"सकाळ'च्या बुधवार, दि. 20 एप्रिल, 2016 रोजी प्रसिद्ध झालेले विदर्भ वार्तापत्र
कॉंग्रेसने मुहूर्त साधला, पण...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने कॉंग्रेसने नागपुरात एका मोठ्या जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही उपस्थित होते. या मातापुत्रांनी एकाच सभेला संबोधित करण्याचे प्रसंग फार कमी आहेत. नागपूरने तो योग साधला. सभेला उपस्थित जनतेची संख्या हा निकष लावला तर ही सभा दणदणीत झाली... यशस्वी झाली, हे नाकारता येत नाही. हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन असल्याचे सभेच्या पूर्वी माध्यमांमधून बोलले जात होते. सभेची पूर्वतयारी ज्या पद्धतीने सुरू होती ती पाहता कॉंग्रेसजनांनीही या सभेला शक्तिप्रदर्शनाचेच स्वरूप दिले होते, हे सहजपणे दिसून येत होते. तसे असेल तर हे शक्तिप्रदर्शन यशस्वी झाले, हे मान्य करावेच लागेल. राहुल गांधी आक्रमक मूडमध्ये होते. त्यांच्या भाषणाच्या गुणवत्तेचा विचार सोडला, तरी टाळ्या घेणाऱ्या वाक्यांची पेरणी त्यांच्या भाषणात नेमक्या ठिकाणी होती आणि ती वाक्ये त्यांनी नेमक्या वेळी वापरलीही. ती वाक्ये आणि मोदी, भाजप, संघ यांच्यावर प्रखर टीकास्त्र यामुळे त्यांचे भाषणही जोरदार झाले; पण अचानक या शक्तिप्रदर्शनाचे कारण काय, हा प्रश्न अनेकांना होता व हा प्रश्न गैरलागूही नव्हता.
बाबासाहेबांबाबत कॉंग्रेसला किती आदर होता, त्यांच्यावर कॉंग्रेसचे किती प्रेम होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आज गरज नाही. ती साऱ्यांनाच चांगल्या रीतीने माहीत आहेत. तरीही बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीदिनाचे निमित्त साधून नागपुरात हे शक्तिप्रदर्शन करण्याची दोन प्रमुख कारणे आहेच. एकतर नागपूर ही दलित समाजासाठी प्रेरणाभूमी आहे. धम्मक्रांतीचा बिगुल बाबासाहेबांनी येथील दीक्षाभूमीवरून फुंकला. आज त्या क्रांतीचे पडसाद व त्यातून निर्माण झालेली दलितशक्ती साऱ्या देशभरच नव्हे, तर जगभर दिसून येत आहे. बाबासाहेबांनी या दलितशक्तीचे रूपांतर राजकीय शक्तीत करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केला; पण त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ताकदीचा नेता या समाजाला मिळाला नाही. परिणामी रिपब्लिकन पक्ष तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागला गेला. अशा स्थितीत दलित समाज कॉंग्रेसच्या जवळ गेला. मात्र 90च्या दशकानंतर हा समाज कॉंग्रेसपासून दुरावला. आजची पक्षाची दयनीय अवस्था बघता या समाजाला परत कॉंग्रेसच्या जवळ आणणे, हा मुख्य हेतू या सभेमागे होता. त्यासाठी बाबासाहेबांच्या जन्मदिनाचा मुहूर्त आणि दीक्षाभूमी असलेल्या नागपूरचे स्थान निवडणे, ही पक्षाची अचूक रणनीती म्हणावी लागेल.
रणनीतीचा दुसरा भाग होता, विदर्भाला चुचकारण्याचा. विदर्भ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. कॉंग्रेसच्या नावावर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, अशी स्थिती विदर्भात होती. आंध्रातील पी. व्ही. नरसिंहराव आणि काश्मिरातील गुलाम नबी आझाद यांना विदर्भात कुणीही ओळखत नसतानाही ते येथून लोकसभेवर निवडून गेले, याचे एकमेव कारण विदर्भातील कॉंग्रेसची शक्ती हेच होते. पण आज ही स्थिती बदलली आहे. सर्वच्या सर्व दहा खासदार ज्या विदर्भातून कॉंग्रेसचे निवडून यायचे, त्याच विदर्भात आज या पक्षाचा एकही खासदार नाही. पक्षाची ही अवस्था येथील नेत्यांच्या नाकर्तेपणाने झाली. रिपब्लिकन पक्षाच्या फुटीनंतर कॉंग्रेसकडे वळलेला दलित मतदार या पक्षाला टिकवता आला नाही. अल्पसंख्याक समाजही दुरावला. त्याचा नेमका फायदा भाजपने उचलला. आज विदर्भातले आठ खासदार एकट्या भाजपचे, तर दोन खासदार त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचे आहेत. एकेकाळी विदर्भातल्या प्रत्येक गावात कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता. अशी स्थिती असणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष होता. आजही कॉंग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे, पण तसाच कार्यकर्ता आता भाजपचाही आहे. भाजपची मातृसंघटना मानली जाणाऱ्या संघाच्या शाखा तेव्हाही गावागावात होत्या; मात्र त्याचा फायदा भाजपला नव्हता. पण आज स्थिती बदलली आहे. गावखेड्यातला तरुणवर्ग भाजपच्या तंबूत मोठ्या प्रमाणात आहे.
एका योगायोगाची येथे नोंद करणे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस विदर्भात पराभूत झाली, त्या त्या वेळी तो पक्ष केंद्रातूनही सत्तेबाहेर गेला. त्यामुळे विदर्भातील गमावलेली शक्ती परत मिळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही सभा होती. म्हणूनच ती सभा यशस्वी करण्याची सक्ती विदर्भातल्या नेत्यांवर होती आणि ती सक्ती होती म्हणूनच सभा यशस्वीही झाली. सभेला कार्यकर्ता आणण्याची जबाबदारी या नेत्यांसाठी ऐच्छिक ठेवली असती, तर या सभेचे स्वरूप काय राहिले असते, हे सांगण्यासाठी कोण्या तज्ज्ञाची गरज नाही.
कॉंग्रेसने विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे प्रत्यंतर सभेनंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून येते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ काळानंतर आपली कार्यकारिणी घोषित केली. 235 जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत विदर्भाला 67 पदांचा जम्बो वाटा मिळाला आहे. या 67 पदाधिकाऱ्यांमध्ये काही नवीन व उत्साही तरुण चेहरे आहेत. हा एक चांगला संकेत आहे. पण बोटावर मोजता येतील एवढ्या तरुण नेत्यांच्या भरोशावर पक्षाला विदर्भात उभारी देता येईल काय, हा खरा प्रश्न आहे. कार्यकारिणीतील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी दीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे. त्या सत्तेच्या जोरावर त्यांनी कोणाचा आणि कशाचा विकास केला, हा संशोधनाचा विषय आहे. या नेत्यांनी स्वतःच्या ताकदीवर विकास विदर्भात खेचून आणला असता तर वेगळ्या विदर्भाची मागणीही समोर आली नसती आणि पत घसरून कॉंग्रेसची विदर्भातली स्थितीही दयनीय झाली नसती. त्यांना आता जनतेनेच नाकारले आहे. त्यांच्या भरोशावर पक्ष विदर्भात मजबूत करण्याच्या स्वप्नाला दिवास्वप्नाशिवाय दुसरे संबोधनच देता येणार नाही. अशा स्थितीत राहुल-सोनियांच्या सभेचा करिष्मा जनतेपर्यंत पोहोचवता येणेही शक्य नाहीच. त्यावर पक्षश्रेष्ठी काय उपाययोजना करतात, यावर पक्षाचे भवितव्य व पुढचा प्रवास अवलंबून राहणार आहे.
- अनंत कोळमकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा