रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

नमोद्वेष अधिक घातक

नमोद्वेष अधिक घातक

गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदीवर प्रचंड चर्चा सुरू आहे. ही चर्चा करणारे दोन्ही बाजूच्या व्यक्ती आर्थिक क्षेत्राच्या तज्ज्ञ आहेत की नाही हा प्रश्नच आहे. मोदीसमर्थक नोटोबंदीचे स्वागत करीत आहे. तर, बॅंकंसमोर रांगा लागल्यात, लोकांना प्रचंड त्रास होतोय, लोक मरताहेत असे आरोप मोदीविरोधकांनी आळवणे सुरू केले. अक्षरशः ओकारी येण्यासारखी ही चर्चा सुरू आहे. त्यावर मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. एका मित्राने (तो मोदीविरोधक आणि कट्टर कॉंग्रेसी आहे) फोन केला. तो माझ्या पोस्टशी सहमत होता. तो म्हणाला या मुद्द्याचे तू विश्लेषण केले पाहिजे. मलाही ते पटले.

माझी ती पोस्ट होती....

अंध नमोभक्ती वाईट आहे....
पण त्याहून अधिक घातक आहे नमोद्वेषाचा रोग...
या रोगानेच मोदींना सत्तेत आणण्याचा मार्ग मोकळा केला.
तरीही विरोधकांना ते उमगले नाही...
बहुमत ते आघाडी, आघाडी ते 44 असा उतरणीचा प्रवास 4 पर्यंत नेण्याचा व नंतर महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला शून्य-कॉंग्रेस पर्यंत नेण्याचा तर हा कट नाही ना....?
खरं तर या सा-या चर्चेत मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरू झालेली अफरातफर टाळता आली असती का... हो... थोडी आणखी पूर्वतयारी केली असती तर काही प्रमाणात (तोही अल्प प्रमाणातच) हा गोंधळ टाळता आली असता. पण, कितीही तयारी केली असती तरी गोंधळ झाला असताच. पण मूळ मुद्दा आहे नोटाबंदीचा निर्णय चूक आहे का... तो देशासाठी घातक आहे का.... भ्रष्टाचार, आतंकवाद याच्या मुळाशी काळा पैसा, बनावट पैसा आहे, हे मान्य आहे की नाही... मान्य असेल तर अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसने त्यासाठी काय केले..., मान्य नसेल तर मग नेमका उपाय काय... अणि विशेष म्हणजे मोदी आल्यानंतरच या सा-या समस्या निर्माण झाल्या काय?

या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न झाला ना, तर माझ्या वरील पोस्टचा मथिथार्त सहज लक्षात येतो. कोणत्याही व्यक्तीची आंधळेपणाने केलेली पूजा, भक्ती समाजकारण व राजकारणात गैरच... मग ती 'Indira is India' असो की मोदी हेच सा-याचे तारणहार, असं समजणे... हे सारेच गैर. त्यामुळे मोदींचे आंधळेपणाने समर्थन करणे चूक मानलेच पाहिजे. पण तितकीच मोठी चूक मोदींचा द्वेषही आंधळेपणाने करणे ही सुद्धा आहे. मोदी चुकले असतील, चुकत असतील तर त्यांना फटकारले पाहिजेच. पण केवळ मोदीद्वेषापोटी ते करणे न्यायोचित मानता येणार नाही.

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदींच्या निर्णयावर टीका केली. ते अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यात दम असेलच. पण मग त्याच पदावर राहिलेल्या सुब्बारावांच्याही म्हणण्यात दम असेल ना. तो कसा नाकारता येईल? सुब्बाराव म्हणाले निर्णय धाडसी आहेत. काही दिवस त्याचा त्रास होईल. पण काही चांगलं व्हायचे असेल तर, लोकांनी तो त्रास सहन केला पाहिजे. मोदींच्या निर्णयावर टिका करणारे सारे काही अर्थतज्ज्ञ नाहीत. मग दोन अर्थतज्ज्ञ त्यावर दोन वेगवेगळी मते मांडत असताना चर्चा करणा-या विद्वानांनी आपले अकलेचे कांदे पाजळू नये ना... मोदी मागतात तर द्या 50 दिवस. मोदीवर उपकाराचे दडपण आणण्यासाठी अणखी एखादा महिना द्या. आणि मग फायदे दिसले नाही, तर झोडपा ना मोदी व त्यांच्या सरकारला आडवेतिडवे.

पण नाही... तो धीर अणि ते धाडसही नमोरुग्णांमध्ये नाही, ही खरी वास्तविकता आहे. मुळात या नमोरुग्णांना मोदी हे रसायनच माहीत नाही. मोदी पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीच्या रणसंग्रामात ख-या अर्थाने उतरले, तेव्हा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत एक दिवस वावरण्याचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा योग प्रस्तुत लेखकाला आला. तेव्हा नुकतीच गोध्रा दंगल झाली होती. मोदी बदनाम झाले होते अणि त्यांच्याच नेतृत्वात गुजरात भाजपा दंगलीनंतर लगेच होणा-या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे झात होती. मोदींना ओळखणे एका दिवसात शक्य नाही. पण त्या एका दिवसात मोदी जितके समजले, जितके उमगले, त्यावरून तरी मोदी कोणतीही खेळी विनाविचाराने खेळतील असे वाटत नाही. मोदी जो काही डाव खेळतील, तो पूर्ण विचाराने असतो. विशेष म्हणजे त्या डावाचा तात्कालिक परिणाम काय होणार हे मोदी पूर्णतः जाणून असतात. तरीही तो डाव ते खेळतात. मोदी नावातील खरे रसायन हे आहे. गोध्रा दंगलीनंतर आपण बदनाम होणार, हे मोदींना ठाऊक नव्हते, असे समजणे चूक आहे. तितके मूर्ख मोदी नक्कीच नाही. पण दूरगामी विचार केल्यास परिणाम काय दिसतो..? सर्वाधिक हेटाळणीला पात्र ठरलेला मोदी आज पंतप्रधान आहे, पण त्याहूनही महत्त्वाचा एक परिणाम आहे. गोध्रा दंगल 2002मध्ये झाली. त्याअगोदर गुजरातमध्ये दर दोन-चार वर्षांतून जातीय दंगल व्हायची. आता या दंगलीला 14 वर्षे झालीत व या कालावधीत एकही दंगल गुजरातमध्ये झाली नाही. सांगायचा मुद्दा एव्हढाच की एखाद्या निर्णयाचा दूरगामी परिणाम लक्षात न घेण्याइतपत मोदी अजाण नाही.

विशेष म्हणजे मोदी बनावटीचे हे मूलभूत रसायन विरोधकांनी जाणून न घेतल्यामुळेच आज मोदी बहुमताने सत्तेत आहे. कधीकाळी देशावर सत्ता करण्याचा अधिकार केवळ कॉंग्रेसचाच, असे मानून तिलाच सत्तेत बसवणा-या जनतेनेच तिला बहुमतातून आघाडीच्या राजकारणात व मोदीउदयानंतर तर 44च्या संख्येवर आणून ठेवले. कारण एकमेव आहे मोदीद्वेषाचा रोग. तो एकजात सा-या मोदी-भाजप विरोधकांना झाला आहे. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला तर या रोगाने लुळेपांगळेच करून टाकले आहे. या निर्णयातले चांगलेपण त्यांच्यातील ज्येष्ठश्रेष्ठांनाही कळते. पण अविचारी व्यक्तींच्या हाती नेतृत्व गेले की मग केवळ मोदींचे द्वेषच दिसतात.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेसुद्धा अर्थमंत्री राहिले आहेत. आता तर ते राष्ट्रपती आहेत. त्यांना मोदी सरकारची एखादा निर्णय पटला नाही तर त्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनीही या निर्णयाची स्तुतीच केली. पंतप्रधान राहिलेले माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग अजून मौन आहेत. मोदींचा निर्णय चूक असता तर त्यांनी का बरे त्या निर्णयाला कडाडून विरोध केला नाही? विशेष म्हणजे ते पंतप्रधान असताना त्यांनी पाचशेची नोट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हणतातच ना. फक्त त्यांचे धाडस झाले नाही इतकेच. राहता राहिला प्रश्न चिदंबरम या माजी अर्थमंत्र्यांचा. त्यांनी विरोध केला. पण ज्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत आणि ज्यांची चौकशी मोदी सरकारने सुरू केली, त्यांच्या टीकेला निष्पक्ष तर नक्कीच म्हणता येणार नाही.

खरं तर मोदींना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यासाठी चांगला व परिणामकारक उपाय होता. निर्णयाचे स्वागत खुल्या दिलाने केले असते आणि तो अंमलात आणण्यासाठीच्या उपायातील त्रुट्यांवर टीका करीत लोकांना या निर्णयाच्या बाजूने उभे राहण्यास सांगितले असते, तर विधायक विरोधकाचा शिक्का सा-याच विरोधी पक्षांवर लागला असता. पण तसे त्यांनी केले नाही. त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे कॉंग्रेसलाच. भाजपच्या विरोधात सक्षम विरोधी पक्ष म्हणून कोणी उभे राहू शकत असेल तर तो कॉंग्रेस हाच पक्ष आहे. पण कॉंग्रेसची हायकमांड स्वनामधन्यतेतून बाहेर पडायला तयार नसेल व नमोद्वेषाच्या काविळीने पिवळे होण्यातच ती धन्यता मानत असेल तर मग कॉंग्रेस संपुष्टात आणण्याची महात्मा गांधींची सूचना व कॉंग्रेसमुक्त भारताचे मोदींचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याला फार वेळ लागणार नाही.

- अनंत कोळमकर
askolamkar@gmail.com


मंगळवार, १९ जुलै, २०१६

बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट

'सकाळ'च्या मंगळवार, दि. १९ जुलै, २०१६ च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख

= = = = = = = = = = = = = = = =

बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट
मंगळवार, 19 जुलै 2016 - 12:00 AM IST

सरकारी पातळीवरील उदासीनता, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे आणि आरोग्यसेवेचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे यामुळे विदर्भातील आदिवासी भागाभोवती बालमृत्यू, कुपोषणाचा फास घट्ट होत आहे.

सध्या मंत्रालयात विदर्भाची चलती आहे, असे म्हटले जाते. मुख्यमंत्री विदर्भाचे. अर्थ व वनमंत्री विदर्भाचे. गृह मंत्रालयही विदर्भाकडेच. कधी नव्हते एवढ्या संख्येने विदर्भाचे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. इतकेच नाही, तर तिकडे दिल्लीत विदर्भाच्या गडकरींची "पॉवर‘ आहे. चंद्रपूरचे हंसराज अहीरही केंद्रात गृह खात्याचे राज्यमंत्री आहेत. विदर्भाच्या वाट्याला सत्तेची इतकी श्रीमंती कधीही नव्हती; पण ही श्रीमंती आता नव्याची नवलाई राहिलेली नाही. दोन वर्षांहून अधिक काळ या श्रीमंतीला लोटला आहे. त्या सत्ता-ऐश्‍वर्याचा फायदा विदर्भात दिसतो आहे काय, याचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. विदर्भात विकास दिसतच नाही, असे म्हणणे धाडसाचे असले, तरी तो विकास सर्व क्षेत्रांत दिसत नाही, हेही अमान्य करता येत नाही. त्यातही आरोग्यासारखे क्षेत्र तर अजूनही दुर्लक्षित आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी, चिखलदरा हे तालुके कुपोषणाचा बळी असलेला भाग म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जातात. बालमृत्यू, मातामृत्यू यासाठी हे तालुके कुख्यात आहेत. या परिस्थितीत काही सकारात्मक बदल झाला आहे काय? हे मृत्यू रोखण्याचे काही प्रयत्न झाले काय? त्यात यश आले काय? दुर्दैवाने या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थी द्यावी लागतील, अशी सध्या तरी स्थिती आहे. परिस्थिती एवढी गंभीर आहे, की आता केवळ मेळघाट परिसरच कुपोषणाच्या विळख्यात नाही, तर ते लोण यवतमाळ, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांतही पोचले आहे

मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 119 बालमृत्यू झाले. यवतमाळात एकट्या जून महिन्यात 33 बालमृत्यूंची नोंद झाली. एप्रिल 2015 ते मार्च 2016 या गेल्या वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात हा आकडा 139 एवढा होता. दुर्गम, जंगल क्षेत्रातच हे मृत्यू झालेत, असेही नाही. विदर्भाच्या टोकाला असलेल्या उमरखेड तालुक्‍यात सर्वाधिक 17 मृत्यू झाले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर जिल्हास्थान असलेल्या यवतमाळ तालुक्‍यातील आकडा 16 आहे. वणी, महागाव, पांढरकवडा, नेर या तालुक्‍यांतही बळींची संख्या दोनआकडी आहे. जूनमधील 33 मृत्यूमध्ये तर एकट्या पांढरकवडा तालुक्‍यातील 14 बालकांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही तीव्र कमी वजन असलेली 405 बालके आढळून आली आहेत. ती सारीच कुपोषित श्रेणीत मोडणारी आहेत. त्यातही जिल्हास्थान असलेल्या भंडारा तालुक्‍यात सर्वाधिक 90 बालके आहेत. त्यापाठोपाठ लाखांदूर 80, पवनी 71, लाखनी 55, मोहाडी 39, तुमसर 39, साकोली 31 अशी कुपोषित बालकांची संख्या आहे. हे सारे सरकारी आकडे आहेत. सरकारदफ्तरीही या बालमृत्यूंची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर गेल्या वर्षभरात 39 मातामृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील 28 मातांचा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्‍यांतही वेगळी स्थिती नाही

या माता-बालमृत्यू व कुपोषणाचे मुख्य कारण सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे व आरोग्यसेवेचा लाभ स्थानिक जनतेपर्यंत न पोचणे हीच आहेत. अंधश्रद्धा, शुद्ध पाण्याचा अभाव, निरक्षरता हीसुद्धा कारणे आहेत; पण आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष, डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, पोषण आहाराचा दर्जा नीट नसणे, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सोयी नसणे या कारणांचे काय? एकट्या मेळघाटचा विचार केला तर 70 हून अधिक अशी गावे आहेत, ज्यांचा पावसाळ्याच्या दिवसांत संपर्क पूर्णपणे तुटतो. धारणी व चिखलदरा तालुक्‍यातील 40 ते 45 लहान पूल पाण्याखाली जातात. परिणामी या गावांचा अनेक दिवस मुख्यालयाशी संपर्कच होऊ शकत नाही. अनेक गावांमध्ये अजूनही वीज नाही. मग दूरध्वनी व दळणवळणाच्या अन्य साधनांचा तर विचारच न केलेला बरा. हीच स्थिती अन्य जिल्ह्यांतील दुर्गम भागात आहे. ती बदलायची कोणी

आरोग्य विभागाबाबत तर बोलण्याची सोयच नाही. धारणीत उपजिल्हा रुग्णालय आहे. बालमृत्यू आणि कुपोषणामुळे हा तालुका बदनाम आहे. इथल्या उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही. पद आहे; पण डॉक्‍टरच नाही. या रुग्णालयात एक्‍स- रे मशीन आहे, मात्र तंत्रज्ञाचा पत्ता नाही. त्यामुळे मशीन बंद स्थितीत धूळ खात पडून आहे. आरोग्य विभागाकडून भरतीबाबत पाठपुरावा होतो, मात्र नियुक्ती होत नाही. केवळ धारणीची ही स्थिती नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व अन्य कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. काही ठिकाणी रुग्णालयात यंत्रसामग्री आहे, मात्र ती नावापुरतीच. तिचा लाभ स्थानिक रुग्णांना होत नाही. याला कारण एकच... सरकार नावाची यंत्रणाच गंभीर नाही

नाही म्हणायला शासकीय यंत्रणेत प्रत्येक तालुक्‍यात बालविकास प्रकल्प अधिकारी नावाचा अधिकारी असतो; पण किती ठिकाणी तो आहे? एकट्या भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्‍यांपैकी सहा तालुक्‍यांतील हे पद रिक्त आहे. अशीच स्थिती कमीअधिक प्रमाणात राज्यातील इतर जिल्ह्यांतही आहे. कुपोषण दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ मिशन व बालकल्याण विभागातर्फे पोषण अभियान चालविले जाते; पण परिणाम काय? या दोन्ही अभियानांसाठी विशेष निधी वा पोषण आहाराची सोयच नाही. त्यांनी कुपोषण दूर करण्यासाठी करायचे काय? तर कार्यशाळा घ्यायची... पीडित कुटुंबांच्या घरांना भेटी द्यायच्या आणि करायचे काय... तर फक्त समुपदेशन

या परिस्थितीत गेल्या दोन वर्षांत कोणताही बदल झाला नसेल तर सत्ता-ऐश्‍वर्याचा फायदा विदर्भाला झाला, असे कसे म्हणता येईल? राज्यात व केंद्रात मोठ्या संख्येने विदर्भातील मंत्री आहेत; पण सत्तास्थानाचा फायदा आरोग्यासारख्या मूलभूत सेवाक्षेत्रात दिसणार नाही, तोवर विदर्भाभोवतीचा बालमृत्यू, कुपोषणाचा फास असाच आवळत राहणार आहे

- अनंत कोळमकर 

मंगळवार, ७ जून, २०१६

अग्निकोठारातील तांडव

'सकाळ'च्या रविवार दि. ५ जून, २०१६च्या 'सप्तरंग' पुरवणीत पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या आग-स्फोटाच्या घटनेसंदर्भात मी लिहिलेला मुख्य लेख...
----------------------------------

अग्निकोठारातील तांडव


पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराचा परिसर सुमारे 10 हजार एकर क्षेत्रात पसरला आहे. या परिसराला लागून एका बाजूने पुलगाव शहर आहे, तर दुसऱ्या टोकावर जवळच देवळी शहर. सोबतच या परिसरालगतच आगरगाव, नागझरी, पिपरी, लोणी अशी 12-13 छोटीमोठी खेडी आहेत. देवळी, पुलगाव व नजीकच्या या गावांमधले लोक सोमवार, 30 मे ची रात्र जन्मात विसरू शकणार नाही. दिवसभरच्या वाढत्या तापमानाच्या झळा सोसून थकलेले जीव झोपेच्या अधीन होते. मध्यरात्रीनंतर तर गाढ झोपेचा अंमल. रात्रीचा सव्वा वाजला असेल अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला. काहींच्या तर कानाचे पडदेही फाटलेत. या स्फोटाने दूरदूरपर्यंत जमीनही हादरली. डोळे उघडून पाहतो, तर घराच्या भिंतींना तडे... दारे-खिडक्‍या निखळलेले ... सारेच घाबरून बाहेर आले. बाहेरचे दृश्‍य तर आणखीनच भयावह. दूर भांडाराच्या दिशेने आगीचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. त्याचा तांबूस प्रकाश दुरून दिसत होता...
केंद्रीय दारूगोळा भांडारात लागलेली आग व स्फोट याचा अनुभव घेणाऱ्याने केलेले हे वर्णन. या घटनेतील मृतांचा लष्कराने दिलेला अधिकृत आकडा 16. वृत्तसंस्थानी दिलेला आकडा 19. अनधिकृत सूत्र सांगतात 21. संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीत 130 टन स्फोटके नष्ट झालीत, असे सांगण्यात आले. हा प्राथमिक अंदाज. प्रत्यक्षात मोजदाद होईल, तेव्हा हा आकडा मोठा झालेला असेल. प्रश्‍न केवळ या दुर्घटनेत किती हानी झाली वा कितींचे बळी गेले, हा नाहीच. प्रश्‍न आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या स्थानांवरच्या सुरक्षा उपायांमध्ये काही त्रुट्या आहेत का, हे तपासण्याचा. पुलगावच्या घटनेत लष्कर, सरकार, प्रशासन कुठे कमी पडले, तपास घेण्याची गरज आहे.
पुलगाव हे देशाच्या जवळजवळ मध्यभागी असणारे स्थान आहे. त्यामुळे सेनेला लागणारा दारूगोळा पुरविणाऱ्या भांडारासाठी ही जागा नेमकी मोक्‍याची, सोयीची आणि सुरक्षेचीही. देशभरीतील आयुधनिर्माणीतुन तयार असलेली स्फोटके येथे येतात व नंतर ती येथून देशभरातील सबडेपोंना वितरित होतात आणि तेथून ती लष्करी तळांवर जातात. कालबाह्य झालेली स्फोटके या डेपोंमधून पुलगावच्या मुख्य डेपोत येतात आणि येथेच ती नष्ट केली जातात. भारतीय लष्करासाठी अतिशय महत्त्वाचे असे ठिकाण आणि देशातला सर्वात मोठे भांडार. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि गोपनीयता ही तितकीच चोख असते. परवाच्या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्यांनाही या भांडार परिसरात प्रवेशाची परवानगी मिळाली नाही, यावरून तेथील सुरक्षितेची कल्पना येते. बंदुकीच्या गोळ्यांपासून ते क्षेपणास्त्रांच्या स्फोटकांपर्यत विविध स्तराची स्फोटके येथे सुरक्षितपणे साठवून ठेवण्यात आली आहे. बाह्य सुरक्षाही चोखबंद आहे. असे असतानाही ही दुर्घटना घडली. जवान शहीद झाले. लाखमोलाची स्फोटके नष्ट झालीत. त्याहून ही अधिक गंभीर बाब म्हणजे या भांडाराला राष्ट्रीय ठेव मानणाऱ्या व त्याबाबत अभिमान बाळगणाऱ्या परिसरातील गावकऱ्यांवर एक भितीचे, दहशतीचे सावट पसरले. ते सावट अधिक चिंताजनक आहे.
या भांडाराची ओळख देवळी-पुलगाव परिसरातील लोकांना "डेपो' म्हणूनच आहे. या डेपोत काय आहे, याची इंत्यभूत माहिती भलेही परिसरातील लोकांना नसेलही; पण, भारतीय लष्कराला लागणारा दारूगोळा येथे आहे व स्यामुळे देशासाठी त्याचे महत्व काय, याची कल्पना त्यांना आहे. या डेपोचे महत्त्व सोमवारच्या आगीने जगासमोर आले; पण, या परिसरातील माणसे सारं काही माहीत असूनही डेपोबाबत बाहेर खूप काही बोलत नाही... सांगत नाही... या मौनामागे राष्ट्रभक्ती आहे अन्‌ डेपोच्या सुरक्षिततेची चिंताही आहे. सोमवारच्या घटनेनंतर प्रसिद्धी माध्यमांमध्ये डेपोबाबत बरंच काही लिहून येत आहे. त्यात डेपोच्या पर्यायाने राष्ट्राच्या सुरक्षेला हानी पोहचू शकेल, अशा काही गोपनीय बाबीही उत्साही पत्रकारितेमुळे उघड होत आहे. त्यामुळे परिसरातील जनतेच्या चिंतेत आणखी भर पडत आहे. अशा स्थितीत डेपोवर असलेल्या त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी लष्करी प्रशासनाची आहे, हे येथे ध्यानात घेतले पाहिजे.
पुलगावच्या डेपोत वा देशभरातील अशा अन्य डेपोत काही पहिल्यांदा आग लागली नाही. पुलगावच्याच डेपोत 2005च्या मार्चमध्येही आग लागली होती. पण ती लवकरच आटोक्‍यातही आणली गेली होती. मे 1989मध्ये डेपोतील रेल्वे प्लॅटफॉर्मवर बॉम्बच्या पेट्या उतरताना स्फोट झाला होता. त्यात काही कामगार ठारही झालेत. पण डेपोंमधील आगींच्या इतिहासातील सर्वात भीषण आग जम्मू-काश्‍मीरमधील खुंदरू सबडेपोतील होती. 12 ऑगस्ट, 2007 रोजीच्या या घटनेत 40 लोक ठार झालेत; तर, 1313 कोटींची स्फोटके नष्ट झाली होती. राजस्थानात भरतपूरपासून 7 किमी अंतरावरील कंजोली गावाजवळ असणारा डेपो सर्वात जुना व मोठा डेपो आहे. येथे 28 एप्रिल, 2000मध्ये आग लागली व 393 कोटींची स्फोटके जळून खाक झालीत. मे 2001 मध्ये राजस्थानातीलच बिरदावल युनीटमधील आगीत 378 कोटींची स्फोटके नष्ट झालीत. महाराष्ट्रातही पुण्याच्या दारूगोळा भांडारात (एप्रिल 1992, ऑक्‍टोबर 1994 ) पुण्याच्याच आयुध निर्माणीत (मे 1995), देहू रोडच्या भांडारात (मे 2000) आगीच्या घटना घडल्यात. विदर्भातल्या भंडारा आयुध निर्माणीत एप्रिल 1990, मे 2005, 2008, ऑगस्ट 2010 अशा चार वेळा, तर भद्रावती आयुध निर्माणीत 2005 या एकाच वर्षात जानेवारी व एप्रिल या दोन महिन्यात आगी लागल्या.
या आगी मुद्दामहून लावल्या, असे नाही. नकळतपणे झालेल्या मानवी चुका व दुर्लक्ष आणि कधीकधी अपघाताने या आगी लागतात; पण, दारूगोळा भांडारातील आग ही केवळ आग राहत नाही. त्याला स्फोटांचीही जोड असते. पुलगावातही तेच झाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी "कोर्ट ऑफ इन्क्वायरी'ची घोषणा केली. त्यातून आगीचे नेमके कारण माहीत होईलही. शक्‍यतोवर गोपनीयतेच्या कारणांमुळे या चौकशीचे निष्कर्ष सर्वसामान्यांना माहीतही होणार नाही. ती व्हावी, अशी अपेक्षाही नाही. पण या चौकशीतून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या अशा डेपोंमधील या प्रकारच्या दुर्घटनांना आळा बसणार आहे काय व आजूबाजूच्या नागरिकांवरील दहशातीचे सावट दूर होईल काय? हे डेपो आसपासच्या जनतेला रोजगार पुरविणारे साधन आहे. एकट्या पुलगावच्या डेपोत 4 हजाराहून अधिक स्थानिक लोक विविध कामे करतात. देशभरातील अन्य डेपोमध्येही स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. त्यांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांना या डेपोंबाबत आत्मीयता आहे आणि राष्ट्रीय अभिमानही ती आत्मीयता, अभिमान कायम टिकावा, या दृष्टीने प्रशासनाला प्रयत्न करावे लागतील.
आजवरचा अनुभव पाहता या डेपोंनी वा आयुधनिर्माणींनी पांघरलेले गोपनीयतेचे कवच त्यांना जनतेशी जोडण्यातला प्रमुख अडथळा आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. ही गोपनीयता सुरक्षेच्या दृष्टीने अपरिहार्य असली, तरी काही वेळा त्याचा अतिरेक होतो की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती डेपो व आयुधनिर्माणी व्यवस्थापनाकडून निर्माण केली जाते. पुलगावच्याच घटनेचेच उदाहरण घ्या... या आगीदरम्यान झालेल्या स्फोटांमुळे 50 किमीच्या परिसराला हादरे बसले, रात्रीच्या अंधारातच गावकरी घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले, 20च्या घरात बळींची संख्या गेली, परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व लष्करप्रमुख दलबिरसिंग सुहाग स्वतः तातडीने पुलगावात पोहोचलेत... इतकी गंभीर परिस्थिती व परिसरावर भितीचे सावट पसरले असताना डेपो व्यवस्थापनाने मात्र तोंडावर मौनाची पट्टी बांधून घेतली. एकही जबाबदार अधिकारी शक्‍य तेव्हढी माहिती अधिकृतपणे देण्यास समोर आला नाही. मृतांची ओळख पटणे शक्‍य नव्हते, पण बेपत्तांची नावे तरी दिली का? स्फोटामुळे आता घाबरण्याचे कारण नाही, किंवा ही सावधानता बाळगा, असा दिलासा देणारे आवाहन तरी डेपो प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्याने समोर येऊन करावयास हवे होते. त्यामुळे जनतेतील भीती, कायम राहीली आणि मग उत्साही प्रसारमाध्यमांनी मन वाटेल तशा बातम्या देणे सुरू केल्या. हे थांबवता आले असते... गोपनीयतेचा अतिरेकी आग्रह अशा आणिबाणीच्या प्रसंगात शिथील केला असता तर... या स्फोटात शहीद झालेल्या मेजर मनोजकुमार बाबत लोकांना सहानुभूती व आपुलकी होती. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्याचे कारण नेमके हेच आहे. मनोजकुमार यांनी हा अतिरेकी आग्रह लवचिक केला होता. ते जनतेत मिसळायचे, पत्रकारांशी बोलायच. त्यामुळे डेपोबाबत एक आपुलकीची भावना तयार झाली होती. मनोजकुमार सुरक्षिततेला हानी पोहोचवणारी कोणतीही गुप्त माहिती देत नव्हते; पण, तरीही ते जनमानसात स्थान पटकावून होते. हीच बाब डेपो प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या लक्षात यावयास हवी. असे झाले तरच पुलगावच्या अग्निकोठारातील तांडवापासून आपण काही शिकलो, असे म्हणता येईल.

- अनंत कोळमकर

रविवार, १५ मे, २०१६

तेलंगणाची दादागिरी

"सकाळ'च्या बुधवार, दि. 11 मे, 2016 रोजी प्रसिद्ध झालेले विदर्भ वार्तापत्र

मुंबईतील सरकार कुणाचेही असो, ते विदर्भाकडे, इथल्या समस्यांकडे, इथल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करीत असते, ही भावना इथल्या जनमानसात मूळ धरून आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शेजारचे तेलंगणा राज्य दादागिरी करीत आहे; तरी आपले सरकार ढिम्म आहे. हा या दुर्लक्षपणाचा कळस आहे.
पोचमपल्ली ः मेडिगट्टा-कालेश्‍वर धरणाला विरोध करताना गावकरी

महाराष्ट्र सीमेच्या अगदी जवळ तेलंगणा राज्यात गोदावरी नदीच्या काठावर कालेश्‍वर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या कालेश्‍वरजवळच तेलंगणा सरकारने नुकतेच मेडिगट्टा-कालेश्‍वर धरणाचे भूमिपूजन केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः या कार्यक्रमासाठी तेथे आले. या धरणाचा परिणाम राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यावर होणार असल्याने तिथल्या गावकऱ्यांचा या धरणाला विरोध आहे. ते आंदोलन करीत आहेत; पण महाराष्ट्र सरकार मात्र अजूनही शांत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन नुकतेच विदर्भात आले होते. त्यांना या धरणाबाबत विचारले असता, याबाबत सरकारला काहीच माहीत नसल्याचे उत्तर दिले. आपल्या राज्याच्या सीमेवर शेजारचे राज्य एक मोठा प्रकल्प उभारतो आहे, त्याचे थाटात भूमिपूजन करतो, त्या कार्यक्रमाच्या मोठमोठ्या जाहिराती महाराष्ट्रातही प्रसिद्ध करतो आणि तरीही इथल्या सरकारच्या ते गावीही नाही, यावर कोणाचा विश्‍वास बसेल?
कालेश्‍वरपासून 4-5 किलोमीटर अंतरावर मेडिगट्टा गावाजवळ गोदावरीवर हे धरण होत आहे. मात्र, सिरोंचा तालुक्‍यात असलेले पोचमपल्ली हे गाव या धरणाच्या अगदी लागून आहे. या धरणाचा खर्च अंदाजे 10 हजार कोटी राहणार आहे. धरणाची उंची 103 मीटर असणार आहे. या धरणातून 144 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातून तेलंगणातील हैदराबाद शहरासह अनेक जिल्ह्यांची तहान भागविली जाणार आहे व 30 लाख हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होणार आहे. हा प्रकल्प दोन राज्यांच्या सीमेवर होत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी एकत्र बसून पाणीवाटप, पुनर्वसन, नुकसानभरपाई याबाबतचा निर्णय घ्यायला हवा; पण तसे काहीही न होता थेट भूमिपूजन झाले. तरीही महाराष्ट्र सरकारने कोणताही विरोध अद्याप दाखवलेला नाही. पण, तेलंगणातल्या वृत्तपत्रांमधील माहिती खरी मानल्यास सिरोंचा तालुक्‍यातील 21 गावे व 25 हजार हेक्‍टर जमीन या धरणात बुडणार आहे. आणि म्हणूनच या प्रकल्पाला या गावातील गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील गावांच्या जिवावर तेलंगणा सरकार त्यांच्या राज्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही तृष्णातृप्ती विदर्भातील गावांच्या जिवावर उठली आहे. खरेतर तेलंगणाची ही दादागिरी आजची नाही. तो आंध्र प्रदेशचा भाग असतानापासून ही दादागिरी सुरू आहे. सिरोंचा तालुक्‍यातीलच चपराळा गावाजवळ वर्धा व वैनगंगा नदीचा संगम होतो व पुढील प्रवास ही नदी प्राणहिता नावाने करते. या प्राणहिता नदीवरही तेलंगणा सरकार प्राणहिता-चेवेल्ला धरण बांधत आहे. त्यातही महाराष्ट्रातील गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) व चामोर्शी (जि. गडचिरोली) तालुक्‍यातील गावे जाणार होती. विशेषतः चपराळा अभयारण्यातील काही भागही त्यात जाणार होता. त्यामुळे आंदोलनाचा भडका उठताच तेलंगणा सरकारने धरणाची उंची कमी केली. त्यामुळे जे पाणी कमी झाले, त्याच्या भरपाईसाठी मेडिगट्टा धरणाला चालना दिली आहे.
इतक्‍यावरच तेलंगणाची हाव थांबलेली नाही. हीच प्राणहिता कालेश्‍वरजवळ गोदावरीला मिळते व गोदावरी नावानेच पुढचा प्रवास करते. म्हणजेच चेवेल्ला धरण ते मेडिगट्टा धरण हा प्राणहिता-गोदावरीचा प्रवास अवघ्या 160 किलोमीटरचा आहे. त्यात आणखी तिसऱ्या मोठ्या धरणाचे संकट घोंघावू लागले आहे. प्राणहितेवरच सिरोंचा तालुक्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या सोमनूर गावाजवळ इचमपल्ली धरण प्रस्तावित होते. मुळात निजामशाही असताना या धरणाची संकल्पना मांडण्यात आली होती. नंतर छत्तीसगड राज्याने या धरणाला विरोध केला. परिणामी हे धरण थंडबस्त्यात पडले. हेही धरण पूर्ण करण्याचे तेलंगणा सरकारने मनावर घेतले आहे. ते प्रत्यक्षात आले तर एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील 80हून अधिक गावे व 35 हजार हेक्‍टरहून अधिक जमीन पाण्याखाली येण्याची भीती आहे.
एकंदरीत केवळ 160 किलोमीटरच्या टप्प्यात तीन मोठी धरणे उभारून तेलंगणा सरकार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो गावकऱ्यांच्या व येथील समृद्ध वनसंपदेच्या मुळावर उठले आहे. पण, या साऱ्यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भातले व त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातले, आणखी एक मंत्री अम्ब्रीशराजे आत्राम हेही गडचिरोली जिल्ह्यातले, केंद्रातले मंत्री हंसराज अहीर चंद्रपूरचे, विदर्भाचेच नितीन गडकरी केंद्रात प्रमुख मंत्री... इतकी शक्तिशाली सत्ताधारी नेत्यांची यादी असतानाही तेलंगणा सरकार विदर्भावर आपली दादागिरी कशी दाखवत आहे? आताही जर सरकार व सत्तारूढ पक्षाचे नेते आपले मौन सोडणार नसतील, तर मग मुंबईतील सरकार कुणाचेही असो, ते विदर्भाकडे, इथल्या समस्यांकडे, इथल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करीत असते, अशी भावना इथल्या जनमानसात तयार होत असेल तर त्यात चूक काय?
 
बारा गावांत दोन सरकार
या भागातला आणखी एक प्रश्न महाराष्ट्र सरकारने थंडबस्त्यात टाकला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यातील बारा गावे तेलंगणाच्या सीमेला लागून आहेत. या गावांवर तेलंगणा सरकार आपला दावा दाखवत आहे. मजेची बाब म्हणजे, या गावांमध्ये दोन्ही राज्यांचे प्रशासन आहे. दोन ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या निवडणुकाही वेगवेगळ्या होतात. महाराजगुडा हे गाव तर अर्धे महाराष्ट्रात आणि अर्धे तेलंगणात आहे. या गावातील लोकांना दोन्ही राज्यांच्या सोयीसुविधा मिळत असल्याने त्यांच्या या व्यवस्थेला विरोध नाही. पण, ही व्यवस्था योग्यही नाही. मात्र तरीही कोणत्याही सरकारने यावर तोडगा काढलेला नाही.

- अनंत कोळमकर

कॉंग्रेसने मुहूर्त साधला, पण...

"सकाळ'च्या बुधवार, दि. 20 एप्रिल, 2016 रोजी प्रसिद्ध झालेले विदर्भ वार्तापत्र

कॉंग्रेसने मुहूर्त साधला, पण...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने कॉंग्रेसने नागपुरात एका मोठ्या जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही उपस्थित होते. या मातापुत्रांनी एकाच सभेला संबोधित करण्याचे प्रसंग फार कमी आहेत. नागपूरने तो योग साधला. सभेला उपस्थित जनतेची संख्या हा निकष लावला तर ही सभा दणदणीत झाली... यशस्वी झाली, हे नाकारता येत नाही. हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन असल्याचे सभेच्या पूर्वी माध्यमांमधून बोलले जात होते. सभेची पूर्वतयारी ज्या पद्धतीने सुरू होती ती पाहता कॉंग्रेसजनांनीही या सभेला शक्तिप्रदर्शनाचेच स्वरूप दिले होते, हे सहजपणे दिसून येत होते. तसे असेल तर हे शक्तिप्रदर्शन यशस्वी झाले, हे मान्य करावेच लागेल. राहुल गांधी आक्रमक मूडमध्ये होते. त्यांच्या भाषणाच्या गुणवत्तेचा विचार सोडला, तरी टाळ्या घेणाऱ्या वाक्‍यांची पेरणी त्यांच्या भाषणात नेमक्‍या ठिकाणी होती आणि ती वाक्‍ये त्यांनी नेमक्‍या वेळी वापरलीही. ती वाक्‍ये आणि मोदी, भाजप, संघ यांच्यावर प्रखर टीकास्त्र यामुळे त्यांचे भाषणही जोरदार झाले; पण अचानक या शक्तिप्रदर्शनाचे कारण काय, हा प्रश्‍न अनेकांना होता व हा प्रश्‍न गैरलागूही नव्हता.
बाबासाहेबांबाबत कॉंग्रेसला किती आदर होता, त्यांच्यावर कॉंग्रेसचे किती प्रेम होते, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची आज गरज नाही. ती साऱ्यांनाच चांगल्या रीतीने माहीत आहेत. तरीही बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीदिनाचे निमित्त साधून नागपुरात हे शक्तिप्रदर्शन करण्याची दोन प्रमुख कारणे आहेच. एकतर नागपूर ही दलित समाजासाठी प्रेरणाभूमी आहे. धम्मक्रांतीचा बिगुल बाबासाहेबांनी येथील दीक्षाभूमीवरून फुंकला. आज त्या क्रांतीचे पडसाद व त्यातून निर्माण झालेली दलितशक्ती साऱ्या देशभरच नव्हे, तर जगभर दिसून येत आहे. बाबासाहेबांनी या दलितशक्तीचे रूपांतर राजकीय शक्तीत करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केला; पण त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ताकदीचा नेता या समाजाला मिळाला नाही. परिणामी रिपब्लिकन पक्ष तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागला गेला. अशा स्थितीत दलित समाज कॉंग्रेसच्या जवळ गेला. मात्र 90च्या दशकानंतर हा समाज कॉंग्रेसपासून दुरावला. आजची पक्षाची दयनीय अवस्था बघता या समाजाला परत कॉंग्रेसच्या जवळ आणणे, हा मुख्य हेतू या सभेमागे होता. त्यासाठी बाबासाहेबांच्या जन्मदिनाचा मुहूर्त आणि दीक्षाभूमी असलेल्या नागपूरचे स्थान निवडणे, ही पक्षाची अचूक रणनीती म्हणावी लागेल.
रणनीतीचा दुसरा भाग होता, विदर्भाला चुचकारण्याचा. विदर्भ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. कॉंग्रेसच्या नावावर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, अशी स्थिती विदर्भात होती. आंध्रातील पी. व्ही. नरसिंहराव आणि काश्‍मिरातील गुलाम नबी आझाद यांना विदर्भात कुणीही ओळखत नसतानाही ते येथून लोकसभेवर निवडून गेले, याचे एकमेव कारण विदर्भातील कॉंग्रेसची शक्ती हेच होते. पण आज ही स्थिती बदलली आहे. सर्वच्या सर्व दहा खासदार ज्या विदर्भातून कॉंग्रेसचे निवडून यायचे, त्याच विदर्भात आज या पक्षाचा एकही खासदार नाही. पक्षाची ही अवस्था येथील नेत्यांच्या नाकर्तेपणाने झाली. रिपब्लिकन पक्षाच्या फुटीनंतर कॉंग्रेसकडे वळलेला दलित मतदार या पक्षाला टिकवता आला नाही. अल्पसंख्याक समाजही दुरावला. त्याचा नेमका फायदा भाजपने उचलला. आज विदर्भातले आठ खासदार एकट्या भाजपचे, तर दोन खासदार त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचे आहेत. एकेकाळी विदर्भातल्या प्रत्येक गावात कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता. अशी स्थिती असणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष होता. आजही कॉंग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे, पण तसाच कार्यकर्ता आता भाजपचाही आहे. भाजपची मातृसंघटना मानली जाणाऱ्या संघाच्या शाखा तेव्हाही गावागावात होत्या; मात्र त्याचा फायदा भाजपला नव्हता. पण आज स्थिती बदलली आहे. गावखेड्यातला तरुणवर्ग भाजपच्या तंबूत मोठ्या प्रमाणात आहे.
एका योगायोगाची येथे नोंद करणे आवश्‍यक आहे. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस विदर्भात पराभूत झाली, त्या त्या वेळी तो पक्ष केंद्रातूनही सत्तेबाहेर गेला. त्यामुळे विदर्भातील गमावलेली शक्ती परत मिळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही सभा होती. म्हणूनच ती सभा यशस्वी करण्याची सक्ती विदर्भातल्या नेत्यांवर होती आणि ती सक्ती होती म्हणूनच सभा यशस्वीही झाली. सभेला कार्यकर्ता आणण्याची जबाबदारी या नेत्यांसाठी ऐच्छिक ठेवली असती, तर या सभेचे स्वरूप काय राहिले असते, हे सांगण्यासाठी कोण्या तज्ज्ञाची गरज नाही.
कॉंग्रेसने विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे प्रत्यंतर सभेनंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून येते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ काळानंतर आपली कार्यकारिणी घोषित केली. 235 जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत विदर्भाला 67 पदांचा जम्बो वाटा मिळाला आहे. या 67 पदाधिकाऱ्यांमध्ये काही नवीन व उत्साही तरुण चेहरे आहेत. हा एक चांगला संकेत आहे. पण बोटावर मोजता येतील एवढ्या तरुण नेत्यांच्या भरोशावर पक्षाला विदर्भात उभारी देता येईल काय, हा खरा प्रश्‍न आहे. कार्यकारिणीतील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी दीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे. त्या सत्तेच्या जोरावर त्यांनी कोणाचा आणि कशाचा विकास केला, हा संशोधनाचा विषय आहे. या नेत्यांनी स्वतःच्या ताकदीवर विकास विदर्भात खेचून आणला असता तर वेगळ्या विदर्भाची मागणीही समोर आली नसती आणि पत घसरून कॉंग्रेसची विदर्भातली स्थितीही दयनीय झाली नसती. त्यांना आता जनतेनेच नाकारले आहे. त्यांच्या भरोशावर पक्ष विदर्भात मजबूत करण्याच्या स्वप्नाला दिवास्वप्नाशिवाय दुसरे संबोधनच देता येणार नाही. अशा स्थितीत राहुल-सोनियांच्या सभेचा करिष्मा जनतेपर्यंत पोहोचवता येणेही शक्‍य नाहीच. त्यावर पक्षश्रेष्ठी काय उपाययोजना करतात, यावर पक्षाचे भवितव्य व पुढचा प्रवास अवलंबून राहणार आहे.

- अनंत कोळमकर

रविवार, १ मे, २०१६

‘सैराट’च्या निमित्ताने...



नागनाथ मंजुळे यांची डाव्या वादाकडे झुकणारी वैचारिक बांधिलकी सर्वांना माहीत आहे. पण केवळ तितक्या मुद्द्यावरून मंजुळेंच्या एका कलाकृतीवर, चित्रपटावर टीका करणे अयोग्य आहे, असे मला वाटते. एक पत्रकार, जनसंवाद शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच मी त्याकडे पाहतो. एक चांगली प्रेमकहाणी, नवागत कलावंतांचा निकोप व सर्वांगसुंदर अभिनय, रांगड्या ग्रामीण ढंगाच्या मराठीतील संवाद, गावचे वातावरण आणि उत्कृष्ट छायाचित्रण यासाठी या चित्रपटाला 100 टक्के गुण द्यावे लागेल. पण...



प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराटया मराठी चित्रपटाबाबत गेल्या चार-पाच दिवसांपासून बरेच उसटसुलट लिहिले जात आहे. त्यामूळे हा चित्रपट पाहायचाच असे ठरवले आणि पाहलाही. मंजुळे यांची डाव्या वादाकडे झुकणारी वैचारिक बांधिलकी सर्वांना माहीत आहे. डाव्या विचारधारेबाबत मला प्रेम नाही. आहे तो विरोधच! पण केवळ तितक्या मुद्द्यावरून मंजुळेंच्या एका कलाकृतीवर, चित्रपटावर टीका करणे अयोग्य आहे, असे मला वाटते. एक पत्रकार, जनसंवाद शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच मी त्याकडे पाहतो. एक चांगली प्रेमकहाणी, नवागत कलावंतांचा निकोप व सर्वांगसुंदर अभिनय, रांगड्या ग्रामीण ढंगाच्या मराठीतील संवाद, गावचे वातावरण आणि उत्कृष्ट छायाचित्रण यासाठी या चित्रपटाला 100 टक्के गुण द्यावे लागेल.

एक टीका आहे, अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांना असे चित्रपटातून दाखवणं योग्य नाही. संस्कृतीचे अतिउत्साही भक्त अशी टीका करणा-यात समोर आहे. खरे तर या टीकेमागे डाव्या विचारांच्या मंजुळेंबाबतचा दुषित पूर्वग्रह आहे, असे मला वाटते. टाईमपास चित्रपटामध्येही तेच प्रेम होते. शाळा मधले प्रेम अबोल असले तरी तेही शाळेतलेच होते. मग सैराटवर टीका करण्यात काय हशील? मुळात सैराटमध्ये कॉलेजच्या पहिल्या वर्षात जाणा-यांचे प्रेम दाखवले आहे. ते अल्पवयीन प्रेम नाही व संपूर्ण चित्रपटात ते अपरिपक्व (unmatured) वाटत नाही. चित्रपट हे जनसंवादाचे माध्यम आहे. जनसंवादाच्या माध्यमांना समाजमनाचा आरसा म्हणतात. समाजात जे घडते, जे जाणवते, त्याचे दर्शन या माध्यमांमधून होत असते. तसेच ते चित्रपटांमधूनही घडते. आजच्या आधुनिक जगात शाळांमध्ये प्रेम होत नाही, असे म्हणणे म्हणजे सत्यापासून पळ काढणे होय. असे असताना ते चित्रपटात येऊ नये वा दाखवू नये, असे म्हणणे तद्दन मुर्खपणा होय. कोंबडं झाकल्याने सकाळ व्हायची राहणार नाही आणि मंजुळेंनी सैराट काढला नसता, तर अशी प्रेमप्रकरणे उघडकीस आलीच नसती, असे होत नाही. त्यामुळे सैराटच्या विषयाला विरोध करणे चूक आहे. ते दाखवताना तारतम्य ठेवावे, ही सूचना योग्य आहे. पण मंजुळेंनी ते तारतम्य ठेवले, असे मला वाटते.

तरीही मला हा चित्रपट फारसा आव़डला नाही. मंजुळेंचे दिग्दर्शन चांगले आहे, कथानक चांगले आहे, कलाकारांचा अभिनय चांगला आहे, पण तरीही तो विस्कळीत आहे. मध्यंतरापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट नंतर मात्र तुकड्यातुकड्यांमध्ये दिसतो अन् त्यामुळे तो डोक्यातच शिरत नाही. खरं तर स्पष्ट सांगायचे झाल्यास चित्रपटाचा शेवट काय करायचा हेच नागराजअण्णांना उमगले नाही आणि त्या गोंधळात चित्रपट ओढूनतोडून ताणल्या गेला, असेच मध्यंतरानंतर प्रत्येक दृश्य पाहताना जाणवत राहते. नवीन जोडप्यातले ताणतणाव,  तिचे रागावणे, त्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तिचे सर्व सोडून जाणे आणि अचानक परत य़ेणे, सर्व सुरळीत होणे आणि नंतर एकदम तिच्या भावाकडून तिचा व त्याचा खून... हा सारा घटनाक्रम चित्रपटात ठिगळ्यांसारखा दिसतो. तसे मंजुळेंनी का केले, हे अखेरपर्यंत समजतच नाही. चित्रपट कधी संपला, हे अवाक प्रेक्षकांना न कळणे व ते खिळून राहणे, हे दिग्दर्शकाचे यश मानले जाते. सैराट संपतो, तेव्हाही प्रेक्षकांना चित्रपट संपला हे ध्यानात येत नाही. पण ते जेवाहा भानावर येतात तेव्हा हट्... हा काय शेवट आहे असे म्हणतात, यातच सर्व काही आले.

मंजुळेंना या चित्रपटातून काय संदेश द्यायचा होता, हेच लक्षात येत नाही. जातीयवाद आहे व त्याचा प्रवाहाच्या विरोधात पोहणा-यांना जाच असतो, हे केवळ सांगायचे असेल, तर तसे सांगणारे अनेक चित्रपट आले आहेत. जातीयवादाचे जोखड झुगारून प्रेमविवाह करणा-या जोडप्यांच्या कौटुंबिक जीवनात अनेक ताणतणाव असतात, हे काही लपून नाही व तोही विषय चित्रपटांमधून चावून चोथा झाला आहे. मग आंतरजातीय विवाह करणा-यांच्या नशिबी फक्त आणि फक्त मृत्यूचाच शेवट असतो, असा संदेश तर नागराजअण्णांना चित्रपटाच्या शेवटातून द्यायचा नाही ना... कारण चित्रपटाचा शेवट पाहल्यानंतर तरी तसेच वाटते. त्या प्रेमी जोडप्याच्या रक्तात भिजलेले पाय घेऊन रडत जाणा-या त्यांच्या चिमुकल्याला उद्याचे भविष्य असे गोंडस नाव काहीजण देत आहे. पण हे भविष्यही रक्ताळलेलेच राहणार, असे मंजुळेंना सांगायचे आहे का?

चित्रपटातल्या आंतरजातीय प्रेमाला समर्थन देणारे, सवर्णही दिसतात. हा समाजातला सकारात्मक बदल मंजुळेना हायलाईट का करता आला नाही? की, हा बदल मंजुळेंना मान्य नाही? जातीयवाद्यांचा तीव्र विरोधाला, कौटुंबिक ताणतणावाला समर्थपणे तोंड देऊन यशस्वी संसार करणा-या त्या जोडप्याची विजिगीषू वृत्ती शेवटापर्यंत का नेता आली नाही? लग्नानंतरचा नायिकेच्या घरातला ताणतणाव अनेक दृश्यांतून दाखवणा-या मंजुळेंना दलित नायकाच्या घरातला ताणतणाव फक्त दोन दृश्य दाखवून (एक त्य़ाचे कुटुंब घर सोडताना आणि नंतर जातपंचायतीसमोर असहाय असतानाचे) कसा काय संपवता आला?

नागराज मंजुळे
खरं तर नागराजअण्णांच्या डाव्या विचारसरणीचे दर्शन मला या ठिगळस्वरूप आलेल्या शेवटातून होते. या डाव्या विचारसरणीने एक ठिगळ असेच चित्रपटात दिसते. चित्रपटात आनंद असतो. प्रेमी जोडपे आपल्या बाळासह स्वतःचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी घर पहायला जातात. परतताना ते छान आनंदात असतात. एकदम एक दृश्य दिसते. भगवे झेंडेवाले संस्कृतीरक्षक प्रेमी जोडप्यांना उठबशा काढायला लावत असताना... आणि आनंदी जोडपे त्याकडे निरिच्छपणे पाहत जाते... त्या दृश्याचा संदर्भ ना या दृश्याच्या अगोदर लागतो व ना नंतर... केवळ भगवे झेंडेवाल्यांचा आकस दाखवण्याची व संस्कृतीरक्षकांच्या वेडेपणाचे ठिगळ लावण्याची (सु)बुद्धी नागराजअण्णांना त्यांच्यातल्या डाव्या विचाराने दिली असावी, असे वाटते... एका चांगल्या कथानकाची, चांगल्या चित्रीकरणाची, चांगल्या अभिनयाची व मंजुळेंच्या चांगल्या दिग्दर्शनाची मध्यंतरानंतरच्या विस्कळीत ठिगळ्यांनी पार वाट लावली, असेच सैराट पाहून बाहेर पडताना सतत जाणवत राहते...

-    अनंत कोळमकर

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

वडाची साल पिंपळाला...


चीनमध्ये शहीद झालेल्या वीरजवान शहीद हनुमंतप्पाची वीरपत्नी महादेवी म्हणाली, “देशाला एका लढाईसाठी आता सज्ज व्हावे लागेल.” वीरपत्नी महादेवीजींचा इशारा स्पष्ट आहे. डाव्या पुरोगाम्यांचा देशद्रोही धिंगाणा त्याला पाठिंबा देणारी तथाकथित बुद्धिजीवींची पिलावळ, हाच आता देशासमोरचा खरा धोका आहे. त्याविरोधातल्या लढाईसाठी देशाला सज्ज व्हावे लागेलच... 

    मला माझ्या शालेय जीवनातला एक किस्सा आठवतो. वर्गात एक साधासरळ मुलगा होता. कोणाच्या अधे नाही... मधे नाही, असा खाक्या. आपलं काम बरं आणि आपण बरं... आता असा मुलगा वर्गाचे टार्गेट असणार, हे सोबत आले. तोही काहीच बोलायचा नाही. एक दिवस मात्र नवल झाले. कालपर्यंत शांत असणारा हा मुलगा एकदम उसळला... आणि मग त्याने प्रत्येकाची खरपूस हजेरी घेतली. शांत मुलाने आक्रमक होऊन घेतलेली हजेरी पुराव्यानिशी होती. त्याला टार्गेट करणारे आता एकदम बिचकले... हादरले... गोंधळले.... आणि मुकेही झाले. काही काळ गेला आणि मग ते पुन्हा एकजूट झाले. मग सुरू झाला वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार. तो किती नालायक आहे, हे सांगण्याचा प्रकार...


  हे सारं आठवण्याचे कारण म्हणजे, जेएनयु प्रकरणावरील लोकसभेतील चर्चेत केंद्रीय मानवसंधारण मंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या भाषणावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेली टीका. खरं तर त्या भाषणावर सर्वसामान्य लोक खूष आहेत. फक्त टीका सुरू आहे, तथाकथित बुद्धिजीवींकडून. आणि स्पष्टच सांगायचे झाल्यास डाव्या विचारावर पोसलेल्यांकडून. आजवर ही स्वघोषित पुरोगामी पिलावळ स्मृती इराणींवर काय काय आरोप करीत होते आठवा... ती नट आहे... येथून ते तिने महाविद्यालयाचे तोंडही पाहिले नाही इथवर ते आरोप होते. काही पुरोगामी तर अतिशय खालच्या स्तरावरची टीका करायचे. जेएनयू प्रकरणात तर या टिकेला आणखीनच जोर चढला होता. पण, इराणी शांत होत्या. लोकसभेत परवा बुधवारी मात्र त्या उसळल्या. आणि त्यांनी तडाखेबंद भाषणात विरोधकांचे अक्षरशः वाभाडे काढले.

    इराणींच्या त्या भाषणाने काँग्रेस, डावे सभागृहातले सारे विरोधक अक्षरशः हादरले होते. ज्यांनी हे भाषण ऑनलाईन पाहिले, त्यांनी त्यावेळची विरोधकांची हतबल देहबोली स्पष्टपणे पाहिली असेल... एकाही विरोधी खासदाराला उभे राहून इराणींना अडवण्याची हिंमत झाली नाही... कारण स्पष्ट होते, तिला विरोध करण्यासाठीचे पूरकच त्यांच्याजवळ नव्हते... आता दुस-या दिवशी मात्र सा-यांना कंठ फुटला आणि सुरू झाला वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार...

    इथे एक गोष्ट सर्वप्रथम नमूद करणे मला आवश्यक वाटते. इराणींचे भाषण आक्रमक होते, त्यांची देहबोली आक्रमक होती... एक मंत्री म्हणून ते योग्य आहे की नाही, हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. पण त्यामुळे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे गांभीर्य कमी होत नाही. विरोधकांच्या आजवरच्या बेलगाम आरोपांवर, टिकेवर इराणी चूप होत्या तर त्यांचे मौन ही स्वीकृती, असा आरोप विरोधक करायचे... मग आज त्या बोलल्या आणि परखड बोलल्या तर त्यांची आक्रमकता स्वीकारण्याची हिंमत आणि सहिष्णुतताही ठेवली पाहिजे.

रोहितचा मृत्यू

    इराणींच्या भाषणावर आता जी टीका सुरू झाली, त्यातला एक मुद्दा आहे, हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्येच्या घटनेत डॉक्टरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा. इराणी म्हणाल्या, रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच्याजवळ दुस-या दिवशी सकाळपर्यंत कुण्याही डॉक्टरला जाऊ दिले नाही. हे सांगितल्यानंतर त्यांनी सवाल केला की, डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच रोहितला कोणी मृत घोषित केले? आता विद्यापीठ प्रशासनातील कोणी महिला डॉक्टर म्हणाल्या की, रोहितचा मृतदेह खाली काढल्यानंतर काही वेळानेच मी तपासले त्याला मृत घोषित केले होते. आता ओरड सुरू झाली इराणींनी संसदेत खोटी माहिती दिल्याचा.

    हा आरोप झाल्यानंतर मी इराणींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिपिंग पुन्हा पाहिली आणि ऐकलीही... पुरोगाम्यांचा आणि डाव्यांचा कांगावा खोटारडेपणा दिसतो तो येथे. इराणींनी वरची माहिती दिली... पण ती देताना त्या म्हणाल्या... ही माझी माहिती नाही... ही तेलंगणा पोलिसांची माहिती आहे. त्यांचा रिपोर्ट आहे! त्याचवेळी कोणी विरोधी खासदार त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर ईराणी म्हणतात, तेलंगणात तुमचे सरकार आहे... या रिपोर्टचा खरेखोटेपणा तुम्ही तपासून घ्या ना... आणि मग त्या रिपोर्टमध्ये काय मजकूर आहे, हे इराणींनी वाचून दाखविले. हा मजकूर म्हणजे वरची माहिती...

    आता प्रश्न आहे, माहिती कोणाची खरी मानायची... तेलंगणा पोलिसांनी दिलेली की कुण्या डॉक्टरने दिलेली कथित माहिती? सरकार नावाच्या यंत्रणेने अधिकृतता कशाला द्यायची? जी डॉक्टर आज तब्बल पाच महिन्यानंतर तोंड उघडते, ती खरी आहे, हे कोणत्या आधारावर मानायचे...? आणि ती डॉक्टर खरी असेल तरी इराणी दोषी ठरत नाही. मग आरोपीच्या पिंज-यात उभे करावे लागेल तेलंगणा सरकारला, त्यांच्या पोलिस प्रशासनालाकेंद्र सरकारला खोटी माहिती दिल्याबद्दल.

इराणींची पत्रे

    हैद्राबाद विद्यापीठात समाजविघातक शक्तींचा प्रभाव वाढत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून येत आहे, त्यावर कारवाई करा, असं निर्देश देणारे पत्र स्मृती इराणींनी वारंवार विद्यापीठाला पाठविले. त्यावर विरोधकांचा आक्षेप आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी तक्रार केली त्यात भाजपा खासदार मंत्री बंगारू दत्तात्रेय यांचाही समावेश आहे. त्यामुळे दत्तात्रेय इराणींनी राजीनामा द्यावा ही विरोधकांची मागणी. आता इराणींनी संसदेत काय केले. त्यांनी काँग्रेसचे दात त्यांच्याच घशात घातले. दत्तात्रेय यांनी जितकी पत्रे पाठविलीत त्याहून अधिक पत्रे काँग्रेस खासदार हनुमंतराव यांनी पाठविलीत. त्याच्या तारखा आणि पत्रे त्यांनी सभागृहात ठेवलीमग दुसरा कांगावा सुरू झाला... पण इराणींनी एव्हढी पत्रे विद्यापीठाला का पाठविलीत...?

    आहे ना हास्यास्पद प्रकार... प्रशासनाची कार्यशैली निश्‍चित असते. कुणाचेही आणि विशेषतः एखाद्या लोकप्रतिनिधीचे तक्रारीचे पत्र आले की ते कारवाईचे निर्देश देऊन संबंधितांकडे पाठवणे. तेच इराणींनी केले. विशेष म्हणजे हनुमंतराव दत्तात्रेय यांच्या सा-या तक्रारीत समाजविघातक शक्तींचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप होता. त्यामुळे इराणींची जबाबदारी मंत्री म्हणून अधिक होती. मग त्यांनी ती पत्रे हैद्राबाद विद्यापीठाकडे पाठवली. यात वेगळे काय? तसे करणे, हीच मंत्री म्हणून ईराणी यांची जबाबदारी होती. समजा ते केले नसते तर… इराणींवर आरोप करायला हनुमंतराव मोकळे की, पहा… हे सरकार खासदारांच्याही पत्रांवर कारवाई करीत नाही…

जेएनयुतील धिंगाणा

    पुरोगाम्याचा अड्डा असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काय झाले, हे सा-या जगाने पाहिले आहे. तिथल्या देशद्रोह्यांची तळी उचलणारे कोण आहेत, हेसुद्धा आता सा-यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा लिहण्याची गरज वाटत नाही. या प्रकरणावर याअगोदरच्या ब्लॉगमध्ये मी लिहिले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काय चालते हे स्मृती इराणींनी पुराव्यानिशी सभागृहात मांडले. ते पुरावे नाकारणे कुणालाही शक्य नव्हतेच... त्यामुळे खोटी माहिती सभागृहात देऊन इराणींनी सभागृहाचा अवमान केल्याचा प्रस्ताव अजून दोन दिवसात कुणीही संसदेत आणलेला नाही.

    मग इराणींवर टीका करायची कशी? पुन्हा वडाची साल पिेपळाला लावायची... इराणींनी भाषणात सांगितले, जेएनयुतील पुरोगामी टोळी कशी हिंदूंच्या देवीदेवतांची टिंगल ठरवून करतात ते. त्यासाठी त्यांनी या टोळीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे पत्रकच वाचून दाखवले. पत्रकातील भाषा आक्षेपार्ह आहे... त्यात देवी दुर्गेबाबत अतिशय वाईट आणि घृणास्पद भाषा वापरली आहे. हे पत्रक वाचून इराणींनी देवी दुर्गेचा अपमान केला, असा आता विरोधकांचा आक्षेप. त्यासाठी त्यांनी माफी मागावी.... आता बोला... पत्रक पुरोगाम्यांच्या कार्यक्रमाचे, त्यातील आक्षेपार्ह भाषा पुरोगाम्यांच्या टोळीची, दुर्गेचा खरा अपमान केला पुरोगाम्यांच्या टोळीने... त्यामुळे विरोधकांच्या भावना भडकल्या नाहीत. पुरोगाम्यांची ही भाषा सभागृहात जगजाहीर केली, तर मात्र विरोधकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचला... व्वा काय श्रद्धा आहे...?

    डाव्यांचा प्रभाव सर्वत्र संपत आहे. त्यातही आजवर त्यांना आक्रमकतेने उत्तर देणारे भेटत नव्हते. पहिल्यांदा इराणींनी त्यांचे वाभाडे संसदेत काढले. त्यामुळे ते बावचळले आहे. आणि म्हणून निरर्थक आरोपांची मालिका त्यांनी सुरू केली आहे. गेले दोन दिवस तेच दिसते आहे. दुर्दैवाने आजवर त्यांना शिव्या देणारे काँग्रेसीही त्यांच्या कटात सहभागी झाले आहेत, हे काँग्रेसचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. डाव्यांसोबतच काँग्रेसच्या अखेराचीच ही नांदी मानावी लागेल. गेल्या दोन दिवसात रोहितच्या मृतदेहाची तपासणी झाली होती की नाही, त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती की नाही, तो दलित होता की नाही, जेएनयुत पोलिसांचे वर्तन योग्य होते की नाही, पाटियाला कोर्टात झालेली मारहाणीला काय म्हणायचे, ईराणींनी देवी दुर्गेचा अपमान केला काय… या सर्व मुद्यांवर चर्चा सुरू आहे. पण ख-या व मुख्य मुद्यांवरून चर्चा अन्यत्र लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे. कट आहे. खरे मुद्दे ते नाहीतच. मग खरे मुद्दे काय आहेत….
  • रोहितची आत्महत्या दुःखद आहेच. पण याकूब मेमनसारख्या दहशतवाद्याच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी विद्यापीठ परिसरात नमाज आयोजित करणा-या व कितने याकुब मारोंगे, हर घर से याकुब निकलेगा, असे नारे देणा-यांच्या टोळीत रोहित सहभागी होता की नाही? 
  • भारत की बर्बादी तक जंग रहेगी, काश्‍मीर की आजादी तक जंग रहेगी, हे नारे जेएनयुत दिले गेले की नाही?
  • अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है… तेरे सपनों को हम पुरा करेंगे… हँगिंग ऑफ अफझल इज ज्युडिशियल किलिंग, हे नारे देणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र मानायचे काय?
  • हर घर से याकुब, अफझल निकलेगा, भारत की बर्बादी तक जंग रहेगी, अफझल का सपना पुरा करेंगे, हे नारे देशद्रोहाचे आहेत की नाही?
  • ते नसेल तर मग देशप्रेम, देशद्रोह, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय करायची?

    खरे मुद्दे हे आहेत. त्यामुळे डाव्यांच्या विरोधात जनमानस आक्रोशित आहे. म्हणूनच डाव्यांना या ख-या मुद्यांवर चर्चा होऊ द्यायची नाही. त्यासाठी हा सारा प्रकार सुरू आहे. त्यासाठी संबंध नसलॆले नवनवे मुद्दे चर्चेसाठी सोडण्यात येत आहे. पण हे मुद्दे म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार आहे.

वीरपत्नी महादेवींचे आवाहन

    गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी नागपुरात युवा जागरण समिती या संघटनेने एक चांगला कार्यक्रम आयोजित
केला. या कार्यक्रमात अखिल भारतील विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर यांचे जेएनयु प्रकरणावर भाषण झाले. या कार्यक्रमात सियाचीनमध्ये शहीद झालेला वीरजवान शहीद हनुमंतप्पा याची वृद्ध आई बसम्मा, विधवा पत्नी महादेवी, चिमुकली दोन वर्षांची मुलगी नेत्रा सैन्यातच असलेला भाऊ शंकर गौडा उपस्थित होते. वीरपत्नी महादेवी अवघ्या २५-२६ वर्षांची. या कार्यक्रमात तिने आपले मनोगत कन्नडमधून व्यक्त केले. ती म्हणाली, “माझ्या पतीला वीरमरण आले. त्याचा मला अभिमान आहे. पण आपल्या देशात काही ठिकाणी देशद्रोही नारे दिल्या जाते, याचे मला वाईट वाटते आहे. देशाला एका लढाईसाठी आता सज्ज व्हावे लागेल.” 

    वीरपत्नी महादेवीजींचा इशारा स्पष्ट आहे. डाव्या पुरोगाम्यांचा देशद्रोही धिंगाणा त्याला पाठिंबा देणारी तथाकथित बुद्धिजीवींची पिलावळ, हाच आता देशासमोरचा खरा धोका आहे. गेले दोन दिवस तो दिसतो आहेत्याविरोधातल्या लढाईसाठी देशाला सज्ज व्हावे लागेलच...

- अनंत कोळमकर