विरोधकांनी गेले पाच वर्षांत मोदी सरकारची वाईट प्रतीमा तयार करण्यासाठी जी काही शब्दावली वापरली, ती मोठी आहे. असहिष्णू, प्रतिगामी, फंडामेंटालिस्ट, जातीयवादी, धर्मांध... असे अनेक शब्द विरोधकांनी वापरले. पण चार वर्षांत त्याची कोणताही परिणाम जनतेवर झाला नाही. नोटाबंदी, जीएसटी याचा तात्कालिक त्रास जनतेला झाला... पण विरोधक वगळता सर्वसामान्य जनतेला त्यातील फायदेही कळले होते. शेवटच्या वर्षात राफेलचा मुद्दा मोठा करून भ्रष्टाचाराचा आरोपही सरकारवर करण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेने तेही आरोप झुगारून मोदी सरकारवर विश्वास दाखवला.
निराश प्रकाशराज
23 मे रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून टाकले आहे. स्वबळावर भाजपाला 300 जागा मिळणे व एनडीएला 350 जागा... परत दुसऱ्यांदा बहुमताचे सरकार... गठबंधनाचे सरकारच्या अस्थिरतेचा फायदा घेऊन आपापल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना तर हा जबर धक्काच होता. या अभूतपूर्व अशा विजयाचे विश्लेषण अऩेक जण वेगवेगळ्या प्रकारे करीत आहेत. पण खरं तर मोदींचा हा विजय नकारात्मक व द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या गालावर बसलेली सणसणीत चपराक आहे. दक्षिणी चित्रपटातील प्रसिद्ध कलावंत प्रकाश राज अलीकडे डाव्या पुरोगाम्यांच्या कंपूत विराजमान झाले आहे. तेही या निवडणुकीत उभे होते. त्यांच्या पराभवानंतर त्यांनी नेमकी हीच प्रतिक्रिया व्यक्त केली. निकालानंतर केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले – मोदींचा विजय हा माझ्या गालावर बसलेली सणसणीत चपराक आहे.
ही निवडणूक भाजपने व्यक्तीमाहात्म्य वाढवणारी केली, असा आरोप हास्यास्पद आरोपही विरोधकांनी करून पाहिला. विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ही निवडणूक मोदीकेंद्रित झाली, हे नाकारता येत नाही. पण ती मोदीकेंद्रित करण्याला जबाबदार कोण? कोणी केली ती मोदीकेंद्रित? खरं तर ज्यादिवशी ‘चौकीदार चोर है’ हा नारा लावला गेला, त्याचदिवशी निवडणूक मोदीकेंद्रित व्हायला सुरुवात झाली होती. ज्या कुणाच्या डोक्यातून हा नारा निघाला असेल, त्याला मोदीच कणभरही समजले नव्हते, असे म्हणावे लागेल. हा नारा निर्माण करण्याइतपत डोके राहुलबाबांचे चालेल, असे वाटत नाही. पण कुणातरी दिलेल्या मूर्ख सल्ल्याचे पालन करून प्रत्येक सभेत तो नारा देणारे राहुल गांधी यांनीच ही निवडणूक मोदीकेंद्रित केली. त्याचा फायदा न घेण्यासारखा मूर्खपणा मोदी-शहा ही राजकारण धुरंधर जोडी कधीच करणार नव्हती.... त्यामुळे ही निवडणूक मोदी हवा की मोदी नको... अशीच विरोधकांनीच केली होती.
राफेल प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चूप होण्याची संधी विरोधकांना होती. पण ती संधी त्यांनी गमावली. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला, हे मानायला जनता आजही तयार नाही. फ्रान्सच्या सरकारने व तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी राहुलचा खोटारडेपणा उघड केल्यानंतर तर राहुलची प्रतीमा तशीच जनमानसातून संपली होती. मूर्ख सल्लागारांच्या घोळक्यात राहणाऱ्या राहुलबाबांनी त्यापासून धडा घेतला नाही. ते राफेल उगाळत बसले व चौकीदार चोर है, असे नारे लोकांकडून लावून घेत होते.
सर्जिकल स्ट्राईक व बालाकोट प्रकरणानंतर तर विरोधकांनी आपली उरलीसुरली विश्वासार्हता सामान्य जनतेतून गमावली होती. देशाच्या सुरक्षेच्या मुद्दावरही विरोधक सरकारविरोधी भूमिका घेतील, सेनेने घोषित केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले जातील, आणि पाकिस्तानी नेते जी भूमिका घेत होते, त्याच भाषेत विरोधक बोलतील, याची अपेक्षाच देशातल्या सर्वसामान्य जनतेने केली नव्हती. पण विरोधकांनी तो मूर्खपणा केला. त्यात मग आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केला होता, असे सांगत नेमके वर्ष सांगण्याची काय गरज होती समजले नाही. याबाबत सेनेनेच खुलासा करून अगोदर कोणतेही सर्जिकल स्ट्राईक्स झाले नाही, असे सांगितले. कोणती इज्जत राहिली विरोधकांची यामुळे.
उरलीसुरली कसर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला व ममता बॅनर्जी यांनी पूर्ण केली. मेहबुबा व फारुख यांची थेट तिरंगा काश्मिरात फडकणार नाही, यासारखी भाषा जनतेच्या काही पचनी पडली नाही. आणि ममताचा थयथयाट आकलनापलीकडला होता. एका राज्याची मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात प्रचाराला येऊ देत नाही, भाजपा नेत्यांच्या सभा होऊ देत नाही, पंतप्रधानांन चपराक मारण्याइतपत खालच्या पातळीवरची भाषा वापरते, आणि हे सारं करीत असताना तिचे हावभाव, आक्रमकता... हा सारा प्रकार मुख्यमंत्र्याला शोभणारा नव्हताच. ममताच्या या अशोभनीय भाषा-व्यवहाराने विरोधकांचा पराभव निश्चित करून टाकला.
मोदींचा विजय हा अनेक मुद्दांना जनतेने परस्पर दिलेले उत्तर आहे. स्पष्टच सांगायचे झाल्यास मोदींचा दणदणीत विजय हा मोदींच्या व भाजपाच्या विरोधात उभ्या केलेल्या अनेक संकल्पनांचा दारुण पराभव आहे. त्यातील काही संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत.
- काही लोक पंतप्रधानांवरही विनापुरावा आरोप करतात, त्यांना चोर म्हणतात... आणि तेच लोक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे हनन होत असल्याचे रडगाणे गातात, हे जनतेने ओळखले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हननाच्या त्या रडगाण्याचा हा पराभव आहे.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हननाचे रडगाणे गात प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या प्रकाशराज, अमोल पालेकर, जावेद अख्तर, नयनतारा सहगल यासारख्या कथित पुरोगामी रुदाल्यांचा हा पराभव आहे.
- अतिरेकी गोभक्तांच्या हिंसाचाराच्या घटना देशात शेकडोंनी झाल्या नाहीत. त्या बोटावर मोजण्याइतपतच होत्या. पण तितक्याचा आधार घेऊन आता या देशात राहण्याची भिती वाटण्याचे ढोंग करणाऱ्यांच्या ढोंगाचा हा पराभव होता.
- संसद हत्याकांडातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीवर आक्षेप घेणारे फलक घेऊन मिरविणाऱ्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीयतेचा रंग देणाऱ्या जातीयवादी राजकारणाचा हा पराभव आहे.
- अफझल हम शर्मिंदा हे, तेरे कातील जिंदा है, च्या जेएनयूत घोषणा देणाऱ्या टुकडेटुकडे टोळीचा व त्याच्या समर्थनार्थ तेथे उभ्या झालेल्या निर्लज्ज लोकांचा हा पराभव आहे.
- पंतप्रधांनावर टीका करताना शिव्यांचा वापर करणाऱ्या व त्यांना चोर म्हणत पंतप्रधान पदाचा अपमान करणाऱ्या मोदीद्वेष्ट्यांचा हा पराभव आहे.
- कोर्टाने अमित शहा यांना निर्दोष सोडल्यानंतरही त्यांना तडीपार म्हणणाऱ्या, पण स्वतः जामीनावर बाहेर असलेल्या नेत्यांच्या दोगलेपणाचा हा पराभव आहे.
- अर्बन नक्षल्यांच्या टोळक्यांना समर्थन देणाऱ्या व त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या डाव्या पिलावळीचा हा पराभव आहे.
- अतिरेकी याकूब मेमनला फाशीपासून वाचवण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाला उठविणाऱ्या कथित मानवतावाद्यांचा हा पराभव आहे.
- केवळ अल्पसंख्यकांचे लांगूनचालन करणाऱ्या आणि जेहादी हिंसाचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या ढोंगी सेक्युलरवादाचा हा पराभव आहे.
- प्रत्यक्षात नसलेला हिंदू दहशतवाद ही संकल्पना जन्माला घालून देशातल्या बहुसंख्य हिंदू समाजाला एकजात दहशतवादी ठरविणाऱ्या दिग्विजयसिंग, चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे या नेत्यांच्या मानसिकतेचा हा पराभव आहे.
- मोदींना मी पंतप्रधान मानत नाही, असे म्हणणाऱ्या ममतादिदींच्या अहंकाराचा हा पराभव आहे.
- आपले राज्य हातून जात असताना स्वतःला राष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनवण्याचा, व शक्य झाल्यास पंतप्रधान बनण्याच्या अवास्तव स्वप्नांचा हा पराभव आहे.