बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

टेन्शन तर देऊन गेलाच...

गेल्या आठवड्यात माझ्या कुटुंबाला तीन मृत्यूचे हादरे बसलेत. काकू 95 वर्षांची होती, तर आत्याचे यजमानही वयाची 85 ओलांडते झाले होते. एक परिपूर्ण आयुष्य जगून ते दोघे गेलेत. त्यांचा मृत्यू दुःख देणारा आहेच. पण, माझ्या मामांचा मुलगा, माझा मामेभाऊ, बंट्या गेला... त्याचा हादरा मात्र आम्हा साऱ्यांनाच सुन्न करून गेला आहे. काहीही झाले की, ""दादा, टेन्शन काय कु लेनेका...'' असं म्हणणाऱ्या बंट्याने अशी अचानक केवळ 32 व्या वर्षी एक्‍झीट घेतली अन्‌ आम्हा साऱ्यांनाच नेहमीसाठीच टेन्शन देऊन गेला.
बंट्या... हे त्याचे टोपण नाव. खरं नाव अश्‍विनीकुमार. पण या नावाने त्याला किती जण ओळखतील, हा प्रश्‍नच आहे. नात्यातले सारे त्याला बंट्याच म्हणत आले. काही जण त्याला "गुप्ता' अशी हाक मारायचे. ते नाव त्याला कसे चिकटले माहीत नाही. बंट्या नाव मात्र सर्वमान्य. परवा पोळ्याच्या करीच्या दिवशी, रविवारी दुपारी त्याला "ब्रेनहॅमरेज'चा अटॅक येतो काय आणि अर्ध्या-पाऊण तासात काहीही उपचार न मिळता बंट्या हे जग सोडून जातो... सारंच अतर्क्‍य... त्याला बीपीचा त्रास अगोदरपासून असेल.. ते अचानक वाढले असेल... असं आता बोलल्या जाते... पण "अश्‍विनीकुमार" हे देवांच्या वैद्याचं... डॉक्‍टरचं नाव असलेल्या बंट्याला उपचार मिळाला नाही, ही वास्तविकता आहे. घरून मेडिकलमध्ये हलवताना रस्त्यातच बंट्याने जीव सोडला. मेडिकलमध्ये पोहोचला, तो त्याचा मृतदेहच. तेथल्या नियमानुसार मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. मी पोहोचलो तेव्हा पोस्टमार्टम गृहात त्याचा मृतदेह स्ट्रेचरवर होता. शांत झोपलेला वाटत होता. वाटलं... आता उठेल... नेहमीप्रमाणे गळ्यात हात टाकेल... अन्‌ म्हणेल... ""दादा, टेन्शन काय कु लेनेका...'' पण ते होणे नव्हते... साऱ्यांनाच चुकवून निघून गेला तो.
तू स्वभावाने आक्रमक. पण तरीही तेव्हढाच मृदू, मुलायम... मी आंतरजातीय विवाह केला. नात्यातल्या अनेकांनी माझ्याशी नाते तोडले. पण तू आणि राहूल दोघेही ठाम सोबत राहिले. नात्यातले काही शिव्याशाप द्यायचे मला आणि मंजूला... पण तू भांडायचा त्यांच्याशी आमच्यासाठी... आमचा वकील बनून... एकाने तर "अनंताचा वकील' या शब्दात तुझा उद्धारही केला. ते सारे तू सहन केले आमच्यासाठी. काहींशी नातेही तोडले आमच्यासाठी... कसे विसरणार हे सारं.
तूच नाही, तर राहूल, सोन्या व मामा-मामी साऱ्यांनीच स्वीकारले मला आणि मंजूला. एकदा म्हणाला... ""दादा, हम तो तुम्हारे पिछेही है...'' मग माझ्याच पावलावर पाउल टाकत तूही आंतरजातीय विवाह केला. जन्मभर प्रेम करण्याचे आणि साथ देण्याचे वचन देऊन प्रियाशी लग्न केले होते बंट्या तू... मग ते वचन कसा विसरला तू? तसा तू हट्टी होताच... आपलेच म्हणणे खरं करणारा होता... पण हे करताना प्रियाचा नाही, पण साईचा तर विचार करायचा होता बदमाशा... (मी अनेकदा तुला बदमाश, नालायक वगैरे म्हणायचो थट्टेने..) त्या निरागस साईच्या डोक्‍यावरचा बापाचा हात हिरावण्याचा हक्क तुला कोणी दिला? टेन्शन काय कु लेनेका... म्हणायचा ना तू... मग प्रिया आणि साईला हे टेन्शन कसे काय देऊन गेला तू...? आईबाबावर खूप प्रेम करायचा ना तू... पण त्यांना या वयात सोडून जाताना तूला काहीच वाटले नाही... इतका असंवेदनशील कसा काय झाला रे? मामांना, तुझ्या बाबांना "बंट्या गेला' हे सांगताना "मामा, स्वतःला सावरा... ' असं मी म्हणत होतो.. पण मला माहीत होते की, मी जे म्हणतो, ते मूर्खपणाचे आहे म्हणून. नंतरच्या साऱ्या प्रक्रियेला मामा धीराने समोर गेले... पण ते कोलमडले होते, हे मला जाणवत होते... पण त्यांच्यावर प्रेम करण्याचा दावा करणारा तू शांत होता... इतका पत्थरदिल कधीही नाही पाहिले तुला...
गेल्या वर्षीपासून मातीचे गणपती आणायचा तू विकायला. यंदाही आणले... ते गणपती तयार असायचे. पण तितक्‍यावर तू खूष नव्हता. सारे गणपती तू पुन्हा सजवायचा. मुकुट, माळा स्वतः तयार करायचा... पितांबर नेसवायचा... माझ्यासाठी यंदाही गणपती निश्‍चित केला होता तू. त्याचा फोटोही पाठवला फेसबूकवर... पण काकूच्या निधनामुळे आमच्याकडे यंदा गणपती नाही असं तुला कळवले, तर तू म्हणाला... ""जाऊ द्या ना दादा... लाडूकरांकडल्या गणपतरावांना भेटायला या तुम्ही...'' पण बंट्या, तुझ्या या जाण्याने गणपतीच्या तुझ्याकडील येण्यालाही अटकाव घातला ना तू...
नागपूरच्या मेडिकलमधील पोस्टमार्टमगृहात तुला शांत झोपल्यासारखं पाहण्यापासून माणिकवाड्याच्या त्या स्मशानभूमीत रात्री 9 वाजता भर पावसात आणि वीजांच्या कडकडाटात तुला अग्निनारायणाच्या स्वाधीन करेपर्यंतच्या या प्रवासात हे सारं सारं आठवत होतं मला... तरीही मी शांत होतो... स्वतःला सावरत होतो... माणिकवाड्याच्या लाडुकर वाड्यातील सारे तुझे चुलतभावंडं स्मशानात गोल करून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडत होते... तेव्हाही मी शांत होतो. पण आता नाही सहन होत रे... कोलमडलोय मी... मंजूही हादरली... सावरायचा प्रयत्न करतोय आम्ही... पण नाही जमत रे... नालायका, सारंच टेन्शन देऊन गेला रे तू...

- अनंत कोळमकर

बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

"हार्दिक पटेल'च्या निमित्ताने...



गुजरातमधल्या धनाढ्य समजल्या जाणाऱ्या पटेल-पाटीदार समाजाला अन्य मागासवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मोठे आंदोलन गुजरातमध्ये उभे केले. यानिमित्ताने पुन्हा "आरक्षण' या विषयावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. सोशल मिडियावर तर प्रतिक्रियांचा अक्षरशः धबधबा कोसळत आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया टोकाच्या आहेत. केवळ पटेल समाजातच नव्हे, तर सर्वच राज्यांमध्ये तेथतेथल्या उच्चभ्रू, धनवंत व आजवर सत्तेच्या सान्निध्यात राहणाऱ्या समाजसमुहांना आरक्षणाचे स्वप्न पडायला लागले आहे. मराठा, जाट आरक्षणाच्या मागण्यांमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडते. परवा फेसबूकवर छान पोस्ट होती... ""या देशाला विकसित कसे म्हणायचे... जेथे प्रत्येक समाज स्वतःला मागास ठरविण्याचा आटापिटा करतो आहे...!''

वास्तविकतः या समस्येचे मूळ नेमके काय, यावर कोणीही गंभीरतेने विचार करताना दिसत नाही. आरक्षणाला विरोध करणारे, 'ते जातीय आधारावर नकोच', अशी भूमिका घेतात... तर आरक्षणाचे समर्थक "आरक्षण आमचा अधिकार आहे', असा दावा करतात. या दोन्ही भूमिका, दोन्ही दावेच मुळात चूक आहेत.

पहिली भूमिका - जातीय आधारावर आरक्षण नकोच...! ही भूमिका घेताना सर्वप्रथम आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की, आपल्या मनातून "जात' गेली का? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाल्यास याचे उत्तर "नाही' असेच आहे. कुणी कितीही पुरोगामित्वाचा टेंभा मिरवित असले, तरी त्याच्याही मनात "जात' आहेच. उगाच नाही म्हणत ""मेल्याशिवाय जात नाही ती "जात'!'' हिंदूंच्या मूळ समाजरचनेत (वेद, मनुस्मृतीत सांगितलेल्या) असलेली "कर्माधारीत' जात आज काही समाजघटकांच्या स्वार्थापायी भ्रष्ट होऊन "जन्माधारीत' बनली आणि आपणही ती कवटाळून बसलो. आज समाज बदलत चालला आहे. स्पृश्‍यास्पृश्‍य भेद फारसा राहिला नाही. आंतरजातीय विवाह होत आहे. ते मान्यही होत आहे. पण याचा अर्थ "जात' संपली, असा नाही. परीणामी जातीभेदही आहे. दारावर आलेला याचक ब्राह्मण असेल तर त्याला दिलेले ते दान आणि तो मागास असेल ती भिक... ही मानसिकता अजूनही आहे, हे कसे नाकारता येईल?
मागास जातींमधल्या अनेकांपर्यंत अजूनही विकास, लोकशाही पोहोचलेली नाही, ही वास्तविकता आहे. एका गिताच्या ओळी आठवतात...
उगा सूर्य कैसा कहो मुक्ती का ये,
उजाला करोडो घरों मे ना पहुंचा...
खुला पिंजडा है मगर रक्त अब भी,
थके पंछियों के परों मे ना पहुंचा...''
या ओळी ऐकायला कटू असल्या, तरी सत्य आहेत. त्यामुळे जोवर मनामध्ये "जात' आहे, तोवर जातीय आधारावरील आरक्षणाला विरोध नसावा
पण...

त्याहून सर्वाधिक गंभीर धोका आहे, "आरक्षण आमचा अधिकार आहे' हे मानण्याचा... समाजरचनेतील शोषित, वंचित, दुर्लक्षित, मागास घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठीची आरक्षण ही सवलत आहे. तो घटनेने दिलेला मदतीचा हात आहे. सवलत आणि अधिकार, यात फरक आहे.
एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलेला एक अनुभव येथे नमूद करावासा वाटतो. ते प्राध्यापक असतानाची गोष्ट. त्यांच्या महाविद्यालयात मागास घटकातील पहिल्या तीन हुशार विद्यार्थ्यांना पुस्तक-वह्या घेण्यासाठी एक अल्पसा निधी मदत म्हणून दिल्या जायचा. एके वर्षी त्या तीन नावात जिल्हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्याच्या मुलाचा क्रमांक लागला. प्राध्यापकांनी विचार केला, बड्या पगारावरील अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या त्याला तशीही या अल्प निधीची काय गरज... त्याने जर या मदतीची गरज नसल्याचे लिहून दिले, तर मागास घटकातीलच चौथ्या क्रमांकावर असलेल्या हुशार विद्यार्थ्याला ती मदत मिळू शकते....! प्राध्यापकांनी तसे त्याला म्हटले. तो म्हणाला, वडिलांना विचारतो... दुसऱ्या दिवशी त्याने प्राध्यापकांना सांगितले... ""बाबा नाही म्हणाले... कारण ते म्हणाले, ती मदत आपला अधिकार आहे...''
आरक्षणाचा फायदा घेऊन मागास समाजघटकातले अनेकजण समाजाच्या वरच्या उच्चभ्रू वर्गात पोहोचले आहेत. जातीभेदाचा फटका या वर्गाला बसत नाही. त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षणात, नोकरीत अडथळे येत नाही. अशा वर्गातल्या लोकांनी स्वतःपुरते आरक्षण का नाकारू नये... वाद नेमका येथे आहे... मागास जातीतील आरक्षण घेऊन बड्या पगाराच्या, हुद्यांच्या नोकरीवर काम करणाऱ्यांनी, आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांनी आपल्या पाल्यांसाठी आरक्षणाची सवलत का नाकारू नये? त्यांनी तसे केले, तर त्यांच्याच समाजातील दुसऱ्या गरजूला त्याचा फायदा मिळू शकतो... पण हे होत नाही, हे गंभीर आहे. आणि त्याचमुळे जातीय आरक्षणाला विरोध होत आहे.
यावरचा सुवर्णमध्यच काढायचा झाल्यास तो एकच निघू शकतो... जातीय आधारावरचे आरक्षण अजून संपवणे योग्य नाहीच. पण त्या आरक्षणाला आर्थिक बंधन घातले पाहिजे. तर मग आरक्षणाचा गैरफायदा टाळता येईल. सोबतच अन्य समाजघटकांमधील आर्थिक मागास घटकांनाही आरक्षणाची तरतूद करण्याची गरज आहे. पण या साऱ्याला आर्धिक आधार असलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे, हे सारे करताना एक साऱ्यांनीच सतत लक्षात ठेवले पाहिजे, मनात ठामपणे मनात बिंबवले पाहिजे की, आरक्षण ही सवलत आहे... मदतीचा हात आहे... अधिकार नाही!

- अनंत कोळमकर

मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

मुक्ताताईंची अंधश्रद्धा


नरेन्द्र दाभोळकर यांच्या भूमिकेबाबत, विचारांबाबत मतभेद असले तरी, त्यांच्या कार्याबाबत आदर आहेच. हिंदू समाजातील कुरिती, अनिष्ट प्रथा-परंपरा यांना दाभोळकरांनी विरोध केला. त्यादृष्टीने ते नक्कीच समाजसुधारक होते. पण श्रद्धा व अंधश्रद्धा यातील अंधूकशी असलेली सीमारेषा त्यांनी समजूनही दुर्लक्षित केली व सध्या आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला हिंदूविरोध त्यांच्या कार्यशैलीतून सतत जाणवत राहिला, ही वास्तविकता नाकारता येत नाही आणि तितक्याचमुळे त्यांच्या कार्याबाबत अनादरही ठेवणे योग्यही नाही. त्यांचा अंधश्रद्धा निर्मुलनाचा वारसा त्यांची मुलगी मुक्ता व मुलगा हमीद चालवत आहे. सोबत आपले पुरोगामित्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पूरस्कार देण्याला काही कथित मान्यवर पुरोगाम्यांनी पत्र काढून विरोध केला. त्यात मुक्ता दाभोळकर यांचाही समावेश होता. ते अपेक्षित होतेच. कारण आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी ते आवश्यक होते. पण हे करताना आपल्यावर जातीयतेचा आरोप होऊ शकतो, हे मुक्ताताईंच्या फार उशिरा लक्षात आले आणि मग त्यांनी पत्रक काढले. पण हे पत्रक म्हणजे मुक्ताताईंच्या अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण आहे. आव्हाड-पवार प्रभृतींचा पुरंदरेंना विरोध का आहे, हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले आहे. पुरंदरेंचे ब्राह्मणत्व, हिंदुत्व इतक्याचमुळे त्यांना विरोध झाला. हिंदुत्व मानणारे राष्ट्रद्रोही, समाजद्रोही असतात, असा कथित पुरोगाम्यांचा आवडता सिद्धांत आहे. त्या सिद्धांतानुसारच हा विरोध झाला.
मुक्ताताई म्हणतात, जातीयवादातून पुरंदरेंना विरोध केला नाही. मग का केला…? त्या सांगतात, पानसरेंनी मांडलेल्या धर्मनिरपेक्ष शिवाजीच्या प्रतिमेला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रभूषण पूरस्काराचा वापर करण्याला आमचा विरोध आहे. मुक्ताताई या विधानातून दोन मुद्दे नकळतपणे मांडतात. (१) हा पूरस्कार सरकारने दिला. म्हणजेच धर्मनिरपेक्ष शिवाजीच्या प्रतिमेला विरोध करण्यासाठी सरकारनेच या पूरस्काराचा वापर केला. (२) पुरंदरेंनी शिवाजी धर्मनिरपेक्ष मांडला नाही. पहिला मुद्दा राजकीय आरोपाचा आहे. पण पुरंदरेंनी शिवाजी धर्मनिरपेक्ष मांडला नाही, हे सांगणारे काही उदाहरणे मुक्ताताईंनी द्यावयास हवे होते. मग त्यावर चिकित्सक विश्लेषण करता आले असते.
पण याच पत्रकात मुक्ताताई पुरंदरेचे कौतुक करतात. पुरंदरेंनी शिवचरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवले, असे कौतुकोद्गार काढतात.
म्हणजे पुरंदरेंचे हे कर्तृत्व मुक्ताताई मातीमोल ठरवतात… का तर, त्यांच्या कथित धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेत पुरंदरेंचा शिवाजी बसत नाही. मग त्यांच्या संकल्पनेतला धर्मनिरपेक्ष शिवाजी कोणता…? तर तो त्यांच्या कथित पुरोगामी धर्मनिरपेक्ष इतिहासकारांनी मांडलेला शिवाजी… बाकी सब झूठ… आपलाच शिवाजी खरा, या संकल्पनेवर अशी टोकाची श्रद्धा ही अंधश्रद्धा नव्हे काय…? पुरंदरेंनी जो शिवाजी मांडला, तोच त्याअगोदर अनेकांनी मांडला… पण तो खोटा व आताच्या ‘शिवधर्मवादी’ इतिहासकारांचाच मात्र खरा, या स्वतःच्या समजावरची टोकाची श्रद्धासुद्धा अंधश्रद्धाच होय….

- अनंत कोळमकर