल्या अल्पेशच्या मनाला आपल्या समाजबांधवाचे दारूचे व्यसन यातना द्यायचे. या दारूनी कुटुंबाची होणारी हाताहात तो डोळ्याने बघायचा. या दारूच्या व्यसनाच्या विरोधात लढा देण्यासाठी अल्पेशने गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना स्थापन केली. दारूच्या विरोधात जनप्रबोधन करायचे, व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन करायचे, त्याला व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची आणि वेळप्रसंगी दारूविक्रेत्यांविरोधात आंदोलन करायचे, असा अल्पेशचा समाजसेवी उपक्रम होता व आजही आहे.

2015 मध्ये हार्दिक पटेलने ओबीसीत पाटिदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी पुढे करून चळवळ सुरू केली. राज्यात सधन व सशक्त असलेल्या पाटिदार समाजाने हार्दिकच्या मागे शक्ती लावली. या आंदोलनाने एक मोठे रूप धारण केले. मात्र या आंदोलनाला यश मिळाल्यास त्याचा फटका ओबीसी व अन्य समाजाच्या आरक्षणाला बसेल, ही वास्तविकता अल्पेश ठाकोरच्या लक्षात आली. आणि त्याने हार्दिकच्या आंदोलनाला काटशह म्हणून ओबीसी-एससी-एसटी एकता मंच गठित करून प्रतिआंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे स्वरूप स्पष्टपणे हार्दिकविरोधी व पाटिदार समाजविरोधी असेच होते, हे लक्षात घ्यावे लागेल. या आंदोलनाला मागासवर्गीय जाती-जमाती व अन्य मागासवर्गीय समाजाचे जबरदस्त समर्थन मिळाले. पण निवडणुकाच्या काळात अल्पेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाची उमेदवारीही मिळाली आणि निवडूनही आला. कोणतीही राजकीय पृष्ठभूमी नसताना अल्पेशचे यश उल्लेखनीय आहे.

अल्पेश हा परिपक्व खेळाडू असला तरी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केलेल्या एका निरर्थक विधानाने त्याने वाद ओढवून घेतला. मोदी तायवानमधील मशरून दररोज खातात आणि त्यामुळे त्यांचे गाल गुलाबी झालेत.... या त्याच्या विधानाने त्याच्या परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह निश्चितच उभे झाले. पण एकंदरीत त्याचा अनूभव व विशेष म्हणजे समाजकारणातील त्याचे जबरदस्त काम हे त्याची खरी शिदोरी आहे. त्यामुळे आगामी काळात अल्पेश ठाकोर हा राजकारणातला लंबी रेस का घोडा आणि एक महत्वाचा निर्णायक प्यादा ठरेल, यात संशय नाही.

जिग्नेश नटवरलाल मेवाणी

बीए, एलएलबी पदवीप्राप्त जिग्नेश नटवरलाल मेवाणी हा या निवडणुकीतला आणखी एक चर्चित चेहरा. वय वर्षे 34. दलित समाजातून पुढे आलेला. जिग्नेशच्या नेतृत्वाचीही सुरुवात गेल्या दोन वर्षातच झाली. केंद्र सरकारने गोवंशबंदीचा कायदा केल्यानंतर काही तथाकथित गोरक्षकांनी हैदोस सुरू केला. अशाच हैदोसात गुजरातमधल्या उना येथे दोन दलित व्यक्तींवर कथित गोरक्षकांनी हल्ला केला. जिग्नेशने या घटनेनेतर दलितांचे एक मोठे आंदोलन उभे केले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याने अहमदाबाद ते उना अशी दलित अस्मिता यात्रा काढली. 20 हजाराहून अधिक दलित समाजबांधव त्यात सहभागी झालेत. तरुण व महिलांची त्यातील उपस्थिती लक्षणीय होती. या आंदोलनाने जिग्नेशला पुढे आणले. निवडणुकीच्या तोंडावर तेही काँग्रेसमध्ये प्रवेश करात झाला. त्याला उमेदवारीही मिळाली आणि आमदार म्हणून तो निवडूनही आला.

जिग्नेश (डावीकडे) व उमर खलिद
भविष्याचा विचार केल्यास हार्दिकच्या नेतृत्वाला अडचणींचे ग्रहण लागलेले असेल, तर अल्पेश एक महत्वाचा प्यादा ठरेल, असे म्हणता येऊ शकते. पण जिग्नेशबाबत केवळ तितकेच म्हणता येणार नाही. कारण त्याला असलेली विद्रोही व डाव्या विचाराची पृष्ठभूमी. त्याची उठबस डाव्या लोकांमध्ये आहे. जिग्नेशच्या प्रचारातही जेएनयूतील डाव्या विचाराच्या तरुणांची फौज सहभागी झाली होती. खरं तर या फौजेनेच जिग्नेशची प्रचारमोहीम चालवली. यावरून जिग्नेशची पुढची वाटचाल सहज लक्षात येते. भलेही जिग्नेश काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला असला, तरी तो त्या विचाराला चिकटून राहील याची कुठलीही शाश्वती नाही. आक्रमक वादग्रस्त विधाने करण्यास जिग्नेश मागेपुढे राहणार नाही. निवडणुकीतील विजयानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मोदींनी रिटायर्ड होण्याचा व हड्डी गलाने के लिए (हे त्याचे शब्द) हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. ही त्याची भाषा राहणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी म्हटले तरीही मी या विधानाबाबत माफी मागणार नाही, असेही ठणकावून सांगितले आहे. अशा स्थितीत तो काँग्रेसला किती पचनी पडेल, हा प्रश्नच आहे.

त्याने आपली वैचारिक दिशाही आतापासूनच स्पष्ट केली आहे. लवकरच तो महाराष्ट्रात भिमा कोरेगाव येथे एका कार्यक्रमात येणार आहे. पेशवे व इंग्रज यांच्यातील लढाईत इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या शहीद दलित सैनिकांच्या गौरवार्थ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जिग्नेश ज्याच्यासोबत राहणार, ते विशेष आहे. जेएनयूत देशद्रोही नारे देऊन चर्चेत आलेला उमर खलिदही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. उमर आणि जिग्नेशची खास मैत्री आहे. जिग्नेशच्या निमित्ताने डाव्या पुरोगामी मंडळींना कन्हैयाकुमारच्या सोबतीली आणखी एक तरुण चेहरा मिळेल. त्याचा ते फायदा करून घेणारच. देशात अस्थिरता, अशांतता निर्माण करण्याचा जो प्रयत्न डाव्या चळवळीद्वारे सतत सुरू आहे, त्याला पुढे नेणाऱ्या म्होरक्यांमध्ये आता जिग्नेशचा समावेश असेल. त्यामुळे जिग्नेश काँग्रेसच्या छत्रछायेखाली किती राहील आणि काँग्रेसही त्याला किती काळ सांभाळून घेईल, हा भविष्यासाठी संशोधनाचा विषय राहणार आहे. जिग्नेशचे राजकारण जसे काँग्रेससाठी एक आव्हान राहील, तसेच ते गुजरातच्या समाजकारणासाठीही आव्हानच असेल. त्यावरचा तोड काँग्रेसला तर शोधावा लागेलच. पण सोबतच सत्तेतील भाजपालाही त्याच्या राजकारणाचा काटशह पाहून ठेवावाच लागेल.

(समाप्त)

-    अनंत कोळमकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा