रविवार, १५ मे, २०१६

तेलंगणाची दादागिरी

"सकाळ'च्या बुधवार, दि. 11 मे, 2016 रोजी प्रसिद्ध झालेले विदर्भ वार्तापत्र

मुंबईतील सरकार कुणाचेही असो, ते विदर्भाकडे, इथल्या समस्यांकडे, इथल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करीत असते, ही भावना इथल्या जनमानसात मूळ धरून आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शेजारचे तेलंगणा राज्य दादागिरी करीत आहे; तरी आपले सरकार ढिम्म आहे. हा या दुर्लक्षपणाचा कळस आहे.
पोचमपल्ली ः मेडिगट्टा-कालेश्‍वर धरणाला विरोध करताना गावकरी

महाराष्ट्र सीमेच्या अगदी जवळ तेलंगणा राज्यात गोदावरी नदीच्या काठावर कालेश्‍वर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या कालेश्‍वरजवळच तेलंगणा सरकारने नुकतेच मेडिगट्टा-कालेश्‍वर धरणाचे भूमिपूजन केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः या कार्यक्रमासाठी तेथे आले. या धरणाचा परिणाम राज्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यावर होणार असल्याने तिथल्या गावकऱ्यांचा या धरणाला विरोध आहे. ते आंदोलन करीत आहेत; पण महाराष्ट्र सरकार मात्र अजूनही शांत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन नुकतेच विदर्भात आले होते. त्यांना या धरणाबाबत विचारले असता, याबाबत सरकारला काहीच माहीत नसल्याचे उत्तर दिले. आपल्या राज्याच्या सीमेवर शेजारचे राज्य एक मोठा प्रकल्प उभारतो आहे, त्याचे थाटात भूमिपूजन करतो, त्या कार्यक्रमाच्या मोठमोठ्या जाहिराती महाराष्ट्रातही प्रसिद्ध करतो आणि तरीही इथल्या सरकारच्या ते गावीही नाही, यावर कोणाचा विश्‍वास बसेल?
कालेश्‍वरपासून 4-5 किलोमीटर अंतरावर मेडिगट्टा गावाजवळ गोदावरीवर हे धरण होत आहे. मात्र, सिरोंचा तालुक्‍यात असलेले पोचमपल्ली हे गाव या धरणाच्या अगदी लागून आहे. या धरणाचा खर्च अंदाजे 10 हजार कोटी राहणार आहे. धरणाची उंची 103 मीटर असणार आहे. या धरणातून 144 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातून तेलंगणातील हैदराबाद शहरासह अनेक जिल्ह्यांची तहान भागविली जाणार आहे व 30 लाख हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होणार आहे. हा प्रकल्प दोन राज्यांच्या सीमेवर होत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी एकत्र बसून पाणीवाटप, पुनर्वसन, नुकसानभरपाई याबाबतचा निर्णय घ्यायला हवा; पण तसे काहीही न होता थेट भूमिपूजन झाले. तरीही महाराष्ट्र सरकारने कोणताही विरोध अद्याप दाखवलेला नाही. पण, तेलंगणातल्या वृत्तपत्रांमधील माहिती खरी मानल्यास सिरोंचा तालुक्‍यातील 21 गावे व 25 हजार हेक्‍टर जमीन या धरणात बुडणार आहे. आणि म्हणूनच या प्रकल्पाला या गावातील गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील गावांच्या जिवावर तेलंगणा सरकार त्यांच्या राज्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही तृष्णातृप्ती विदर्भातील गावांच्या जिवावर उठली आहे. खरेतर तेलंगणाची ही दादागिरी आजची नाही. तो आंध्र प्रदेशचा भाग असतानापासून ही दादागिरी सुरू आहे. सिरोंचा तालुक्‍यातीलच चपराळा गावाजवळ वर्धा व वैनगंगा नदीचा संगम होतो व पुढील प्रवास ही नदी प्राणहिता नावाने करते. या प्राणहिता नदीवरही तेलंगणा सरकार प्राणहिता-चेवेल्ला धरण बांधत आहे. त्यातही महाराष्ट्रातील गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) व चामोर्शी (जि. गडचिरोली) तालुक्‍यातील गावे जाणार होती. विशेषतः चपराळा अभयारण्यातील काही भागही त्यात जाणार होता. त्यामुळे आंदोलनाचा भडका उठताच तेलंगणा सरकारने धरणाची उंची कमी केली. त्यामुळे जे पाणी कमी झाले, त्याच्या भरपाईसाठी मेडिगट्टा धरणाला चालना दिली आहे.
इतक्‍यावरच तेलंगणाची हाव थांबलेली नाही. हीच प्राणहिता कालेश्‍वरजवळ गोदावरीला मिळते व गोदावरी नावानेच पुढचा प्रवास करते. म्हणजेच चेवेल्ला धरण ते मेडिगट्टा धरण हा प्राणहिता-गोदावरीचा प्रवास अवघ्या 160 किलोमीटरचा आहे. त्यात आणखी तिसऱ्या मोठ्या धरणाचे संकट घोंघावू लागले आहे. प्राणहितेवरच सिरोंचा तालुक्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या सोमनूर गावाजवळ इचमपल्ली धरण प्रस्तावित होते. मुळात निजामशाही असताना या धरणाची संकल्पना मांडण्यात आली होती. नंतर छत्तीसगड राज्याने या धरणाला विरोध केला. परिणामी हे धरण थंडबस्त्यात पडले. हेही धरण पूर्ण करण्याचे तेलंगणा सरकारने मनावर घेतले आहे. ते प्रत्यक्षात आले तर एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील 80हून अधिक गावे व 35 हजार हेक्‍टरहून अधिक जमीन पाण्याखाली येण्याची भीती आहे.
एकंदरीत केवळ 160 किलोमीटरच्या टप्प्यात तीन मोठी धरणे उभारून तेलंगणा सरकार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो गावकऱ्यांच्या व येथील समृद्ध वनसंपदेच्या मुळावर उठले आहे. पण, या साऱ्यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भातले व त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातले, आणखी एक मंत्री अम्ब्रीशराजे आत्राम हेही गडचिरोली जिल्ह्यातले, केंद्रातले मंत्री हंसराज अहीर चंद्रपूरचे, विदर्भाचेच नितीन गडकरी केंद्रात प्रमुख मंत्री... इतकी शक्तिशाली सत्ताधारी नेत्यांची यादी असतानाही तेलंगणा सरकार विदर्भावर आपली दादागिरी कशी दाखवत आहे? आताही जर सरकार व सत्तारूढ पक्षाचे नेते आपले मौन सोडणार नसतील, तर मग मुंबईतील सरकार कुणाचेही असो, ते विदर्भाकडे, इथल्या समस्यांकडे, इथल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करीत असते, अशी भावना इथल्या जनमानसात तयार होत असेल तर त्यात चूक काय?
 
बारा गावांत दोन सरकार
या भागातला आणखी एक प्रश्न महाराष्ट्र सरकारने थंडबस्त्यात टाकला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यातील बारा गावे तेलंगणाच्या सीमेला लागून आहेत. या गावांवर तेलंगणा सरकार आपला दावा दाखवत आहे. मजेची बाब म्हणजे, या गावांमध्ये दोन्ही राज्यांचे प्रशासन आहे. दोन ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या निवडणुकाही वेगवेगळ्या होतात. महाराजगुडा हे गाव तर अर्धे महाराष्ट्रात आणि अर्धे तेलंगणात आहे. या गावातील लोकांना दोन्ही राज्यांच्या सोयीसुविधा मिळत असल्याने त्यांच्या या व्यवस्थेला विरोध नाही. पण, ही व्यवस्था योग्यही नाही. मात्र तरीही कोणत्याही सरकारने यावर तोडगा काढलेला नाही.

- अनंत कोळमकर

कॉंग्रेसने मुहूर्त साधला, पण...

"सकाळ'च्या बुधवार, दि. 20 एप्रिल, 2016 रोजी प्रसिद्ध झालेले विदर्भ वार्तापत्र

कॉंग्रेसने मुहूर्त साधला, पण...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीदिनाच्या निमित्ताने कॉंग्रेसने नागपुरात एका मोठ्या जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही उपस्थित होते. या मातापुत्रांनी एकाच सभेला संबोधित करण्याचे प्रसंग फार कमी आहेत. नागपूरने तो योग साधला. सभेला उपस्थित जनतेची संख्या हा निकष लावला तर ही सभा दणदणीत झाली... यशस्वी झाली, हे नाकारता येत नाही. हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन असल्याचे सभेच्या पूर्वी माध्यमांमधून बोलले जात होते. सभेची पूर्वतयारी ज्या पद्धतीने सुरू होती ती पाहता कॉंग्रेसजनांनीही या सभेला शक्तिप्रदर्शनाचेच स्वरूप दिले होते, हे सहजपणे दिसून येत होते. तसे असेल तर हे शक्तिप्रदर्शन यशस्वी झाले, हे मान्य करावेच लागेल. राहुल गांधी आक्रमक मूडमध्ये होते. त्यांच्या भाषणाच्या गुणवत्तेचा विचार सोडला, तरी टाळ्या घेणाऱ्या वाक्‍यांची पेरणी त्यांच्या भाषणात नेमक्‍या ठिकाणी होती आणि ती वाक्‍ये त्यांनी नेमक्‍या वेळी वापरलीही. ती वाक्‍ये आणि मोदी, भाजप, संघ यांच्यावर प्रखर टीकास्त्र यामुळे त्यांचे भाषणही जोरदार झाले; पण अचानक या शक्तिप्रदर्शनाचे कारण काय, हा प्रश्‍न अनेकांना होता व हा प्रश्‍न गैरलागूही नव्हता.
बाबासाहेबांबाबत कॉंग्रेसला किती आदर होता, त्यांच्यावर कॉंग्रेसचे किती प्रेम होते, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची आज गरज नाही. ती साऱ्यांनाच चांगल्या रीतीने माहीत आहेत. तरीही बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीदिनाचे निमित्त साधून नागपुरात हे शक्तिप्रदर्शन करण्याची दोन प्रमुख कारणे आहेच. एकतर नागपूर ही दलित समाजासाठी प्रेरणाभूमी आहे. धम्मक्रांतीचा बिगुल बाबासाहेबांनी येथील दीक्षाभूमीवरून फुंकला. आज त्या क्रांतीचे पडसाद व त्यातून निर्माण झालेली दलितशक्ती साऱ्या देशभरच नव्हे, तर जगभर दिसून येत आहे. बाबासाहेबांनी या दलितशक्तीचे रूपांतर राजकीय शक्तीत करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केला; पण त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ताकदीचा नेता या समाजाला मिळाला नाही. परिणामी रिपब्लिकन पक्ष तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागला गेला. अशा स्थितीत दलित समाज कॉंग्रेसच्या जवळ गेला. मात्र 90च्या दशकानंतर हा समाज कॉंग्रेसपासून दुरावला. आजची पक्षाची दयनीय अवस्था बघता या समाजाला परत कॉंग्रेसच्या जवळ आणणे, हा मुख्य हेतू या सभेमागे होता. त्यासाठी बाबासाहेबांच्या जन्मदिनाचा मुहूर्त आणि दीक्षाभूमी असलेल्या नागपूरचे स्थान निवडणे, ही पक्षाची अचूक रणनीती म्हणावी लागेल.
रणनीतीचा दुसरा भाग होता, विदर्भाला चुचकारण्याचा. विदर्भ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. कॉंग्रेसच्या नावावर दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, अशी स्थिती विदर्भात होती. आंध्रातील पी. व्ही. नरसिंहराव आणि काश्‍मिरातील गुलाम नबी आझाद यांना विदर्भात कुणीही ओळखत नसतानाही ते येथून लोकसभेवर निवडून गेले, याचे एकमेव कारण विदर्भातील कॉंग्रेसची शक्ती हेच होते. पण आज ही स्थिती बदलली आहे. सर्वच्या सर्व दहा खासदार ज्या विदर्भातून कॉंग्रेसचे निवडून यायचे, त्याच विदर्भात आज या पक्षाचा एकही खासदार नाही. पक्षाची ही अवस्था येथील नेत्यांच्या नाकर्तेपणाने झाली. रिपब्लिकन पक्षाच्या फुटीनंतर कॉंग्रेसकडे वळलेला दलित मतदार या पक्षाला टिकवता आला नाही. अल्पसंख्याक समाजही दुरावला. त्याचा नेमका फायदा भाजपने उचलला. आज विदर्भातले आठ खासदार एकट्या भाजपचे, तर दोन खासदार त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचे आहेत. एकेकाळी विदर्भातल्या प्रत्येक गावात कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता. अशी स्थिती असणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष होता. आजही कॉंग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे, पण तसाच कार्यकर्ता आता भाजपचाही आहे. भाजपची मातृसंघटना मानली जाणाऱ्या संघाच्या शाखा तेव्हाही गावागावात होत्या; मात्र त्याचा फायदा भाजपला नव्हता. पण आज स्थिती बदलली आहे. गावखेड्यातला तरुणवर्ग भाजपच्या तंबूत मोठ्या प्रमाणात आहे.
एका योगायोगाची येथे नोंद करणे आवश्‍यक आहे. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस विदर्भात पराभूत झाली, त्या त्या वेळी तो पक्ष केंद्रातूनही सत्तेबाहेर गेला. त्यामुळे विदर्भातील गमावलेली शक्ती परत मिळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही सभा होती. म्हणूनच ती सभा यशस्वी करण्याची सक्ती विदर्भातल्या नेत्यांवर होती आणि ती सक्ती होती म्हणूनच सभा यशस्वीही झाली. सभेला कार्यकर्ता आणण्याची जबाबदारी या नेत्यांसाठी ऐच्छिक ठेवली असती, तर या सभेचे स्वरूप काय राहिले असते, हे सांगण्यासाठी कोण्या तज्ज्ञाची गरज नाही.
कॉंग्रेसने विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे प्रत्यंतर सभेनंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून येते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदीर्घ काळानंतर आपली कार्यकारिणी घोषित केली. 235 जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत विदर्भाला 67 पदांचा जम्बो वाटा मिळाला आहे. या 67 पदाधिकाऱ्यांमध्ये काही नवीन व उत्साही तरुण चेहरे आहेत. हा एक चांगला संकेत आहे. पण बोटावर मोजता येतील एवढ्या तरुण नेत्यांच्या भरोशावर पक्षाला विदर्भात उभारी देता येईल काय, हा खरा प्रश्‍न आहे. कार्यकारिणीतील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी दीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे. त्या सत्तेच्या जोरावर त्यांनी कोणाचा आणि कशाचा विकास केला, हा संशोधनाचा विषय आहे. या नेत्यांनी स्वतःच्या ताकदीवर विकास विदर्भात खेचून आणला असता तर वेगळ्या विदर्भाची मागणीही समोर आली नसती आणि पत घसरून कॉंग्रेसची विदर्भातली स्थितीही दयनीय झाली नसती. त्यांना आता जनतेनेच नाकारले आहे. त्यांच्या भरोशावर पक्ष विदर्भात मजबूत करण्याच्या स्वप्नाला दिवास्वप्नाशिवाय दुसरे संबोधनच देता येणार नाही. अशा स्थितीत राहुल-सोनियांच्या सभेचा करिष्मा जनतेपर्यंत पोहोचवता येणेही शक्‍य नाहीच. त्यावर पक्षश्रेष्ठी काय उपाययोजना करतात, यावर पक्षाचे भवितव्य व पुढचा प्रवास अवलंबून राहणार आहे.

- अनंत कोळमकर

रविवार, १ मे, २०१६

‘सैराट’च्या निमित्ताने...



नागनाथ मंजुळे यांची डाव्या वादाकडे झुकणारी वैचारिक बांधिलकी सर्वांना माहीत आहे. पण केवळ तितक्या मुद्द्यावरून मंजुळेंच्या एका कलाकृतीवर, चित्रपटावर टीका करणे अयोग्य आहे, असे मला वाटते. एक पत्रकार, जनसंवाद शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच मी त्याकडे पाहतो. एक चांगली प्रेमकहाणी, नवागत कलावंतांचा निकोप व सर्वांगसुंदर अभिनय, रांगड्या ग्रामीण ढंगाच्या मराठीतील संवाद, गावचे वातावरण आणि उत्कृष्ट छायाचित्रण यासाठी या चित्रपटाला 100 टक्के गुण द्यावे लागेल. पण...



प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराटया मराठी चित्रपटाबाबत गेल्या चार-पाच दिवसांपासून बरेच उसटसुलट लिहिले जात आहे. त्यामूळे हा चित्रपट पाहायचाच असे ठरवले आणि पाहलाही. मंजुळे यांची डाव्या वादाकडे झुकणारी वैचारिक बांधिलकी सर्वांना माहीत आहे. डाव्या विचारधारेबाबत मला प्रेम नाही. आहे तो विरोधच! पण केवळ तितक्या मुद्द्यावरून मंजुळेंच्या एका कलाकृतीवर, चित्रपटावर टीका करणे अयोग्य आहे, असे मला वाटते. एक पत्रकार, जनसंवाद शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच मी त्याकडे पाहतो. एक चांगली प्रेमकहाणी, नवागत कलावंतांचा निकोप व सर्वांगसुंदर अभिनय, रांगड्या ग्रामीण ढंगाच्या मराठीतील संवाद, गावचे वातावरण आणि उत्कृष्ट छायाचित्रण यासाठी या चित्रपटाला 100 टक्के गुण द्यावे लागेल.

एक टीका आहे, अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांना असे चित्रपटातून दाखवणं योग्य नाही. संस्कृतीचे अतिउत्साही भक्त अशी टीका करणा-यात समोर आहे. खरे तर या टीकेमागे डाव्या विचारांच्या मंजुळेंबाबतचा दुषित पूर्वग्रह आहे, असे मला वाटते. टाईमपास चित्रपटामध्येही तेच प्रेम होते. शाळा मधले प्रेम अबोल असले तरी तेही शाळेतलेच होते. मग सैराटवर टीका करण्यात काय हशील? मुळात सैराटमध्ये कॉलेजच्या पहिल्या वर्षात जाणा-यांचे प्रेम दाखवले आहे. ते अल्पवयीन प्रेम नाही व संपूर्ण चित्रपटात ते अपरिपक्व (unmatured) वाटत नाही. चित्रपट हे जनसंवादाचे माध्यम आहे. जनसंवादाच्या माध्यमांना समाजमनाचा आरसा म्हणतात. समाजात जे घडते, जे जाणवते, त्याचे दर्शन या माध्यमांमधून होत असते. तसेच ते चित्रपटांमधूनही घडते. आजच्या आधुनिक जगात शाळांमध्ये प्रेम होत नाही, असे म्हणणे म्हणजे सत्यापासून पळ काढणे होय. असे असताना ते चित्रपटात येऊ नये वा दाखवू नये, असे म्हणणे तद्दन मुर्खपणा होय. कोंबडं झाकल्याने सकाळ व्हायची राहणार नाही आणि मंजुळेंनी सैराट काढला नसता, तर अशी प्रेमप्रकरणे उघडकीस आलीच नसती, असे होत नाही. त्यामुळे सैराटच्या विषयाला विरोध करणे चूक आहे. ते दाखवताना तारतम्य ठेवावे, ही सूचना योग्य आहे. पण मंजुळेंनी ते तारतम्य ठेवले, असे मला वाटते.

तरीही मला हा चित्रपट फारसा आव़डला नाही. मंजुळेंचे दिग्दर्शन चांगले आहे, कथानक चांगले आहे, कलाकारांचा अभिनय चांगला आहे, पण तरीही तो विस्कळीत आहे. मध्यंतरापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट नंतर मात्र तुकड्यातुकड्यांमध्ये दिसतो अन् त्यामुळे तो डोक्यातच शिरत नाही. खरं तर स्पष्ट सांगायचे झाल्यास चित्रपटाचा शेवट काय करायचा हेच नागराजअण्णांना उमगले नाही आणि त्या गोंधळात चित्रपट ओढूनतोडून ताणल्या गेला, असेच मध्यंतरानंतर प्रत्येक दृश्य पाहताना जाणवत राहते. नवीन जोडप्यातले ताणतणाव,  तिचे रागावणे, त्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तिचे सर्व सोडून जाणे आणि अचानक परत य़ेणे, सर्व सुरळीत होणे आणि नंतर एकदम तिच्या भावाकडून तिचा व त्याचा खून... हा सारा घटनाक्रम चित्रपटात ठिगळ्यांसारखा दिसतो. तसे मंजुळेंनी का केले, हे अखेरपर्यंत समजतच नाही. चित्रपट कधी संपला, हे अवाक प्रेक्षकांना न कळणे व ते खिळून राहणे, हे दिग्दर्शकाचे यश मानले जाते. सैराट संपतो, तेव्हाही प्रेक्षकांना चित्रपट संपला हे ध्यानात येत नाही. पण ते जेवाहा भानावर येतात तेव्हा हट्... हा काय शेवट आहे असे म्हणतात, यातच सर्व काही आले.

मंजुळेंना या चित्रपटातून काय संदेश द्यायचा होता, हेच लक्षात येत नाही. जातीयवाद आहे व त्याचा प्रवाहाच्या विरोधात पोहणा-यांना जाच असतो, हे केवळ सांगायचे असेल, तर तसे सांगणारे अनेक चित्रपट आले आहेत. जातीयवादाचे जोखड झुगारून प्रेमविवाह करणा-या जोडप्यांच्या कौटुंबिक जीवनात अनेक ताणतणाव असतात, हे काही लपून नाही व तोही विषय चित्रपटांमधून चावून चोथा झाला आहे. मग आंतरजातीय विवाह करणा-यांच्या नशिबी फक्त आणि फक्त मृत्यूचाच शेवट असतो, असा संदेश तर नागराजअण्णांना चित्रपटाच्या शेवटातून द्यायचा नाही ना... कारण चित्रपटाचा शेवट पाहल्यानंतर तरी तसेच वाटते. त्या प्रेमी जोडप्याच्या रक्तात भिजलेले पाय घेऊन रडत जाणा-या त्यांच्या चिमुकल्याला उद्याचे भविष्य असे गोंडस नाव काहीजण देत आहे. पण हे भविष्यही रक्ताळलेलेच राहणार, असे मंजुळेंना सांगायचे आहे का?

चित्रपटातल्या आंतरजातीय प्रेमाला समर्थन देणारे, सवर्णही दिसतात. हा समाजातला सकारात्मक बदल मंजुळेना हायलाईट का करता आला नाही? की, हा बदल मंजुळेंना मान्य नाही? जातीयवाद्यांचा तीव्र विरोधाला, कौटुंबिक ताणतणावाला समर्थपणे तोंड देऊन यशस्वी संसार करणा-या त्या जोडप्याची विजिगीषू वृत्ती शेवटापर्यंत का नेता आली नाही? लग्नानंतरचा नायिकेच्या घरातला ताणतणाव अनेक दृश्यांतून दाखवणा-या मंजुळेंना दलित नायकाच्या घरातला ताणतणाव फक्त दोन दृश्य दाखवून (एक त्य़ाचे कुटुंब घर सोडताना आणि नंतर जातपंचायतीसमोर असहाय असतानाचे) कसा काय संपवता आला?

नागराज मंजुळे
खरं तर नागराजअण्णांच्या डाव्या विचारसरणीचे दर्शन मला या ठिगळस्वरूप आलेल्या शेवटातून होते. या डाव्या विचारसरणीने एक ठिगळ असेच चित्रपटात दिसते. चित्रपटात आनंद असतो. प्रेमी जोडपे आपल्या बाळासह स्वतःचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी घर पहायला जातात. परतताना ते छान आनंदात असतात. एकदम एक दृश्य दिसते. भगवे झेंडेवाले संस्कृतीरक्षक प्रेमी जोडप्यांना उठबशा काढायला लावत असताना... आणि आनंदी जोडपे त्याकडे निरिच्छपणे पाहत जाते... त्या दृश्याचा संदर्भ ना या दृश्याच्या अगोदर लागतो व ना नंतर... केवळ भगवे झेंडेवाल्यांचा आकस दाखवण्याची व संस्कृतीरक्षकांच्या वेडेपणाचे ठिगळ लावण्याची (सु)बुद्धी नागराजअण्णांना त्यांच्यातल्या डाव्या विचाराने दिली असावी, असे वाटते... एका चांगल्या कथानकाची, चांगल्या चित्रीकरणाची, चांगल्या अभिनयाची व मंजुळेंच्या चांगल्या दिग्दर्शनाची मध्यंतरानंतरच्या विस्कळीत ठिगळ्यांनी पार वाट लावली, असेच सैराट पाहून बाहेर पडताना सतत जाणवत राहते...

-    अनंत कोळमकर